अक्कलकोट गुरु मंदिरात उमटली चरणकमले! कारण काय?

श्री स्वामी समर्थ

अक्कलकोट येथील स्वामींच्या एकूण ५ मठांपैकी एका गुरुमंदिरात आरतीसाठी जमणा-या भक्तगणांना अन्नदान देण्याची सव्वाशे वर्षांची परंपरा शनिवार दि.११.११.२०१७ रोजी सकाळी काहिंनी बंद पाडल्याचे वृत्त कानी आले.

तर १५ दिवसांनी शनिवारीच २५-११-१७ ला सकाळी साडेअकरानंतर गुरुमंदिराच्या सभामंडपात देवदेवतांची चरणकमले उमटताना दिसू लागली!

नेहमीच्या भक्तांना अन्नदान करण्याचे पवित्र कार्य खंडित झाल्याचे वृत्त आणि त्यात तथ्यांश किती, हे पडताळण्यासाठी शनिवारी २५ तारखेला सकाळीच मी अक्कलकोटला निघालो नि वाटेत असताना चरणकमले उमटण्याच्या प्रकाराचे वृत्त मोबाईलवर झळकले.

महाराष्ट्रभरातून ते अगदी आखातापर्यंत या वृत्तांताच्या सत्यतेची खात्री करण्यासाठी फोनाफोनी सुरू झाली.

Loading...

त्या सर्वांसाठी हा जाहीर खुलासा-

गुरुमंदिरात प्रवेशलो तेव्हा गुरु परंपरेचे अधिकारी सत्पुरुष श्री गजानन महाराज (अक्कलकोटकर) राजीमवाले यांचे नातू राजाभाऊ तथा परशुरामजी महाराज स्वत: जातीनिशी हा अद्भूत प्रसंग अनुभवताना दिसले.

आधी फरशी पुसून घ्यावी, नंतर त्या प्रत्येक फरशीला न्याहाळत जिथे पादुकांचा आकार दिसेल तेथे ते खडूने तो आकार अधोरेखीत करीत होते आणि त्यावर चौरंग ठेवीत होते. असे चौरंग संपल्यावर १०० ताटे आणि नंतर वाट्या ठेवत तेथील सेवेकरी वर्ग या चमत्काराने थक्क होत होता.

Loading...

आरंभी एक प्रसंग घडला तो असा की,- वेदांचे पुनरुज्जीवन करण्याची उद्घोषणा या मठातील ज्या दिव्य स्थळी नमूद केली आहे त्या सभामंडपातील स्थळासमोरच्या एका फरशीवर एक चरण पूर्वीपासून उमटलेले होते.

आणि याची कल्पना नित्य दर्शन घेणा-या अनेक लोकांस होतीच. सध्या गुरुमंदिराचा जिर्णोद्धार चालू असल्याने सभामंडपातील फरशा बदलण्याची प्रक्रीया सुरू होणार होती. परंतु काही ना काही घडामोडी घडून हे मात्र लांबणीवर पडत होते.

आता हे कार्य उरकावेच म्हणून ठरत असताना फरशीवरील श्री गजानन महाराजांच्या या एका चरण कमलाला सुरक्षित कसे राखता येईल असा विचार पुढे आला. तेव्हा श्री परशुरामजी महाराजांचे असे म्हणणे पडले की,जर एक चरण दिसत आहे तर दुसराही चरण दिसला पाहिजे.

या उत्सुकतेने ते पाहात गेले असताना असंख्य पाऊले आढळून आली! बरे, हा भाग आजवर सर्वांच्या नित्य वावराचाच आहे. सभामंडपात श्रीस्वामींच्या प्रतिमा असलेल्या प्रथम स्तंभाखाली एक पादुकांची प्रतिमा आढळून आली.

मग श्री बाळप्पा महाराजांच्या प्रतिमेखाली, त्यांचे शिष्योत्तम श्री गंगाधर महाराजांच्या समाधीसमोर, गुरुमंदिराच्या गाभा-याच्या उजव्या द्वारावर व त्याच्या समोर,

तसेच राजराजेश्वरी जगदंबारूप स्वामीरायांचा देव्हारा असलेल्या पहिल्या मजल्यावर जाण्याच्या पहिल्या पायरीवर दोन पादुका, तसेच देवीचे वाहन सिंहराजांच्या पाऊलांचे ठिकठिकाणी उमटलेले ठसे,

त्याचप्रमाणे मठाची ही मूळ पावन भूमी ज्या परशुरामांच्या वास्तव्याने पुनीत झाली त्या अवताराचेही लांबसडक चरण, तर श्रीस्वामी महाराजांची वाटावी अशी असंख्य चरणे तिथे आज आपण पाहू शकतो.

त्यामुळे या फरशा बदलण्याची योजना तूर्त तरी स्थगित ठेवली आहे. परंतु याच फरशा आहे तशाच ठेवल्या तर भक्तगणांना सभामंडपात अक्षरश: उड्या मारत चालावे लागणार आहे इतकी चरणकमले उमटलेली आहेत गुरुमंदिराची उभारणी ही त्या अद्भूत स्थळी सन १९०१ पासून सुरू झाली.

श्रीस्वामी समर्थांनी श्री स्वामीसुतांच्या अकाली जाण्यानंतर अक्कलकोटमधील गुरु परंपरा ही अधिकारप्राप्त सेवेकरी असलेल्या शिष्योत्तम श्री बाळप्पा महाराज यांच्याकडे सोपविली.

जे कार्य श्रीस्वामी महाराज करीत होते ते श्री बाळप्पा महाराजांनी अखंडित राखले. श्रीस्वामींच्या समाधीलीलेनंतर अक्कलकोटातील मठाचा कारभार श्री बाळप्पांतर्फे पूर्वी दोन ठिकाणी सुरू होता.

पण नंतर मठाचे एक निश्चित स्थान करावे असे ठरले. त्यात हे स्थान मुक्रर झाले. सन १९०१ ला दाजीबा भोसले यांचे राम मंदिरालगतचे हे परसदार राजेमंडळींनी बक्षीस दिले, ज्यावर पूर्वापार धर्मस्थानच विद्यमान होते.

श्रीस्वामी महाराजांप्रमाणे श्री बाळप्पा महाराजांनीही येथे कार्य चालविताना अन्नदानही सुरूच ठेवले. ही परंपरा पुढे श्री गंगाधर महाराज व त्यांच्या पश्चात श्री गजानन महाराजांनी राखली.

तद्नंतर श्री गजानन महाराजांचे चिरंजीव श्रीकांतजी राजीमवाले व नंतर त्यांचे चिरंजीव राजाभाऊ हे ही परंपरा चालवित आहेत. मध्यंतरी काही वर्षे अन्नदान हे सेवकरी वर्गापर्यंत सीमित झाले.

पण अनेक सेवेकरी गणांनी आग्रह धरल्यामुळे जमिनीवर बसून प्रसाद घेण्याऐवजी मंदिराच्या मागील बाजूस श्रीस्वामीअन्नपूर्णेची स्वतंत्र वास्तू होऊन गुरुमंदिराशी संलग्न असणा-या नित्य दर्शनार्थी पन्नास-शंभर भक्तगणांना अन्नदान सुरू झाले.

ही  पूर्वापारची अन्नदान परंपरा ११ नोव्हेंबर २०१७ला काही कारणांमुळे, कदाचित पुढील संभाव्य कटकटींचा अंदाज आल्याने बंद झाली! पण या घटनेचा तपशील जाहीरपणे देण्यास कुणी उत्सुक नाहीत.

गुरुमंदिराप्रमाणे अक्कलकोटपासून दोन किलोमिटरवरील शिवपुरीत अखंड अन्नदान सुरू असून भक्तांनी तिथे यावे, असे सर्वांचे म्हणणे पडले. शिवाय आपल्याला कुणी धमकावले नसल्याचेही मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

गुरुमंदिरातील अन्नदान कक्षातील सारी टेबल्स एका शाळेला दान केली असल्याचे समजते! या एकंदर घटनेमागे काही “सत्य-असत्य” लपलेले आहे का? की मौन पाळलेले बरे! अक्कलकोटमध्ये महत्त्वपूर्ण असूनही गुरुमंदिराचा गवगवा इतर मठांप्रमाणे नाही.

श्रीस्वामींची परंपरा इथे उरलेली नाही असा त्यांच्या विषयीच्या अपप्रचाराचा एक भाग खासगीत चालतो. श्रीस्वामी महाराजांनी या सर्व मतमतांतरांवर आता कडी केली आहे!

शनिवार दिनांक ११ नोव्हेंबरला अन्नदान थांबवण्याचा प्रसंग ओढवल्याच्या १५ दिवसांनीच दि. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी, शनिवारी, तीच दुपारची वेळ -गुरुमंदिरांचा सभामंडप, प्रवेशद्वार ते गाभा-याचा प्रदक्षिणा मार्ग या भागात सर्वत्र देवता नाचल्याचा, वावरल्याचा जिवंत पुरावा दिसू लागला आहे.गुरुमंदिरात येणा-या भक्तांचे स्वागत आहेच…

राहिला प्रश्न थांबलेल्या अन्नदान कार्याचा! जगद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज हे कुणाला ऐकणार आहेत का?.. महाराजांना कोणी रोखू शकत नाही… गुरुमंदिरातील पाऊले हेच सांगत सांगत येथे हसताना दिसत आहेत…

भक्तांना तृप्तीचे ढेकर देताना आनंदित होणारी भोजनाची ती शंभर ताटे व वाट्या या त्या प्रकटलेल्या पाऊलांवर ठेवल्याने स्वत:ही तृप्त झाल्या आहेत! असो, जसे तारांगणी लक्षावधी ग्रह-तारे तसे श्रीस्वामींचे अगणित भक्त!

ते असंख्य भक्त आता अक्कलकोटच्या दिशेने निघत आहेत. गुरुमंदिरात दर्शनास आल्यावर त्या सर्वांना विन्मुख जावे लागता नये. त्यांनाश्रीस्वामी-प्रसादाचे दोन घास तरी मिळावेत ही श्रीस्वामींच्या चरणी मन:पूर्वक प्रार्थना!… लवकरात लवकर ही प्रार्थना फळास यावी..

Please follow and like us:

Leave a Reply