अविश्वास…

अविश्वास भाग १

साधारण दुपारची वेळ क्लास संपून घरीच निघाले होते मी सकाळी घरातून काहीच खाऊन न निघाल्याने भुकेने पोटात कावळ्यांनी हाहाकार माजवला होता. कडक उन्हामुळे सतत तहान लागत होती त्यामुळे घरून पिण्यासाठी घेतलेले पाणीही संपून गेले होते. कधी घरी पोहोचेन असे झाले होते. आधीच क्लास मधून निघायला वेळ झाल्याने १२.४० ची बस चुकली होती त्यामुळे फार वैतागले होते. दुसऱ्या बसची वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता बस थांब्यावर ऊन लागत नसले तरी उन्हाच्या झळा मात्र बेजार करत होत्या. गर्मीने लालबुंद झालेल्या चेहऱ्यावर केसातून निघणारी घामाची धार पुसत त्या दिवसाला मनातल्या मनात शिव्या घालत मी पुढच्या बसची वाट पहात होते. बारावीची परीक्षा फर्स्ट क्लासने पास झाल्यामुळे दिलेल्या शब्दा प्रमाणे बाबांनी मला मोबाईल घेऊन दिला होता. तेव्हा स्मार्ट फोन वेगैरे काही नव्हते फक्त येणारे जाणारे फोन घेणे आणि मेसेज करणे इतकाच काय तो वापर व्हायचा त्या फोनचा. पण, तेव्हा तो फोन वापरणारी आमच्या गावात मी एकमेव मुलगी होते त्यामुळे फार हवेत असायचे तेव्हा मी. बराच वेळ झाला तरीही बस काही येत नव्हती त्यामुळे माझा पारा चढलेलाच होता. तितक्यात फोनची रिंग वाजली, मी फोन घेतला समोरून आवाज आला आवाज एका तरुण मुलाचा होता फार अदबीने त्याने विचाराले, हॅलो सागर आहे का ? मीही पहिल्यांदा उन्हाने वैतागलेली असूनही गुणी मुली सारखे अदबीनेच उत्तर दिले नाही राँग नंबर आणि फोन ठेऊन दिला. काही वेळाने पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला आता जरा वैतागूनच बोलले हे पहा हा सागरचा नंबर नाही आणि आमच्या घरात काय आमच्या गावातही कोणी सागर नावाचा मुलगा रहात नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा फोन करून मला सतवू नका. असे म्हणून मी पुन्हा फोन ठेऊन दिला. काही वेळाने पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला. मी फोन घेतला आणि खूप वैतागून म्हणाले आता काय ? समोरून पुन्हा तितक्याच अदबीने तो तरुण म्हणाला मॅडम sorry मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देत आहे पण माझ जरा ऐकून तरी घ्या. मी थोड्या कमी रागाने म्हणाले हा बोला काय. तो तरुण म्हणाला नसेल कदाचित हा नंबर सागरचा पण जरा प्रेमाने बोललात तर तुमचे पैसे जाणार नाहीत तसा आवाज खूप गोड आहे तुमचा प्रेमाने बोललात तर आणखी गोड वाटेल ऐकणाऱ्यांच्या कानाला. आणि मी त्यावर काही बोलण्याआधीच त्याने फोन ठेऊन दिला. त्याच्या बोलण्याने क्षणभर मीही  विचारात पडले कोण होता तो, माझा दिवस खराब आहे म्हणून मी त्याच्यावर का वैतागले. छे चुकलेच मी. कदाचित खरच चुकून फोन लागला असेल असेही आपलाही लागतोच ना कधी कधी राँग नंबर. मग मात्र स्वतःचाच राग आला आपण त्या मुलाला असे नव्हते बोलायला पाहिजे होते. मनात वाटले सॉरी बोलू का त्याला फोन करून. पण पुन्हा वाटले नाही नको त्याला काही तरी वेगळे वाटायचे. त्याचा फोन आलेला ते एका अर्थाने बरेच झाले होते. त्याच्या त्या फोनच्या नादात आरामात माझा अर्धा तास गेला. आणि त्या अर्ध्या तासात मी माझी भूक तहान पूर्णपणे विसरूनच गेले. काही वेळाने बस आली आणि मी घरी गेले घरी जाऊन आईला सर्व सांगतच होते तितक्यात पुन्हा त्याच नंबर वरून फोन आला मी आई पासून बाजूला जात फोन घेतला कारण मलाही त्या मुलाला सॉरी बोलायचेच होते. मी हेलो म्हणताच समोरून तो म्हणाला सॉरी हा madam चूक माझीच होती माझा मित्र सागर आणि तुमचा फोन नंबर यात एकाच अंकाचा फरक आहे आणि घाई घाई मध्ये मीच चुकीचा नंबर घेतला होता. मघाशी मी जर काही कमी जास्त बोललो असेन तर खरच सॉरी. मी म्हणाले ठीक आहे बर झाल तुम्ही फोन केलात कारण मी मघाशी उगाचच तुमच्याशी रागाने बोलले त्या बद्दल मलाही तुमची माफी मागायचीच होती. हे बोलून झाल्यावर मात्र मी त्या अनोळखी मुलाला तो माझा जवळचा मित्र असल्या सारखा माझ्या वैतागाण्याचे कारण सांगू लागले. आणि तोही बिचारा काहीही न बोलता मी त्याची जवळची मैत्रीण असल्यासारखा माझे बोलणे ऐकू लागला. माझे बोलून झाल्यावर पटकन म्हणाला अच्छा म्हणजे भूक लागलेली म्हणून इतक्या चिडल्या होतात काय तुम्ही मी म्हणाले हो ना कि, लगेचच तो ही म्हणाला मग तुम्ही अगदी माझ्याच सारख्या आहात कारण मलाही भुक लागली कि माझी चिडचिड होते. बर ते जाऊ दे आता तरी काही खाल्ले कि नाही ? मी म्हणाले नाही ना हे काय आताच घरी आले फ्रेश झाले आणि तुमच्याच बद्दल आई सोबत बोलत होते आणि  तितक्यात तुमचा फोन आला. ते ऐकून मात्र तो त्याचा माझ्यावर फार हक्क असल्या सारखा मला म्हणाला हो का मग पुन्हा एकदा सॉरी मी तुमच्या जेवणाच्या वेळेत तुम्हाला फोन केला आधी फोन ठेवा आणि जेवून घ्या. आणि जेवण झाले कि मला एक मिस कोल द्या मी पुन्हा फोन करतो. आणि त्याने फोन ठेऊन दिला.
जेवणही मी त्याचाच विचार करत केले किती अधिकाराने बोलत होता तो माझ्या सोबत अजून तर मला त्याचे नाव गाव पत्ता काहीही माहित नव्हते. आणि त्याला तरी कुठे माहित होते माझ्या बद्दल त्यानेही मला माझे नाव गाव पत्ता काहीही विचारले नव्हते. मनात विचार केला राहूदे कोण असेल काय माहित कशाला ओळख पाळख नसताना कोणाशीही बोलायचे  नको त्याला मिस कॉल द्यायला. जेवण झाले त्याचा विचार डोक्यात चालूच होता तितक्यात एक छानसा मेसेज आला त्याच्या नंबर वरून. मी जाणून बुजून उत्तर द्यायचे टाळले आणि माझी मी स्टडी करत बसले. पुन्हां काही वेळाने मेसेज आला मी पुन्हा दुर्लक्ष केले. असे दिवसभर चार पाच मेसेज आले असतील त्याचे, ते वाचतही होते आणि खरॆ सांगायचे तर मला ते मेसेज फार आवडतही होते पण काय माहित का मला त्याला उत्तर द्यायची किंवा त्याच्या सोबत बोलण्याची जराही हिंमत होत नव्हती. मग रात्री झोपण्याआधी पुन्हा गुड नाईटचा छानसा मेसेज आला त्याच्याकडून आणि शेवटी लिहिले होते. मला तुमचे नाव माहित नाही मी अनोळखी आहे. त्यामुळे तुमच्या मनात शंका येणे स्वाभाविक आहे, ठीक आहे माझी काही हरकत नाही तुम्हाला माझ्या सोबत बोलायचे कि नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे बोलावेसे वाटले तर नक्की मेसेज करा. मी नक्की बोलेन तुमची सोबत मला आवडेल तुमच्या सोबत बोलायला आणि आणखी एक तुमचा आवाज खरच खूप छान आहे तुमचे नाव मला माहित नाही पण मला जर तुमचे नाव ठेवण्याचा अधिकार मिळाला असता तर मी नक्कीच तुमचे नाव मधुरा ठेवले असते. मधुर आवाजाची मधुरा. त्याचा शेवटचा मेसेज वाचून मात्र मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि मी त्याला मेसेज केला “अबोली” नाव आहे माझे. त्यानंतर त्याचा लगेचच मेसेज आला धन्यवाद अबोली नाव पण तसॆ खूप साजेसे आहे तुम्हाला, फारच कमी बोलता तुम्ही. आणि हो मी “सर्वेश” नाशिकला रहातो bsc च्या शेवटच्या वर्षाला आहे. तुमचे कोणते गाव? मी मेसेज केला सातारा. त्या रात्री बराच वेळ आम्ही बोलत राहिलो बोलता बोलता मी कधी झोपले मला कळालेच नाही तो मात्र मेसेज करतच होता. सकाळी उठून पहाते तर त्याचे खूप मेसेज आले होते. हेलो आहात का ? झोपलात का ? अच्छा उद्या बोलू मग झोपा आता ……मेसेज पाहून मला हसू आले शेवटचा मेसेज साधारण ४.५० चा होता. मनात वाटले वेडा आहे का हा मुलगा किती वेळ जागा रहातो आता काय उठणार नाही बारा वाजे पर्यंत. मी आपले रात्री झोपून गेल्या बद्दल त्याला एक सॉरीचा आणि गुड मोर्निंगचा मेसेज केला. मेसेज केल्याच्या दुसऱ्या मिनिटाला त्याचा रिटर्न मेसेज आला. very good morning. क्षणभर आश्चर्यच वाटले मला. अगदी पहाटे झोपलेला हा अजून जागा आहे कि, आता उठला असेल मी मेसेज केला झोप झाली कि नाही? त्याचे उत्तर आले हो केव्हाच आवरूनही झाले आता कॉलेजला निघालो आहे. त्याला मेसेज केलां तेव्हा मी नुकतीच अंथरुणातून उठले होते तेही त्याच्या आधी झोपून आणि हा आवरून कॉलेजला निघाला ही. खरच माझ्यासाठी तर एकप्रकारचे आश्चर्यच होते ते.
पुढे मग रोज कॉल मेसेजवर बोलणे सुरु झाले. त्याच्यासाठी तुम्ही ची तू कधी झाले हेही कळाले नाही मला. पण काय माहित का तो मला कधीही त्याला एकेरी बोल असा म्हणाला नाही. एकमेकांबद्दल सर्व काही कळाले आवडी निवडी, खाणे पिणे, दोघांच्याही घरातील माणसे, आई-बाबा,  भाऊ-बहिनी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अगदी सर्व काही. एखाद्या दिवशी त्याने चुकून मेसेज केला नाही तरिही जीव घाबरून जायचा माझा त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. एकमेकांना कधीही न पाहिले, भेटलेले आम्ही एकमेकांच्यात नकळत खूप गुंतत चालले होतो. आमचे बोलणे सुरु होऊन त्यावेळी साधारण वर्ष होऊन गेले होते. bsc पूर्ण झाल्यावर सर्वेश mpsc ची तयारी करू लागला आणि मग एकदिवस न राहून त्यानेच त्याच्या बिनधास्त स्वभावानुसार मला लग्नासाठी विचारले. ते ऐकून मात्र मी खूप विचारात पडले खरतर मीही त्याच्यावर प्रेम करू लागले होते. माझे असे त्याच्या प्रेमात पडणे मूर्ख पणाचेच वाटेल कोणालाही. पण, माझे मलाच कळत नव्हते मी काय करत आहे ते. योग्य अयोग्य काहीही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतेच मी. गुंतले तर होते त्याच्या शिवाय एक क्षणही राहावयाचे नाही मग त्याला आयुष्यभराचा जोडीदार बनवायला काय हरकत आहे असेही वाटायचे मला. त्याने लग्नासाठी विचारले. त्याचे एकच उत्तर होते माझ्याकडे मी म्हणाले सर्वेश, एकदा मला भेटून पहा तरी मला न पहाता कसा काय इतका मोठा निर्णय घेऊ शकता तुम्ही ? त्यावर तो जे काही म्हणाला ते ऐकून मात्र मी त्याला लगेचच माझा होकार कळवला. तो म्हणाला जिथे मन गुंतले आहे तिथे चेहरा पाहून काय उपयोग मी तुझ्या मनावर मनापासून प्रेम करतो त्यामुळे तुला पहाणे माझ्यासाठी फार काही महत्वाचे नाही. पण हो तुला मला पहायचे असेल तर सांग उद्या लगेचच येतो तुला भेटायला. मला काय वाटते सांगू ,शरीर पाहून प्रेमात पडणे तर कोणीही करते. आपण पहिले असे जोडपे असू ज्यांनी आधी एकमेकांची मने पाहिली आणि मग शरीरा पर्यंत पोहोचले आणि तेही देवा ब्राम्हणाच्या साक्षीने . त्याचे विचार ऐकून मला माझ्या नशिबाचा हेवा वाटू लागला. मनाने इतका सुंदर असणाऱ्या त्याला मिळवून मी खूप खुश होते. कारण शरीर नश्वर असते आणि मन, मनातील विचार कधीही अस्थाला जात नाहीत हे मला चांगलेच कळत होते. माझे पाहिले स्वच्छ निरागस प्रेम म्हणजे सर्वेश होता. त्याच्या शिवाय दुसरे कोणीही मला माझ्या आयुष्यात नको होते. मी होकार दिल्यानंतर मात्र आमच्या प्रेमाचे आणि भावी स्वप्नांचे गोड गुलाबी दिवस चालू झाले. एकमेकांसोबतच्या स्वप्नांना आम्ही कल्पनेत जगू लागलो. लग्नानंतर आपली खोली कशी असेल, मी लग्नानंतर कोणते कपडे घालायचे, आपण फिरायला कुठे जाणार, मी काम करत असेल तर तो मला कसा येऊन सतवणार असे काहीही विषय आम्ही रंगवायचो. कधी कधी गंमतीने जेव्हा तो म्हणायचा ना अबोली मला तुझे बालपणही पहायचे आहे. मला त्याच्या बोलण्यातील चावटपणा कळायचाच नाही मी वेड्यासारखी विचारायची त्याला, ते आता कसे शक्य आहे,कि आगाऊपाने तो म्हणायचा तुझ्या सारखीच एक गोड मुलगी देशील मला? कि इकडे लाजेने मी लालबुंद होऊन जायचे. आमचे नेहमी एका गोष्टी वरून भांडण व्हायचे मला मुलाची आवड होती आणि त्याला मुलीची. त्यावर उपाय म्हणून वेडा बोलायचा जाऊदे तो वादच नको ना मी रात्रंदिवस इतकी मेहनत करेन कि मग आपल्याला जुळी मुले होतील मुलगाही आणि मुलगीही. आणि मी लाजून फोन ठेऊन द्यायचे. कधी कधी म्हणायचा हे बघ अबोली काय माहेरी राहायचे ते आताच राहून घे कारण लग्न झाल्यानंतर एकही दिवस मी तुला मला सोडून माहेरी जाऊ देणार नाही आणि माहेरी गेलीचस तर मीही येणार तुझ्या मागे भलेही मला कोणी नावे ठेवली तरी चालतील. खूप छान वाटायचे त्याचे तसे छान छान बोलणे. खरतर इतका गोड नवरा सोडून माहेरी जाण्याची इच्छा ही होणार नव्हती मला याची मला पक्की खात्री होती. कधी जर रात्री त्याचे उशिरा मेसेज आले तर मी विचारायचे कुठे होतात इतका वेळ तर बोलायचा मित्रांच्यात होतो मग मी खूप रागवायचे तर म्हणायचा लग्न होई पर्यंतच ग नंतर तू हाकलून लावलेस तरी जाणार नाही तुला सोडून ,त्याचे बोलणे ऐकून खूप हसू यायचे मला. मग गंमतीने मीही बोलायचे आणि कधी गेलात आणि उशिरा आलात तर मी आईबाबांच्या खोलीत जाऊन झोपणार तर त्यावर म्हणायचा ए नाही हा असे नाही करायचे. आणि जरी केलेस तर त्यात काय मी निर्लज्य आहे मीही येणार आईबाबांच्या खोलीत आणि तुझ्या बाजूला येऊन झोपणार.
असेच हसत खेळत आमच्या काल्पनिक जगात आम्ही सुखाने रहात होतो. आणि खूप खुशही होतो मग हळूहळू मी त्याच्या बद्दल घरात सर्वांना सांगू लागले. माझा मोठा भाऊ कराडला शिक्षणासाठी रहात होता त्याला माझ्या आणि सर्वेश बद्दल सांगण्यासाठी मी खुप अधीर झाले होते. हे सर्व मी त्याला फोनवरही सांगू शकत होते पण, मला त्याला समोर सर्व व्यवस्थीत समजावून सांगायचे होते त्या आधी हे सर्व मी माझ्या मोठ्या बहिणीला सांगितले तिने मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला कारण त्यांनी कोणीही काय मीही कधी सर्वेशला पाहिले नव्हते. त्याने जे काही मला सांगितले फक्त ते आणि तेच मला ठाऊक होते आणि तेच मी खरे मानत होते. घरच्यांना समजावणे माझ्यासाठी फार कठीण होत होते. माझी तगमग सर्वेशच्या लक्षात आली आणि एक दिवस त्याने त्याच्या घरच्यां सोबत माझ्या घरी आमच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी यायचे ठरवले. त्याच्या या निर्णयाने मात्र माझा जीव भांड्यात पडला. आणि मग त्यानंतर मी आईलाही त्याच्या बद्दल सहज बोलू शकले आईची एकच अट होती. कि, जरका सर्वेश तिला आणि बाबांना आवडला नाही तर मी सर्वेशचा विचार पूर्णपणे मनातून काढून टाकायचा. ही अट सर्वेशला कळल्यावर मात्र तो जोर जोरात हसू लागला आणि म्हणाला काळजी काय करतेस वेडाबाई माझ्यावर विश्वास आहे ना? इतक्या दूर राहूनही योगायोगाने आपण भेटलो म्हणजे यात नक्कीच देवाचीच मर्जी असणार आणि जिथे देवानेच आपली जोडी बनवली आहे तिथे कोणीही आपल्याला विरोध का करेल ? त्याच्या बोलण्याने माझा आणखी आत्मविश्वास वाढला. पण ताईचे लग्न झाल्याशिवाय आमचे लग्न होणार नव्हते त्यामुळे तो जरी आला आणि घरच्यांची पसंती झाली तरी आम्हाला थांबावे लागणार होते. आणि सर्वेशची या गोष्टी साठीही तयारी होती. सर्वेश त्याच्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याचे आईबाबा त्याचे सर्व हट्ट सहज पूर्ण करायचे. आईबाबांची आमच्या लग्नाला काहीही हरकत नव्हती. दादा सुट्टीवर आल्यावर आम्ही सर्वेश आणि त्याच्या घरच्यांना बोलावणार होतो दादा आला मी त्याला सर्वेश बद्दल सर्व काही सांगितले आणि दादाही त्याला एकदा पाहण्यासाठी तयार झाला. मी खूप खूप आनंदात होते ही आनंदाची बातमी मी सर्वेशला सांगण्यासाठी अधीर झाले होते. मी पटकन त्याला मेसेज केला एक आनंदाची बातमी आहे. नेहमी प्रमाणे दोन मिनिटात त्याचे उत्तर येईल असे मला अपेक्षित होते पण त्याचे उत्तर आले नाही. न राहून काहीवेळाने मग मी त्याला कॉल केला पण त्याने माझा कॉलही घेतला नाही. दोन दिवस सलग तो माझा फोन घ्यायचे टाळत राहिला आणि तिसऱ्या दिवशी तो नंबर बंद येऊ लागला. पुढे सलग एक वर्ष मी त्या नंबर वर फोन करायचे पण तो नंबर कधी लागलाच नाही.
              सर्वेशची वाट पहात जवळ जवळ वर्ष गेले त्याच वर्षी ताईचेही लग्न झाले. तिच्या लग्नातच मलाही एक स्थळ आले मुलगा सॉफ्ट वेअर इंजीनिअर होता, ताईच्याच नात्यात होता. शिवाय एकुलताएक दोन बहिणी होत्या त्यांना पण त्या दोघींचेही लग्न झाले होते. आई शिक्षिका आणि वडील बँकेत नोकरीतून निवृत्त झाले होते. इतके छान स्थळ चालून आल्यावर आईने मला माझे मत विचारले. त्यावेळीही मला सर्वेश परतून येण्याची आस होती. मी आईकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिले आणि तिला काहीही न बोलता माझ्या डोळ्यातील अश्रू लपवत मी माझ्या खोलीत जाऊन माझ्या मनातील भावनांना वाट करून दिली. आईला माझी अवस्था समाजात होती पण शेवटी आईच ती लेकराच्या चांगल्या वाईटाचा विचार करणारच ना. खरतर कोणालाही हेवा वाटेल असेच स्थळ होते ते. आईने काही दिवस टाळाटाळ केली खरी पण त्यांच्याकडून सतत विचारणा होत होती. शेवटी न राहून आईने दादाला माझ्या सोबत त्या स्थळाबद्दल बोलायला सांगितले. एके दिवशी अशीच रात्री जेवण झाल्यावर मी घराच्या गच्चीवर शतपाऊली करत असताना दादाही वर आला. तो येऊन माझ्या बाजूला उभा होता तरीही माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते. आकाशात छान पोर्णिमेचा चंद्राने या ढगातून त्या ढगाआड लपाछपीचा खेळ खेळून मला त्याच्यात गुंतवून ठेवले होते. दादाने माझ्याकडे पाहिले आणि थोड्यावेळाने त्या चंद्राकडे पहात म्हणाला काय पहातेस त्या चंद्राकडे आज रीजवत आहे तो आपल्या मनाला पण उद्या नसेल तो. अशा गोष्टीत मन गुंतावायाचेच कशाला ज्या फक्त काही क्षणासाठी आपल्याला सोबत देतात. दादाला काय बोलायचे होते ते माझ्या लक्षात आले. आणि ओघाने माझा मनस्थीती प्रमाणे माझ्या तोंडून दादाच्या प्रश्नाला उत्तर निघून गेले. हो उद्या नसेल तो कदाचित पण पुन्हा येणार आहे ना मग तो क्षणिक कसा? त्याला ठाऊक आहे आपल्या सारखे कित्येक जीव त्याला पहाण्यासाठी रोज घराच्या छतावर येतात. दादा लगेचच माझ्या त्या बिनबुडाच्या वक्तव्यावर उत्तरला त्याला जर इतरांच्या वाट पहाण्याची जाणीव असती तर त्याने इतकी वाट पहायला कशाला लावले असते ते ही एक दोन नाही तर तब्बल एक वर्ष, किंबहुना त्याहून जास्त. दादाच्या म्हणण्यावर माझे डोळे टचकन भरले. आता मात्र माझ्याकडे त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. विषय टाळण्यासाठी मी तिथून निघू लागले दादाने माझा हात पकडला आणि म्हणाला छोट्या थांब आज अशी नाही जाऊ देणार मी तुला. तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. मी दादाकडे पाहिले आणि म्हणाले काय उत्तर देऊ दादा मी तुला काही प्रश्नांची उत्तरे तर अजून मलाही मिळालेली नाहीत. दादा म्हणाला, मग का गुंतून रहातेस अशा निरर्थक प्रश्नांमध्ये ज्याची उत्तरेच नाहीत आणि कधी मिळतील कि, नाही हेही ठाऊक नाही. हे बघ बाळा सर्वेशला यायचेच असते तर तो केव्हाच आला असता. निसर्गाचा नियमच आहे राजा इथे कोण कोणासाठी थांबत नाही. इथे एखादा माणूस गेला तर दोन चार दिवसच त्याचे नातेवाईक रडतात आणि मग हळू हळू विसरून जातात. आणि तू वेड्यासारखी कोणत्याही खात्री शिवाय गेले वर्षभर अशा मुलासाठी झुरत आहेस ज्याला तू कधी पाहीलेही नाहीस. स्वतःला त्रास करून घेऊन एकटे राहून तुझ्या मनाला शांतता मिळत असेल कदाचित पण, तुला असे घुसमटत जगताना पाहून आम्हाला किती यातना होत असतील याचा का नाही विचार करत तू? तुझी मनस्थिती काय असेल याची आम्हाला जाणीव होती आणि आहे आणि त्याचसाठी आजवर आम्ही तूला यातून सावरण्यासाठी वेळ देत होतो. पण, तू मात्र यातून सावरण्यापेक्षा आणखी जास्त गुंतत गेलीस यात. दादाचे बोलणे ऐकून मला आणखी जास्त रडू आले. दादाने मायेने मला जवळ घेतले आणि म्हणाला घे रडून बाळा पण आज शेवटचीच तुझ्या या डोळ्यातील अश्रूं सोबत सर्वेशच्या आठवणीही धुवून घालव. उद्यापासून तू मला आधी होतीस तशीच अपेक्षित आहेस आठवते तुला किती मस्ती करायचो तू ताई आणि मी. मी ताईची बाजू घेतली कि, किती राग यायचा तुला. आज ताई लग्न करून गेली उद्या तुही जाशील ही अशी वेळ पुन्हा थोडीच माझ्या वाट्याला येणार आहे. आणि एकदा का माझे लग्न झाले तर मी माझ्या बायकोला सोडून तुमच्या मागे थोडीच फिरत बसणार आहे. दादा तसा बोलल्यावर मला हसू आले आणि हसत हसत मी म्हणाले, काय रे दादा तू पण. हाकलून देईन मी तुझ्या बायकोला जर तिने आमच्यापासून तुला हिसकावून घेतले तर. दादा म्हणाला, नाही ग वेडू तशी वेळच येणार नाही कधी माझ्या बहिणींसाठी मी बायको काय कोणालाही सोडून देईन. मी पुन्हा भावूक झाले आणि दादाला म्हणाले, किती करतोस रे दादा आमच्यासाठी आणि मी बघ अशी वेड्यासारखी वागून तुला त्रास देत असते. पण, आता या पुढे असे नाही होणार शप्पत तू म्हणशील तशीच वागेन मी. दादा म्हणाला नक्की ? मी म्हणाले हो अगदी शंभर टक्के. दादा म्हणाला, मग ताईच्या नात्यातून आलेल्या स्थळाला हो म्हणशील ? मी दादाकडे पाहीले आणि म्हणाले, अरे पण दादा. दादा म्हणाला, चल हो नको म्हणू पण एकदा त्यांनी पाहून तरी जाऊदे तुला, तुही मुलाला पाहू घे मी, भेटलो आहे ताईच्या लग्नात त्याला खुप छान मुलगा आहे. आयुष्याचे सोने होईल तुझ्या आणि नाहीच आवडला तुला तो तर, मग आम्ही नाही तुला फोर्स करणार. मी दादाला म्हणाले, ठीक आहे येऊदे पहायला त्यांनी माझी काही हरकत नाही.
त्यानंतर लगेचच रविवार गाठून तिकडची मंडळी मला पाहण्यासाठी आली. मला पहाण्यासाठी आलेल्या मुलाचे नाव मानस होते. मानस दिसायला जितके छान होते तितकेच छान बोलतही होते. घरात सर्वानाच ते फार आवडले. त्यांच्या आई पटकन म्हणाल्या पहाण्यासाठी येणे तर फक्त औपचारिकता आहे. आमच्या मानसला अबोली पहिल्यांदा पाहिली तेव्हाच आवडली होती. लग्न करेन तर याच मुलीसोबत असा हट्टच केला त्याने त्यामुळे आमच्याकडून तर आधीच होकार आहे. आता फक्त अबोलीही हो म्हणाली म्हणजे झाले. तितक्यात बाबा म्हणाले, तिचे काही नाही ओ ती आमच्या शब्दा बाहेर नाही आम्हालाही सर्वेश फार आवडले. हव तर आपण आता लगेचच पुढची बोलणी करू. मी घाबरून दादाकडे पाहिले. माझ्या मनातील घालमेल मानसच्या लक्षात आली असावी दादा काही बोलण्याआधी मानसच म्हणाले. मी काही बोलू का? मला काय वाटते काय घाई आहे? अबोलींना थोडा वेळ द्या. मला त्या पहील्याच पहाण्यात आवडल्या म्हणजे त्यांनाही मी आवडलोच पाहीजे असे नाही होत ना. सावकाश विचार करून त्यांना निर्णय घेऊ द्या मी आणखी काही दिवस थांबायला तयार आहे. नशीब मानसने सावरून घेतले सर्व नाहीतर बाबांनी जवळ जवळ लग्न ठरवलेच होते माझे तेव्हा. मानसला नाही म्हणावे असे काहीही कारण खरच माझ्याकडे नव्हते. पण, हो म्हणण्याचीही मला फार भीती वाटत होती. कारण माझा भूतकाळ माझा पाठलाग सोडताच नव्हता आणि त्याला घेऊन कोणाची अर्धांगिनी होणे माझ्यासाठी अगदी अशक्यच होते. त्यानंतर मात्र घरचे माझ्यावर हो म्हणण्यासाठी दबाव आणू लागले. शिवाय ते ताईचे नातेवाईक होते तिला माझ्या निर्णयामुळे काही त्रास होऊ नये याचीही भीती वाटत होती आई बाबांना. मानस तसे स्वभावाने फार समंजस वाटत होते त्यांना भेटून माझ्या भूतकाळा विषयी सांगावे का? असे मनात वाटू लागले. पण, भेटायचे कसे हा फार मोठा प्रश्न होता. मग मी दादाला मला मानसला एकदा भेटायचे आहे असे सांगितले. दादाने आमची भेट करून दिली. त्या भेटीत मी मानसला सर्वेश बद्दल सर्व काही सांगून टाकले. माझे बोलणे ऐकून झाल्यावर मानस म्हणाले, अबोली याला तुम्ही तुमचा भूतकाळ म्हणता आहो हा तर तुमच्या आयुष्यातील एक अनुभव आहे, यातून तुम्ही खुप काही शिकल्या आहात. कदाचित तुम्ही अजूनही त्याच्यावर प्रेम करत असाल पण, तो येईल कि नाही याची तुम्हाला ही खात्री नाही. तुम्ही चुकत आहात असे मी अजीबात नाही म्हणत आहे. तुम्हाला आणखी वाट पहायची असेल तर पहा माझी काही हरकत नाही. सर्वेश नाशिकचा आहे याशिवाय तुम्हाला काहीही माहीत नाही त्याच्याबद्दल नाहीतर मी नक्कीच त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता. मला खरच फार वाईट वाटत आहे कि, सर्वेशच्या बाबतीत मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. पण, एक सांगू जर कदाचीत आपले लग्न झालेच तर, सर्वेशची तुम्हाला कधीही आठवण येणार नाही इतके नक्की. आजवर मी कधीही कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलो नाही. पण, काय माहीत का तुम्हाला पहातच क्षणी वाटले कि तुम्हीच माझ्या भावी पत्नी असाल. तुम्ही आणखी वेळ घ्या हवा तर मी तुमच्या सोबत माझ्या भविष्याची स्वप्ने पहात आहे. त्यामुळे कदाचीत तुमचा भूतकाळ मला जराही खटकत नाही. पण, तुमचीही तुमच्या भूतकाळाला विसरण्याची तयारी हवी नाही तर आपल्या दोघांच्याही भविष्यावर याचे परिणाम होतील. वेळ घ्या आणि विचार करून सांगा. त्यानंतर त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला आणि म्हणाले हा माझा नंबर भावी पत्नी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून कधीही आठवण झाली तर कॉल करा.
काही दिवस गेल्यावर मानसच्या आईंचा पुन्हा फोन आला आणि त्या आमच्या निर्णया बद्दल विचारू लागल्या आईने कसे कसे त्यांना बाबा बाहेर गावी गेले आहेत ते आल्यावर बोलणी करू असे सांगितले. फोन येऊन गेल्यावर आई माझ्यावर चिडचिड करू लागली. काय करावे काय नको मला काहीच सुचत नव्हते. मग मी मानसला फोन केला आणि त्यांच्या आईंना थोडे दिवस थांबवून ठेवण्यास सांगितले. त्या फोन मुळे मानसकडे माझा फोन नंबर गेला. आणि त्यानंतर मानस मला रोज गुड मोर्निंग गुड नाईटचे छान छान मेसेज करू लागले. पुढे पुढे मीही त्यांना रिप्लाय देऊ लागले. आमच्यात छान मैत्रीही झाली आणि एक दिवस मानस कडून तो मेसेज आला ज्याने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले मेसेज मध्ये लिहीले होते अबोली राग येणार नसेल तर एक बोलू तुमचा आवाज खूप गोड आहे तुम्ही जेव्हा कधी माझ्या सोबत बोलता तेव्हा फोन ठेऊच वाटत नाही असे वाटते ऐकत रहावे तुम्ही जे जे बोलाल ते. इतका गोड आवाज आहे म्हणूनच कदाचित तुम्ही बोलण्यात थोडी कंजुसी करता नावाला अगदी साजेसे व्यक्तिमत्व आहे तुमचे ”अबोली ” फार कमी बोलणारी. मानस जवळ जवळ सर्वेश सारखेच होते कधी कधी वाटायचे मी सर्वेशला पाहिले नाही पण तो नक्कीच मानस सारखाच असेल. मला जे हवे होते ते मला माझ्या आयुष्यात मिळत होते मानसच्या येण्याने सर्वेशला मी हळूहळू विसरत चालले होते. आणि मग काही दिवस गेल्यावर मी सर्वेश सोबत लग्नासाठी आई जवळ माझा होकार सांगितला.
लग्नाची तयारी सुरु झाली लग्न पत्रिकाही छापल्या होत्या मी माझ्या भावी आयुष्याच्या स्वप्नात पुन्हा एकदा छान रमून गेले होते आणि अचानक एक अनोळखी नंबर वरून फोन आला. समोरून एका मुलाचा आवाज आला हेलो …..तो आवाज ऐकल्या बरोबर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण तो आवाज दुसऱ्या कोणाचाही नसून सर्वेशचाच होता. थोडावेळ रडून झाल्यावर मी सर्वेशला ताड ताड बोलू लागले का केला आहे आता कॉल तुम्ही? कुठे होतात तुम्ही? का गेलात असे मला न सांगता? त्यावर सर्वेश म्हणाला, सांगतो सर्व सांगतो तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊनच आलो आहे. मी म्हणाले, आलो आहे म्हणजे कुठे आहात तुम्ही आता? त्यावर सर्वेश म्हणाला मी साताऱ्यात आहे. अबोली मला तुला एकदा भेटायचे आहे. मी सर्वेशला आता फार उशीर झाला आहे असे सांगितले. मी त्याला माझ्या ठरलेल्या लग्नाबद्दलही बोलले तरीही त्याने मला फक्त एकदा भेटण्याचा हट्ट केला. आणि मग काय मलाही त्याला एकदा पहाण्याचा मोह आवरता आला नाही. पण, मला मानस पासून लपवून काहीही करायचे नव्हते. मी मानसला सर्वेश साताऱ्यात आल्याचे सांगितले त्याने मला भेटायला बोलावले आहे हे कळाल्यावर मानस फार विश्वासाने मला म्हणाले, जा ना मग विचारतेस काय त्या भेटीमुळे कदाचीत तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरेही मिळतील तुला आणि पुढे काय करायचे त्याचेही उत्तर मिळेल. त्यावर मी मानसला म्हणाले, आणि जर मला त्याला सोडून परत येता आले नाही तर ? मानस म्हणाले तरीही काही हरकत नाही मी तुला भूतकाळ विसरून माझ्याकडे यायला सांगितले होते तुझा भूतकाळ तुझ्या भविष्यासोबत परत येत असेल आणि तू त्यात खुश असशील तर मी नाही अडवणार तुला. आणि हो घरात कोणाला बोलली आहेस का सर्वेश बद्दल? मी नाही म्हणून सांगितले कारण घरचे मला परवानगी नाही देणार याची मला खात्री होती. मानस म्हणाले, ठीक आहे जा पण एकटी जाऊ नको कोणाला तरी घेऊन जा सोबत. तुझी हरकत नसेल तर मी सोबत आलो तर चालेल का ? मी म्हणाले, नाही नको मला तुम्ही सोबत असाल तर बोलता येणार नाही. मानस म्हणाले, मी दूर उभा रहतो खरतर मलाही पहायचेच आहे त्या व्यक्तीला ज्याने तुला एकदाही न पहाता, न भेटता तुला त्याच्यात इतके गुंतवले आहे. मी म्हणाले, ठीक आहे उद्या सकाळी भेटण्याची वेळ ठरली कि, मी सांगते मग तुम्हीही या.
दुसऱ्या दिवशी साधारण अकरा वाजता मानस मला सर्वेशला भेटण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आले. मला घेऊण जाताना स्वतःच्या चेहऱ्यावरचे दुखः लपवीण्याचा असफल प्रयत्न करत हसत हसत त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि काळजीच्या स्वरात म्हणाले, नक्की घरात कोणाला काही बोलली नाहीस ना? मी त्यांच्याकडे न पाहता अपराध्या सारखी नजर चोरत नाही म्हणून गाडीत बसले. आणि गाडी सर्वेशने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघाली. साताऱ्यातील एका नामांकीत हॉटेल मध्ये आम्ही भेटणार होतो. सर्वेशने त्याला ओळखण्याची खून म्हणजे तो अबोली रंगाचा शर्ट घालून येणार असल्याचे मला आधीच सांगितले होते. हॉटेल जवळ जवळ येईल तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. अखेर आम्ही पोहोचलो मी सर्वेशच्या विचारात इतकी हरवून गेले होते कि, मला आम्ही पोहोचल्याचे भानच राहिले नाही. आम्ही तिथे पोहोचल्यावर मानसने मला आवाज दिला आणि म्हणाले, अबोली पोहोचलो आपण. ते काय बोलत आहेत हे ऐकूनही मी गाडीतच बसून राहीले. मनासने पुन्हा मला आवाज दिला आणि म्हणाले अबोली काय झाले ? मी म्हणाले काय माहित काहीच कळेना ज्या क्षणाची मी इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट पहात होते आज तो क्षण अगदी काही पाऊलांच्या अंतरावर आहे माझ्यापासून आणि माझे मन मला साथ देईना. मी जे करत आहे ते योग्य आहे कि नाही हेच मला अजून कळले नाही. पण, इतक्या जवळ येऊन त्याला न भेटणे हे खरच मनाला पटत नाही. खरतर त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला तरीही कळत नाही का मन अजून त्याच्याचकडे धावत आहे. मानस म्हणाले, उत्तर अगदी सोप्प आहे कारण सर्वेश तुझे पहिले प्रेम आहे. आणि एक सांगू सर्वांनाच नाही मिळत पहिले प्रेम जर सर्वेशने तुझ्या सर्व प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली तर त्याला पुन्हा गमावू नकोस. मी हसले आणि मानसकडे पाहून म्हणाले पाहिले प्रेम ? मानस तुमचे पहिले प्रेम कोण ? मानसने नजर चोरली आणि म्हणाले तू जा पाहू आधी. इथे गाडी रस्त्यात उभी आहे आणि काहीही प्रश्न विचारते. मी म्हणाले, हो जाते पण कोण जाणे का माझे मन फार घाबरत आहे, त्याच्या पुढे जाण्याची हिंमत नाही होत आहे मला. मानस म्हणाले काही नाही होत मी आहे ना मी तुझ्या जवळपासच असेन बिलकूल न घाबरता जा मी येतोच गाडी पार्क करून. मी गाडीतून उतरले आणि हॉटेल मध्ये गेले. माझ्या पहिल्या प्रेमाला पहाण्याची उत्सुकता, मनात भीती आणि अनेक विचारांनी डोक्यात झालेली गर्दी मला आणखी अस्वस्थ करत होती. अबोली रंगाचा शर्ट घातलेला तो माझ्या समोर होता मी त्याच्याकडे चालत जात असताना त्याने मला ओळखले आणि उठून उभा राहिला. पहिल्यांदाच पहात होतो आम्ही एकामेकांना दोघांचेही डोळे काठोकाठ भरलेले मी जवळ गेल्यावर गहिवरल्या स्वरात तो म्हणाला अबोली? मी माझ्या डोळ्यातील खूप वेळापासून बाहेर पडण्यासाठी अधीर झालेल्या आसवांना आवर घालत मान हलवून हो म्हणून सांगितले. त्यानंतर तो मला म्हणाला बस ना. तो तसे बोलल्या बरोबर मी ही चावी दिलेल्या बाहुली सारखी गपचूप त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले. त्यांनतर बराचवेळ आम्ही, त्याचे लक्ष नसताना मी आणि माझे लक्ष नसताना तो एकमेकांकडे चोरून पहात होतो. पुढे काय निर्णय घेऊ माहित नव्हते पण, एकामेकांना आठवणीच्या स्वरूपात जवळ ठेवावे म्हणून मनात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. काही वेळाने वेटर जवळ येऊन म्हणाला काय ऑर्डर आहे साहेब? सर्वेशने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला काय घेणार तू अबोली? मी काही नाही, असे उत्तर दिल्यावर म्हणाला काहीतरी सांग ना काही न घेता इथे थांबणे बरोबर वाटत नाही. मी म्हणाले नाही मला खरच काही नको तुम्ही घ्या तुम्हाला जे हवे ते. मग त्यानेच ऑर्डर दिली एक स्ट्रोबेरी आईसक्रिम विथ मिल्कशेक आणि कोल्ड कॉफी. ऑर्डर देऊन झाल्यावर मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले मला तसे पहाताना पाहिल्यावर तो म्हणाला. हे तेच हॉटेल आहे ना जिथे तू आणि तुझे फ्रेंड्स कोणाचा बड्डे असेल तर सेलिब्रेट करायला यायचे आणि तू मला सांगितलेही होतेस इथले स्ट्रोबेरी आईसक्रिम विथ मिल्कशेक तुला फार आवडते. आता मात्र माझा माझ्यावरचा ताबा सुटला आणि मी त्याला फाडफाड बोलू लागले अच्छा आहे का तुमच्या लक्षात अजूणही सर्व ? आणखी काय काय लक्षात आहे तुमच्या मला फसवून काहीही न सांगता निघून गेलात ते आहे का लक्षात तुमच्या? कि आठवण करून देऊ. का असे वागलात सर्वेश एकदा सांगायचे तरी मला कि माझे काय चुकले होते, काय झाले होते, का कशासाठी माझ्या भावनांन सोबत असे खेळलात? सर्वेश म्हणाले बोल आणखी बोल मी खरचच तुझा अपराधी आहे मला काय करावे काहीही सुचत नव्हते एकदिवस अचानक मला तुझ्या बॉय फ्रेंडचा कॉल आला कि, तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता आणि लग्न करणार आहात तेव्हा मला काही सुचलेच नाही आणि मी तू मला फसवलेस या भावनेने तुझा तिरस्कार करू लागलो. हे ऐकून मात्र मला धक्का लागला मी आश्चर्याने सर्वेशला म्हणाले काय वेड्या सारखे बडबडत आहात कोण बॉय फ्रेंड ? कोणी कॉल केला होता तुम्ही भेटण्याआधी मी तुमच्या शिवाय कधीच कोणत्या मुला सोबत बोललेही नव्हते. काहीही कारण देऊ नका. सर्वेश म्हणाले नाही ग माझ्यावर विश्वास ठेव खरचच मला फोन आला होता माझ्या अजूनही तो नंबर लक्षात आहे. त्यानंतर मी तो नंबर ऐकला आणि अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण तो नंबर दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नसून माझ्या मोठ्या भावाचा माझ्या दादाचा होता.

      सर्वेशला भेटल्यानंतर मी मानसला पूर्णपणे विसरूनच गेले होते. पण, मानस कधीच माझ्या नकळत हॉटेलमध्ये येऊन बसले होते. त्यांना तिथून मी आणि सर्वेश स्पष्ट दिसत होतो आणि कदाचित आमचे बोलनेही त्यांना स्पष्ट ऐकू जात होते. सर्वेशला खोटा फोन करणारा मुलगा माझा सख्खा मोठा भाऊ आहे हे कळाल्यावर मात्र मी पुरती कोसळून गेले आणि त्या धक्याने माझा तोल जाऊ लागला. माझा तोल जाताना पाहून मात्र मानसला रहावले नाही. मानस धावत धावत माझ्याकडे आले त्यांनी मला पाणी दिले आणि विचारले तू ठीक आहेस ना? जे चालू होते ते काहीही सर्वेशच्या लक्षात येत नव्हते चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन सर्वेश माझ्या आणि मानसच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. समोरच्याच्या मनातील अचूक हेरणाऱ्या मानसला सर्वेशच्या मनात काय सुरु आहे हे ही लगेचच लक्षात आले. आणि ते मानसकडे पाहून म्हणाले, नमस्कार मी ‘’मानस सरनोबत’’. सर्वेश म्हणाला, नमस्कार मी सर्वेश, त्यावर मानस सर्वेशला म्हणाले, हो मी ओळखतो तुम्हाला. अबोली बोलली आहे मला तुमच्याबद्दल. त्यावर सर्वेश म्हणाला माफ करा पण, मी तुम्हाला नाही ओळखले. मग मानस म्हणाले, तशी काही खास ओळख नाही माझी पण, हळू हळू होईल आपली ओळख. जेव्हा तुमचे आणि अबोलीचे लग्न होईल. मी आश्चर्याने मानसकडे पाहू लागले त्यावर मानस म्हणाले, होय अबोली माफ कर खरतर मी दुरूनच सर्वेशला फक्त पहाणार होतो. पण, मला तुझ्यासोबत काहीही अन्याय होऊ द्यायचा नव्हता. म्हणूनच मुद्दाम तुमचे बोलणे ऐकू येईल इतक्या अंतरावर येऊन बसलो. खर सांगू आता पत्रीकाही छापल्या आहेत, लग्नाची सर्व तयारीही झाली आहे, मानस स्वभावाने आणि मनानेही खूप छान आहेत म्हणून, तू माझ्यासोबत लग्न करशील असे मला खरच नको आहे. मी मघाशी तुला काय बोललो होतो? जर का तुला तुझ्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली तर तू तुझे पहीले प्रेम गमवायचे नाहीस. आणि खरच सांगतो मला वाटते जे झाले त्यात सर्वेशची एकट्याचीच चूक नाही. आणि असेल तर काही फरक पडत नाही. निदान मला तरी नाही कारण, सर्वेशवर तुझे किती प्रेम आहे हे पाहीले आहे मी तुझ्या डोळ्यात. मला काय बोलावे काहीच कळत नव्हते. मी सर्वेशकडे पाहीले आणि म्हणाले, एक सांगा सर्वेश इतक्या दिवसांत तुम्हाला मला तुमच्या मनातील शंका विचारावीशी वाटली नाही किंवा मला एकदा भेटावेसेही वाटले नाही. मग, आज अचानक का? त्यावर सर्वेश म्हणाले, अबोली जसे तुला माझ्या जाण्याच्या दुखाःतून सावरायाला वेळ लागला होता, तसेच मलाही तू मला फसवले आहेस या भावनेतून सावरायला वेळ लागला. काही वेळ गेल्यानंतर मात्र माझ्या घराचे माझ्या लग्नाचा विचार करू लागले. माझे लग्न माझ्या वहीनीची बहीण ‘’मेघा’’ सोबत ठरवण्याचे चालू होते. मेघा आणि मी एकमेकांना चांगले ओळखायचे. आमच्यात छान मैत्रीही होती. तिच्या सोबत मी लग्नाला तयार ही झालो पण, हरवल्या सारखा सतत तुझ्या विचारात दंग असायचो. तुझ्या वरच्या रागाने लग्नाला तयार तर झालो पण, मन मानत नव्हते. ही गोष्ट मेघाच्या लक्षात आल्यावर तिने मला माझ्या अश्या वागण्याचे कारण विचारले. त्यानंतर मी, तिला आपल्या बद्दल सर्व काही सांगितले. अगदी आपल्या एकमेकांपासून दूर जाण्या पर्यंत सर्व काही. त्यानंतर तिनेच मला माझ्या चुकुची जाणीव करून दिली. मी तुझ्या सोबत एकदा तरी बोलायला हवे होते असे तिने मला सांगितल्यावर मात्र मला माझ्या मूर्खपणाची जाणीव झाली आणि मी लगेचच तुला भेटण्यासाठी निघालो. माझ्या मनात आता तुझ्या बद्दल काहीही शंका नाही तुला गमावूनही मी कधीच तुझ्यापासून दूर जाऊ शकलो नाही. याचा अर्थ मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मी तुझी माफी मागतो आणि पुन्हा कधीही तुला अशी एकटी सोडून जाणार नाही असे मी तुला वचन देतो. सर्वेशचे बोलून झाले तरी मी शांत बसले होते. ते पाहून मानस मला म्हणाले अबोली, काय विचार करतेस? मला वाटत सर्वेशला एक संधी द्यायला हवी आहेस तू. आणि हो माझा विचार करत असशील तर प्लीज करू नको मी काय काल परवा आलो आहे तुझ्या आयुष्यात. आणि तसेही तुझी इच्छा नव्हतीच कधी माझ्या सोबत लग्न करण्याची. मी जेव्हा जेव्हा तुला भेटलो तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात मला एक शोधच दिसत होता. तो शोध ज्यात तुझे डोळे तुझ्या हरवलेल्या प्रेमाला शोधत होते. काहीही काळजी करू नको आपले लग्न तुटेल, नातेवाइकांच्यात चर्चा होईल याचाही विचार करू नको ते सर्व मी संभाळेन, आपले लग्न तुटण्याची सर्व जवाबदारी मी माझ्यावर घेईन. पण, तू तुझ्या प्रेमाला जाऊ देऊ नकोस. आधीच तुम्ही दोघांनी खूप सहन केले आहे आता नाही. असे म्हणून, मानस जायला निघाले त्यांनी सर्वेशला मिठी मारली आणि सातारी भाषेत त्याचा निरोप घेतला. म्हणाले, चल भावा येतो ऑल दी बेस्ट. आणि मनातील भावनांना आवर घालत स्वतःचे पहीले प्रेम दुसऱ्याच्या सुखासाठी तिथेच सोडून मानस माझ्याकडे एकदा पाहून तिथून नुघून गेले. खरच खूप मोठे मन होते मानसचे. बऱ्याच लोकांचे असे मानने आहे कि, प्रेम म्हणजे जीवन, प्रेम म्हणजे साधना आणि प्रेम म्हणजेच सर्व काही. पण, तसे नसते हे, मी मानस कडून शिकले मानसने मला न बोलताही हे शिकवले प्रेम म्हणजे दुसऱ्यांसाठी जगणे, प्रेम म्हणजे दोन्ही हाताने भरभरून देणे आणि प्रेम म्हणजेच इतरांच्या सुखःतच आपलेही सुख मानने. मानस निघून गेले त्यानंतर मी आणि सर्वेश बराच वेळ बोलत राहीलो माझे बोलून झाल्यावर मी घरी जायला निघाले, हॉटेल मधून बाहेर आल्यावर पहाते तर काय पार्किंग मध्ये मानसची गाडी तेव्हाही उभी होती मी गाडीच्या दिशेने गेले गाडीचा दरवाजा उघडला आणि आत जाऊन बसले. मानस स्टेरिंग वर डोके ठेऊन बसले होते. गाडीच्या दरवाजाच्या आवाजाने त्यांनी स्टेरिंग वरचे डोके वर उचलले आणि माझ्याकडे पाहीले. त्यावेळी त्यांचे डोळे प्रचंड लाल झाले होते. त्यांनी मला पाहीले आणि म्हणाले, हे काय तू इथे? मी खूप खुश होते हसतच मी त्यांच्याकडे पाहीले आणि म्हणाले, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा होता असे नाही वाटत का तुम्हाला? त्यावर ते म्हणाले अगं माझा जरा मित्र येणार आहे इथे त्याचीच वाट पहात बसलो होतो. मी म्हणाले, अच्छा हो का ? मला वाटले हम दिल दे चुके च्या लास्ट सीन मध्ये ऐश्वर्या कशी अजय देवगणकडे परत येते तशीच मीही परत येईन असे वाटले असेल तुम्हाला म्हणून, तुम्ही इथे थांबले आहात. मानस माझाकडे पाहून बळेच हसले आणि म्हणाले, वेडी आहेस का तू काहीही काय बोलतेस ? खरच मित्र येणार आहे माझा पण, तू इथे कशी? आणि  सर्वेश कुठे आहे. मग मी त्यांना सर्वेश त्यांच्या घरी गेले हे सांगीतल्यावर. मानसने माझ्याकडे आश्चर्याने पहात विचारले का? मी म्हणाले, मग काय इथेच लग्न करून घेऊन जातील काय मला? तसेही मलाही माझ्या घरच्यांसोबत बोलावे लागेलच ना? त्यांना समजवावेही लागेल. तो त्याच्या आई बाबांना आणण्यासाठी गेला आहे. बर ते जाऊदे आधी मला घरी सोडा कधी एकदाची ही आनंदाची बातमी घरच्यांना सांगते असे झाले आहे मला.
त्यानंतर मानसने गाडी घराच्या दिशेने वळवली आणि आम्ही घरी जाऊ लागलो. मी मानसला विचारले मानस तुमचे मित्र येणार आहेत ना ? त्यावार मानस जरा अडखळत म्हणाले, हो येणार आहे तुला सोडले कि, येतो पुन्हा त्याला भेटायला. मी म्हणाले, मग दोन तास त्याची वाट का पहात होतात? घरी जाऊन आले असते इतक्या वेळा मध्ये. आता मात्र मानसकडे माझ्या त्या उलट तपासणी  वाल्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यानंतर ते शांतच झाले. मग काहीही न बोलता आम्ही घरी आलो. मी बाहेर पडण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतच होते कि, मानस म्हणाले, अबोली चल बाय मी निघतो. मी म्हणाले, असे कसे घरात या ना. तसेही माझी एकटी हे सर्व बोलण्याची हिंमत नाही होणार तुम्ही असाल तर मला जरा धीर येईल चला ना प्लीज. त्यानंतरही मानस काहीही न बोलता मग गाडीतून खाली उतरले आणि घरात आले. आई स्वयंपाक घरात होती आणि दादा कुठे तरी बाहेर निघाला होता. मी घरात गेल्या बरोबर दादाकडे पाहीले आणि थेट जाऊन त्याला मिठी मारली. आणि म्हणाले thank you दादा आज तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यात काय योग्य आणि काय अयोग्य ते कळाले. दादा माझ्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला, काय झाले छोटी अशी अचानक का? त्यानंतर मी दादाला मी सर्वेश आला होता आणि आता मी त्यालाच भेटून आले हे सांगीतले ते ऐकून दादाने अपराध्यासारखी मान खाली घातली. मला ते पाहून स्वतःचीच लाज वाटली मी दादाला म्हणाले, तू का वाईट वाटून घेत आहेस दादा? मला माहीत आहे हे सर्व तू त्याला पारखण्यासाठी केले असणार. तुझ्या पाठीवर पाय देऊन आली आहे तुला इतकी तर नक्कीच ओळखते मी. काय झाले असते माझे जर मी सर्वेश सोबत लग्न केले असते तर. अश्या माणसा सोबत कशी आयुष्य काढू शकले असते मी कि, ज्याचा माझ्यावर जराही विश्वास नाही. जो कोणाच्याही सांगण्यावरून माझ्यावर “अविश्वास”दाखवतो. एका अर्थी बरेच झाले तो आला ते, नाही तर जन्मभर मनात ही गोष्ट सलत राहीली असती. मानस माझ्याकडे पहात राहीले. मग मीही त्यांच्याकडे पाहीले आणि म्हणाले, काय मग मिस्टर सरनोबत लग्नाची तयारी कुठवर आली? जाव जावा लग्नाची तयारी करा. मानसने माझ्याकडे पाहीले आणि हसून अश्या भावनेने मान हालवली कि, अबोली खरच खूप वेडी आहेस तू. त्यांची ती भावना माझ्या पर्यंत पोहोचली आणि मी लाजून माझ्या खोली मध्ये गेले. त्यानंतर मानसने दादाला विचारले दादा मला जरा अबोली सोबत बोलायचे आहे. दादा म्हणाला, हो बोलवतो. मानसला माझ्यासोबत एकांतात बोलायाचे असणार असे दादाच्या लक्षात आले आणि मग दादा म्हणाला, नाहीतर असे कर  तूच जा ना तिच्या खोलीत. तसे मानस माझ्या खोलीकडे आले त्यांनी दरवाजा वाजवला. त्यावेळी मी आराश्या समोर बसून स्वतःचेच नवे रूप न्याहाळत होते. मी आतूनच आवाज दिला कोण आहे उघडाच आहे दरवाजा. मानस आता आले आणि माझ्याकडे पाहू लागले. ते आलेले मला माझ्या आराश्यामध्ये दिसल्यावर मी उठून त्यांच्या दिशेने गेले आणि म्हणाले, काय झाले मानस? काही बोलायच आहे का? तसे मानसने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, अबोली आज मी खूप घाबरलो होतो मला वाटले मी गमावले आता तुला. त्यांच्या त्या पहील्या स्पर्शाने माझ्या गळ्यातून आवाजच येत नव्हता, हृदयाचे ठोकेही प्रचंड वाढले होते. काहीवेळ मिठीत घालवल्यावर मानस मला म्हणाले, बोल ना काही तरी तू गप्प का? मी काहीच बोलत नाही ते पाहून मानस माझ्या मिठीतून बाहेर आले आणि म्हणाले, काय झाले? मी लाजेने डोळे मिटून शांत उभी होते. मी लाजले हे मानसच्या लक्षात आले आणि ते मला म्हणाले, आई शप्पत सॉरी हा माझ्या लक्षातच नाही आले. सो सॉरी …मी डोळे मिटलेलेच होते मग, मानस माझ्या खूप जवळ आले आणि म्हणाले, सवय करून घे पण आता कारण लग्न झाल्यावर मी काय माझ्या मिठीतून तुला दूर जाऊ देणार नाही. मी माझा चेहरा माझ्या हाताच्या ओंझळीत लपवत म्हणाले, इशशश….चावट कुठले काहीही बोलत असता जा पाहू तुम्ही आता. मग मानस म्हणाले, थांबू दे ना आणखी थोडा वेळ. तुला या आधी मी अशी कधीही पाहीली नव्हती. वेगळीच वाटत आहेस तू आज अगदी मला जशी अपेक्षित होतीस तशीच वाटतेस तू आज. मला खूप हसू आले मी म्हणाले, काही नाही आधी निघा येईल कोणी तरी. आणि त्यांना माझ्या खोलीतून बाहेर काढू लागले मानस म्हणाले, अग पण माझे ऐकून तरी घे….मी म्हणाले आता जे काही बोलायचे सांगायचे ते लग्नानंतर. मग मानस म्हणाले, अच्छा ठीक आहे जातो, चल बाय…. त्यानंतर त्यांचा हात प्रेमाने माझ्या गालावर ठेऊन म्हणाले, काळजी घे हा माझ्या होणाऱ्या बायकोची. आणि ते निघून गेले. मी हसत हसत दरवाजा बंदच करत होते. तितक्यात पुन्हा आले आणि म्हणाले, अबोली एक सांगू लाजतेस तेव्हा खूप छान दिसतेस तू. मी पुन्हा लाजले ते पाहून म्हणाले, हाय ….काही खरे नाही माझे लग्नानंतर मग मी म्हणाले, तुम्ही जाता कि, नाही आता आणि दरवाजा लावून घेतला. आणि अखेर ज्या प्रेमासाठी मी माझ्या आयुष्याचे इतके दिवस वाया घालावले तेच किंबहुना त्याहून जास्त प्रेम मला मिळत आहे ते पाहून पुन्हा नव्याने आयुष्याची हसत सुरुवात केली.

Loading...

     तुझे असे अचानक येणे आणि मला तुझ्यात गुंतवून घेणे
खरच खूप अनपेक्षित होते,
अनपेक्षित असले तरी मात्र मी तुझ्यात पुरती विरून गेले होते.
तुझ्याचकडून शिकले मी प्रेमाची ती नवी भाषा,
त्याच प्रेमाच्या जगात स्वछंदे उडताना कमी पडू लागल्या मला साऱ्या
दिशा …
मग असेच एकदिवस उडत असताना तू निघून गेलास अविश्वासाच्या
जगात मला अर्ध्यात सोडून,
आणि मी मात्र मग उडनेच सोडून दिले पंखात बळ असून….,
जगू लागले मग स्वतःच्याच हरवलेल्या त्या जगात,
एकांताच्या पिंजाऱ्यात घुसमटणाऱ्या माझ्या निष्पाप प्रेमाला घेऊन.
त्यानंतर मग अचानक तो आला, मला पुन्हा उडताना पहाण्यासाठी
नव्या दिशा घेऊन,
तो आला माझ्यासाठी जगण्याची नवी आशा घेऊन,
तेव्हा मात्र पुन्हा विश्वास ठेवण्याची माझ्यात जराही  हिंमत नव्हती,
पुन्हा एकदा एकटे पडण्याची भीतीही कायम मनात होती.
हळू हळू मग त्याला ओळखू लागल्यावर गुंतू लागले त्याच्यात,
जगण्यासाठी मग एक हक्काचे आभाळ लागेल हेही आले लक्षात.
झोकून दिले मग स्वतःला त्याच्या त्या नव्या दुनियेत,
अन उडू लागले पुन्हा नव्याने आणखी उंच भरारी घेत…
त्याच आभाळाखाली आज मनसोक्त विहरते.
इवलुश्या या आयुष्यात त्याच्या सोबत आता रोज रोज नवे जीवन
जगते….

 

Loading...

Please follow and like us:

Leave a Reply