एक थोडीशी स्वार्थी पण गोड प्रेम कथा….

facebook

एकेदिवशि सकाळच्यावेळी अचानक तिझा फोन येऊन गेला. ती येणार हे कळाल्या पासून खूप अस्वस्थ वाटत होतॆ मला. खरतर ही अस्वस्थता माझ्या लग्नाआधी पासूनची होती. त्यामुळेच गेले कित्येक दिवस मी मनावर ओझे घेऊन जगत होते. कारण जे काही झाले होते ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाले होते. माझ्या चुकीबद्दल मी खूप वेळा अनिकेतला (नवऱ्याला) सांगण्याचा प्रयत्नही केला पण भीती वाटायची कि, माझी चूक कळाल्यावर त्यांनी मला माफ नाही केले तर? किंवा त्यांनी मला सोडून दिले तर ? विचार करून करून कशातही मन लागायचे नाही. काही दिवसांपासून माझी झोपही उडाली होती. ती येणार कळाल्यावर मात्र मला स्वस्थ बसवत नव्हते कारण मला ठाऊक होते माझ्या चुकीबद्दल त्यांना तिच्याकडून कळाले तर ते मला कधीच माफ नाही करणार. कशी तरी हिंमत करून त्या रात्री मी त्यांच्या सोबत बोलण्याचे धडास केले. रात्रीचे जेवण झाले किचन आवरून झाल्यावर मी आमच्या खोलीत गेले. त्यावेळी अनिकेत कंप्युटर वर काही तरी काम करत बसले होते. मी बेडरूमचा दरवाजा उघडून आता आले ते कामात खूप मग्न होते. मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहिले आणि आमचे लग्न झाल्यापासुनाचे सर्व सोनेरी क्षण आठवू लागले. अनिकेत आणि मी आमच्या वैवाहिक जीवनात खूप आंनदात होतो. आम्ही दोघांनीही आजवर कधीही एकमेकांना दुखवले नव्हते. भांडण हा प्रकार तर आमच्या घराच्या उंबरठ्या पर्यंतही यायचा नाही अनिकेत माझ्यापासून कधीही काही लपवायचे नाहीत खोट्याची त्यांना प्रचंड चीड होती. खरतर ती एक गोष्ट सोडून मीही कधीच काहीही त्यांच्यापासून लपवले नव्हते. त्यादिवशी बोलण्याची हिंमत करताना मात्र मला पक्के ठाऊक होते कदाचित ती रात्र आमच्या नात्याची शेवटची रात्र असू शकते. हळू हळू पाऊले पुढे टाकत मी त्यांच्या पाठीमागे जाऊन उभी राहिले. त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि म्हणाले, आहो किती वेळ झाला आहे झोपायचे नाही का? त्यांनी हातातले काम बाजूला ठेऊन माझ्याकडे पहिले माझा हात हातात घेतला आणि त्यांचे ओठ माझ्या हातावर टेकवून म्हणाले का ग सोना झोप आली आहे का तूला? आली असेल तर झोप ना तू माझे काम झाले कि झोपेन मी. मी म्हणाले, नाही नको होऊ दे तुमचे मग झोपते मी. तुम्हाला कॉफी करून आणू का? ते म्हणाले अगदी माझ्या मनातले बोललीस आण ना प्लीज तुझ्यासाठीही घेऊन ये आज जेवलीही नाही आहेस नीट. काय झाले आहे? चेहराही उताराल्यासारखा वाटत आहे तुझा तब्बेत ठीक नाही का तुझी? आई बाबांची आठवण येत आहे का ? मी विचार केला त्यांनी विषय काढलाच आहे तर सांगून टाकावे त्यांना सारे. मी म्हणाले अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. ते म्हणाले हो बोल ना. मी प्रयत्न केला पण माझी हिंमतच होता नव्हती विषय आणखी लांबवून मला कसे सांगावे त्याचा विचार करता यावा म्हणून मी म्हणाले, थांबा आधी मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते मग सांगेन. मी कॉफी आणण्यासाठी मागे वळले तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले काय झाले आहे सोनाली? आधी सांग, मला नको आहे आता कॉफी. मला सांगता येत नव्हते हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काम बंद केले आणि बेडवर जाऊन बसले मला म्हणाले ये इकडे माझ्याजवळ मी त्यांच्याजवळ गेले. आणि मान खाली घालून फक्त रडत होते त्यांनी माझ्याकडे पहिले माझा चेहरा वर केला आणि म्हणाले काय झाले सोना ? काही बोलशील का बोलल्या शिवाय कसे कळेल मला. रडणे थांबव आधी. मी म्हणाले, माझी नाही हिंमत होत आहे ओ. कसे सांगू मी तुम्हाला? मी तुमच्या पासून काहीतरी लपवले आहे. ते कळल्यावर तुम्ही मला सोडून जाल याची भीती वाटते मला . म्हणून सांगता येत नाही आहे. तुम्हाला मी खरे काय ते सांगितले तर तुम्ही मला माफ कराल ना ? ते म्हणाले, गोष्ट कोणती आहे याच्यावर डिपेंड आहे. आधी तू मला सांगा तर.
या सर्वाची सुरुवात झाली होती आमच्या कॉलेज पासून. मी,अनिकेत आणि माझी जिवलग मैत्रिण समीक्षा आम्ही तिघे एकाच कॉलेजला शिकत होतो. समीक्षा खूप श्रीमंत घरची मुलगी होती. पण तिला तिच्या श्रीमंतीचा जराही गर्व नव्हता. कॉलेजमध्ये आमचा दहा बारा जणांचा मिळून खूप छान ग्रुप होता. माझ्या आणि सामिक्षाच्या सर्वच गोष्टी खूप मिळत्या जूळत्या होत्या. शिवाय आमच्या आर्थिक परिस्थितीच्या. आमच्या खाण्यापिण्याच्या सवई आवडी निवाडी सर्व काही एकसारखे होते. खूप घट्ट मैत्री होती आमच्यात. त्यातच आमची अनिकेतच्या ग्रुप सोबत ओळख झाली. अनिकेत म्हणजे आमच्या कॉलेजची शान होते ते अभ्यासात जितके हुशार होते तितकेच खेळामध्ये ही हुशार होते, खेळामध्ये बरीचशी पदके मिळवून दिली होती त्यांनी कॉलेजला. अनिकेतला जवळून ओळखु लागल्यानंतर मी यांच्या प्रेमात पडू लागले. रात्रंदिवस मी फक्त त्यांचाच विचार करायचे. पण माझ्या प्रेमाबद्दल त्यांना सांगाण्याची माझी हिंमतच व्हायची नाही. मी विचार केला कि, कॉलेजला गेल्यावर सामिक्षाला सांगेन ती नक्की यावर काहीतरी उपाय सांगेल किंवा माझ्या वतीने अनिकेत सोबत बोलेल. दुसऱ्यादिवशी कॉलेजला गेल्यावर मी ब्रेकमध्ये सामिक्षा सोबत बोलण्यासाठी तिला कॅन्टीन मध्ये घेऊन गेले. त्यादिवशी समीक्षा खूप खुश होती. मी तीला काही सांगणार तितक्यात तीच मला म्हणाली, सोनू मला तुला काहीतरी सांगायचे आहे मी म्हणाले आणि मलाही. समीक्षा म्हणाली आधी मी सांगते ना प्लीज… समीक्षा स्वभावाने फार हट्टी होती ती माझे ऐकणार नाही मला ठाऊक होते मी म्हणाले तू ऐकणार थोडीच आहेस सांग, बाई काय सांगायचे आहे. समीक्षा खुप आनंदाने म्हणाली, सोनाली मी प्रेमात पडले आहे. मी तितक्याच आनंदाने म्हणाले, आई शप्पत मस्तच कोणाच्या ग? समीक्षा म्हणाली नाव सांगते पण माझासाठी तू माझ्यावतीने माझ्या प्रेमाबद्दल त्याला सांगशील असे प्रॉमिस कर आधी. मी म्हणाले समु प्रॉमिस करायची गरज आहे का ? तुझ्यासाठी मी काहीही करेन आता सांग कोण आहे तो भाग्यवान मुलगा समीक्षा म्हणाली अनिकेत….आणि मला खात्री आहे त्याचेही माझ्यावर प्रेम आहे कारण मी पाहिले आहे त्याला नेहमी मला चोरून चोरून माझ्याकडे पहाताना. सामिक्षाचे बोलणे ऐकल्यावर मी शांत झाले माझ्या डोळे पाण्याने काठोकाठ भरले पुढे काय बोलावे मला काहीच कळत नव्हते. खूप खराब अवस्था झाली होती माझी. एकीकडे माझी जिवाभावाची मैत्रीण होती आणि एकीकडे माझे पहिले प्रेम. अनिकेतला गमावणे म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातून प्रेम काढून टाकण्या सारखे होते. पण सामिक्षालाही दुःखी पाहणे माझासाठी अशक्य होते. तसे पाहायला गेले तर माझी आणि अनिकेतची कुठेही बरोबरी होत नव्हती. अनिकेतही एका श्रीमंत घरचा मुलगा होता. मी त्याच्या समोर अगदीच सामान्य होते तो माझ्याकडे पहातो असे मलाही वाटायचे पण सामिक्षामुळे मला कळाले कि, तो माझा निव्वळ गैरसमज होता. अनिकेत माझ्याकडे नाही तर समीक्षाकडे पहायचा. सामिक्षासाठी मी माझ्या डोक्यातून अनिकेतचा विचार पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न करू लागले. समीक्षाने तिचे बोलून झाल्यावर मला विचारले. आता सांग तुला काय सांगायचे होते. तिला काय सांगू मला काहीच समजत नव्हते मी म्हणाले काही नाही ग हेच सांगायचे होते मलाही अनिकेत तुझ्याकडे पाहतो तो तुझ्यासाठी अगदी योग्य आहे जर त्याने तुला प्रपोज केला तर त्याला लगेचच हो म्हणून सांग. सामिक्षा म्हणाली किती विचार करतेस ग माझ्या चांगल्या वाईटाचा. मी डोळ्यातील अश्रू लपवून तिच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले येडू तुझा नाही विचार करणार तर कोणाचा करणार? बर ऐक ना समु माझी तब्बेत ठीक नाही ग मी घरी जाते. समीक्षाने काळजीने विचारले का काय झाले? मी काही नाही जरा अस्वस्थ वाटत आहे. असे म्हणून तिथून निघाले. मला घरी जाताना पाहून अनिकेतने मला आवाज दिला पण, मी न ऐकल्या सारखे तिथून निघून गेले. त्यानंतर काही दिवस मी कॉलेजला गेलेच नाही. काही दिवसांनी कॉलेजला आल्यावर मी सामिक्षाला विचारले संगीतलेस कि नाही अनिकेतला तुझे त्याच्यावर प्रेम आहे ते ? समीक्षा म्हणाली वेडी आहेस का? माझ्यात एवढी हिंमत नाही बाबा ते काम तूच करायचे आहेस. त्यानंतर समीक्षा माझ्याकडे अनिकेतला देण्यासाठी चिठ्ठया लिहून द्यायची. मी तिच्याकडून घ्यायचे पण अनिकेतला द्यायचे नाही कारण माझ्यासाठी ते खूप अशक्य होते. मी तिला मला नाही जमणार असे सांगितले ही होते पण ऐकेल ती समीक्षा कसली. समीक्षासाठी हिंमत करून अनिकेत पर्यंत जायचेही पण त्याला चिठ्ठी देणे जमायचेच नाही मला. समीक्षा मला रोज विचारायची त्याचे काही उत्तर आले का? मी तिला म्हणून विषय टाळायचे.
आमचे ग्र्यॅज्युएशन पूर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी समीक्षा बेंगलोरला तिच्या मामाकडे जाणार होती. आणि मी आणि अनिकेतने मात्र पुढे msc साठी त्याच कॉलेजला राहिलो. समीक्षाने कधीही स्वतः अनिकेतला काहीही सांगण्याचे धाडस केले नाही. तिच्या प्रेमा बाबतीत ती पूर्णपणे माझ्या विश्वासावर बसलेली होती. ती बेंगलोरला जाण्याआधी आम्ही एका मुव्हीला गेलो होतो. त्या मुव्हीची कथा अगदी आमच्या आयुष्याशी मिळती जुळती होती. मुव्ही पाहताना एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीसाठी केलेला प्रेमाचा त्याग पाहुन मला खूप रडू आले. समीक्षा मात्र मला रडताना पाहून खूप हसत होती. मुव्ही पाहून झाल्यावरही ती माझ्यावर हसतच होती. ती मला म्हणाली वेडी कशाचेही रडू येते तुला. हे सर्व खरे थोडीच असते. काल्पनिक कथा असतात या. मी म्हणाले, काही नाही असेही होते काहींच्या आयुष्यात तुला काय माहित कदाचीत कोणाची तरी खरी कथाही असेल ही. समीक्षा म्हणाली हट वेडी कुठली मैत्रीसाठी कोणी प्रेमाचा बळी देत का ? मी जर असते ना त्या मुलीच्या जागी तर मी कधीही असे केले नसते. मी आश्चर्याने म्हणाले, माझ्यासाठीही नसते केलेस का? समीक्षा म्हणाली नाही तुझ्यासाठीही नसते केले. आयुष्यात खरे प्रेम एकदाच होते आणि मला खात्री आहे तू तसे करण्याची वेळ येऊच दिली नसती कधी , तू मला आधीच सर्व सांगितले असतेस कि तूही त्याच व्यक्तीवर प्रेम करते आहेस ज्याच्यावर मी करते. मी म्हणाले आणि समजा मी तुला असे सांगितले असते तर, तू काय केले असतेस ? समिक्षा म्हणाली जीव घेतला असता मी तुझा काहीही विचारते वेडी कुठली पुरे झाला हा विषय आता चल घरी जाऊ मला घरी जाऊन उद्याची निघायची तयारीही करायची आहे. आणि हो अनिकेतने उत्तर कळल्यावर कळव हा मला नक्की, तसेही उद्या जाण्याआधी मी येणारच आहे कॉलेजमध्ये सर्वांना भेटायला. त्या निमित्ताने त्याला शेवटचे पहाताही येईल मला. पुन्हा कधी येईन काय माहीत जाताना त्याला तिकडचा फोन नंबरही देऊन जाईन म्हणजे तो त्याच्या मनात जे काही आहे ते तो मला स्पष्ट बोलेल. दुसऱ्या दिवशी समीक्षा कॉलेजला आली पण मला खूप भीती वाटत होती कि, ती तिचा नंबर देईल तर अनिकेत कडून तिला समजेल मी तिझ्या चिठ्ठया त्याच्यापर्यंत कधी पोहोचवल्याच नाहीत. पण सुदैवाने त्या दिवशी अनिकेत कॉलेजला आलाच नव्हता. समीक्षाने तिचा फोन नंबर मला अनिकेतला द्यायला सांगितला. त्यानंतर मी खूप विचार केला मुव्ही पाहिल्यानंतर आमच्यात जे काही बोलणे झाले ते राहून राहून मला आठवत होते. मला वाटू लागले समीक्षा म्हणाली कि, तिने माझ्यासाठी कधीच तिच्या प्रेमाचा बळी दिला नसता तर मग मी का देऊ? त्यादिवशी समीक्षाने अनिकेत साठी लिहिलेल्या सर्व चिठ्ठया मी लपवून ठेवल्या आणि तीचा फोन नंबरही अनिकेतला दिला नाही. त्यानंतर कधीही मी तिला फोन केला नाही. समीक्षा गेल्या पासून मी आणि अनिकेत खूप जवळ येऊ लागलो. माझ्या वाढदिवसा दिवशी अनिकेतने मला विचारले सोनाली काय गिफ्ट देऊ तुला तुझ्या वाढदिवसा निमित्त? मी त्यांना खूप हिंमत करून म्हणाले जे मागेन ते देशील ? अनिकेत म्हणाले हो देईन ना तू मागून तर बघ. मी अनिकेत म्हणाले ”तू” अनिकेतने मला विचारले म्हणजे ? मी त्याला स्पष्ट सांगितले माझे प्रेम आहे तुझ्यावर. आजही तो दिवस आठवतो खूप पाऊस पडत होता संध्याकाळची वेळ होती एका झाडा खाली मी आणि अनिकेत उभे होतो. अनिकेत मला तेव्हा काहीच बोलले नाही . त्यानंतर त्यांनी मला घरी सोडले. मी घरी येऊन अनिकेत बद्दल विचार करू लागले. ड नसेल. त्यादिवशी मला खूप वाईट वाटले. मला सामिक्षाची खूप आठवण येऊ लागली. मला वाटले कदाचित अनिकेत सामिक्षावरच प्रेम करत असतील. मी उगाचच त्या दोघांच्या मध्ये येत आहे. मला स्वतःचीच लाज वाटू लागली मी इतकी स्वार्थी कशी काय बनू शकते. दुसऱ्याच दिवशी माझा वाढदिवस होता. त्याच दिवशी मी अनिकेतला समीक्षा बद्दल सर्व सांगायचे ठरवले.
अनिकेत मला कोलेजच्या गेटवरच भेटले ते त्यांची बाईक घेऊन कुठेतरी निघाले होते. मला पाहून त्यांनी गाडी माझ्याकडे वळवली आणि मला म्हणाले गाडीवर बस मी विचारले का रे ? ते म्हणाले बस म्हणालो ना तर बस. का, कशासाठी आजीबात विचारायचे नाही माझ्यावर विश्वास असेल तर बस. मी गाडीवर बसले अनिकेत मला एका गणपतीच्या मंदीरात घेऊन गेले. आणि मला म्हणाले चल वाढदिवसा दिवशी देवाचा आशीर्वाद घेऊन दिवस सुरु करावा. अनिकेत आणि माझी बाप्पावर फार श्रद्धा होती. आम्ही दोघेही मंदीरात गेलो. बाप्पा समोर हात जोडून मी मनातल्या मनात बाप्पा सोबत बोलू लागले. बाप्पाला मी माझ्या मनातील सर्व सांगून टाकले. बाप्पाला म्हणाले आता तुच काहीतरी मार्ग दाखव मला अनिकेतला सर्व सांगण्याची ताकद दे. अनिकेतला त्याचे खरे प्रेम मिळूदे देवाच्या पाया पडून झाल्यावर मी डोळे उघडून अनिकेतकडे पहिले ते अगदी माझ्यासमोर उभे होते. मी बाप्पा सामोरच त्यांना सामिक्षा बद्दल सर्व सांगतच होते. पण मी काही बोलणार त्या आधीच अनिकेतने देवासामोरील कुंकू उचलले आणि माझ्या कपाळावर टेकवले. आणि मला म्हणाले, सोनाली प्रेमाचे नाटक करून पोरी फिरवणे मला नाही आवडत. तुला मी कालच उत्तर दिले असते पण मला कोणालाच कमीटमेंट द्यायला आवडत नाही. तुझा बॉयफ्रेंड बणून मिरवण्यापेक्षा नवरा म्हणून राहणे मला जास्त आवडेल. जे झाले ते बाप्पाची मर्जी समजून मी स्विकारले त्यानंतर आम्ही दोघेही आमच्या प्रेमाबद्दल घरी बोललो. घरच्यांनी आमच्या लग्नाला विरोध न करता आमचे लग्न लावून दिले. लग्न झाल्यावर मी कॉलेज सोडले अनिकेतची इच्छा होती मी पुढे शिकावे पण, मलाच आणखी पुढे नव्हते शिकायचे. कारण अनिकेत भेटल्यापासून करिअर हा विषय मी पुर्णपने माझ्या डोक्यातून काढून टाकला होता, मला स्वतःला सिद्ध करायचे होते पण फक्त एक चांगली पत्नी म्हणून. मी अनिकेतवर खूप प्रेम केले, आजही करते. ते कामावरून येण्याची वाट पहाणे, त्याच्या आवडीचे छान छान जेवण बनवणे, घर सजवणे, ते जेव्हा घरी येतील तेव्हा छान आवरून हसत त्यांचे स्वागत करने मला फार आवडायचे. अनिकेतच्या घरचे चांगले असल्याने आमच्या लग्नानंतरही ते पुढे शिक्षण घेत राहिले. त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही बाळाचा विचारच केला नव्हता. पुढे अनिकेतला नोकरीही लागली. सर्व छान सुरु होते. मी आणि अनिकेत मुंबईला शिफ्ट झालो पण सामिक्षाचा विचार जरी मनात आला तरी माझ्या जिवाची नुसती घालमेल व्हायची. राहून राहून वाटायचे अनिकेतला हे सर्व कळाले तर ?
सर्व छान चालू असताना अचानक सामिक्षाचा फोन आला बेंगलोर वरून आल्यावर ती माझ्या घरी गेली तेव्हा तिला माझ्या आणि अनिकेतच्या लग्नाबद्दल समजले. आई कडून फोन नंबर घेऊन तिने मला फोन केला. तिच्या सोबत बोलून झाल्यावर माझी आणखीच तगमग हॊऊ लागली. त्याच रात्री अनिकेतला मी सर्व सांगितले. ते सर्व ऐकून अनिकेत मला काहीही बोलले नाहीत. माझे बोलणे झाल्यावर त्यांनी सरळ झोपून घेतले. मी त्यांची खूप माफी मागितली खूप रडले पण अनिकेत मला झोप म्हणून स्वताःही झोपून गेले. त्या रात्री रात्रभर मला झोप आली नाही रात्रभर मी विचार करत होते. अनिकेतची शांतता मला वादळा पूर्वीची शांतता वाटत होती. दुसऱ्याच दिवशी समीक्षा आमच्या घरी येणार होती, हे मी अनिकेतला सांगितले होते. त्यादिवशी अनिकेत घरीच थांबले. समीक्षा आली. आल्या आल्या मी तिला मिठी मारली पण तिने फक्त औपचारिकता म्हणून मला मिठीत घेतले. तिचा माझ्या वरचा राग तिच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. समीक्षा अधून मधून बोलता बोलता मला टोमणेही मारत होती. मला खूप अपराध्या सारखे वाटत होते. आदल्या रात्री पासून अनिकेत माझ्या सोबत एकाही शब्द बोलले नव्हते. पुढे काय होईल याचा विचार करून खूप त्रास होत होता मला. मी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेले पण माझे सर्व लक्ष बाहेर होते. अनिकेत आणि समीक्षा खूप हळू हळू काहीतरी बोलत होते मला काहीच ऐकू येत नव्हते मी बाहेर आले कि ते दोघेही शांत व्हायचे. मी त्या दोघांना चहा आणून दिला. नेहमी माझ्या शिवाय काहीही न खाणारे अनिकेत मला तू ही चहा घे असे म्हणाले ही नाही. त्यांचे वागणे मला आणखी त्रास देत होते. शेवटी मला रहावले नाही मी सामिक्षाची हात जोडून माफी मागितली. आणि जे काही झाले ते मी तिला सांगू लागले. ती आणि मी एकाच वेळी अनिकेतच्या प्रेमात पडलो होतो हे ही मी तिला सांगितले. पुढे काय काय घडले ते सर्वच मी तिला सांगत गेले. अनिकेत मात्र अजूनही शांतच होते. मी त्या दोघांचीही माफी मागितली. मी माझे स्पष्टीकरण देताना माझे अनिकेतवर किती प्रेम आहे हेही बोलत होते वेड्यासारखी. पण, त्या दोघांवर माझ्या बोलण्याचा काहीही परीणाम होत नव्हता. त्यानंतर सामिक्षाने मला म्हणाली, ठिक आहे करते मी तुला माफ पण तुला मला काहीतरी द्यावे लागेल. मी म्हणाले हा माग ना तुला काय हवे ते. समीक्षा म्हणाली तुला मला अनिकेत द्यावा लागेल…..आधी तू माझे प्रेम हिसकावून घेतेलेस आता मी तुझे प्रेम हिसकावून घेणार मग तुला कळेल आपले प्रेम दुसऱ्याने हिसकावून घेतल्यावर काय वेदना होतात ते. मी म्हणाले नाही समु प्लीज असे करू नको अनिकेत शिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. तू दुसरे काहीही माग मी देईन तुला ते पण अनिकेत नाही. मी त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. मी खूप विणवण्या केल्या पण समिक्षा तिच्या हट्टावर अडून बसली होती. मी वेड्यासारखी रडत होते मी अनिकेतला ही म्हणाले अनिकेत तुम्ही तरी मला समजून घ्या. अनिकेतने माझ्याकडे पहिले आणि ते जोरजोरत हसू लागले त्यांनी मला अलगद मिठीत घेतले.आणि मला म्हणाले सॉरी सोना. त्यानंतर ते सामिक्षाला म्हणाले, समीक्षा पुरे झाले आता बास कर किती रडवशील माझ्या बायकोला. आजवर एक थेंब पाणीही येऊ दिले नाही मी तिझ्या डोळ्यांत. समीक्षा पण हसू लागली आणि अनिकेतला म्हणाली काय रे तू असा आणखी थोडे सतावायचे होते मला तिला. छे सगळया मेहनतीवर पाणी टाकलेस. आला मोठा पत्नी प्रेमी. मी आश्चर्याने त्या दोघांकडेही पहात होतेे. अनिकेतने मला पुन्हा जवळ घेतले आणि माझ्या कपाळावर त्यांचे ओठ टेकवून म्हणाले खरच सॉरी बाळा. हा सर्व ह्या गधडीचा प्लॅन होता. मी डोळे पुसत पुसत त्यांच्याकडे पाहून म्हणाले म्हणजे ? समीक्षा म्हणाली अगं म्हणजे, मी जाण्याआधी अनिकेत मला सोडण्यासाठी एअरपोर्टला आला होता तेव्हाच मी त्याला माझे त्याच्यावर प्रेम आहे असे सांगितले. पण, तेव्हा त्याने मला त्याचे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगितले. आणि हे त्याने तुला सांगितले नव्हते हे मला त्याच्याकडूनच कळले. तो कॉलेजमध्ये असताना तुझ्याकडेच पाहायचा आणि आपण दोघी तेव्हा कायम एकत्र असायचो म्हणून माझा गैरसमज झाला कि तो माझाकडे पहातो. पुढे तुमचे प्रेम कुठेपर्यंत पोहोचले हे पाहण्यासाठी मी अधून-मधून अनिकेतला फोन करायचे. अनिकेतची तुला विचारण्याची हिंमत होत नव्हती. फोनवर बोलून मला कळाले कि, तू त्याला मी दिलेल्या चिठ्ठया कधी दिल्याच नाहीस. तुझ्या वाढदिवसादिवशी तू त्याला विचारलेस हे कळाल्यावर आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला. फक्त तुझी गंम्मत करावी म्हणून. जे काय झाले ते गुपित ठेवण्याचा प्लॅनही माझाच होता अनिकेतला तुला हे आधीच सांगायचे होते पण मीच त्याला ते सांगू देत नव्हते. आणि वेडाबाई एकूलती एक जिवाभावाची मैत्रीण आहेस तू माझी तुझ्यासाठी एक काय असे शंभर अनिकेत कुर्बान. अनिकेत लगेचच म्हणाले, ए काही नाही हा कुर्बान बिर्बान अजून खूप जगायचे आहे मला. खूप सारी मुले जन्माला घालायची आहेत. दोन, चार, दहा, बारा मी अनिकेतच्या ओठांवर हात ठेवला आणि लाजून म्हणाले बास ना खूप होतात एवढी. अनिकेत म्हणाले, मग किती ग सोना? मी म्हणाले दोनच बास, समीक्षा म्हणाली ओय रोमिओ जुलीयेट माझ्याकडे पण पहा जरा. लाज वाटू द्या थोडीतरी तुम्ही दोघेच नाही आहात या घरात लागले रोमांस करायला मी इथे आहे याचे भान असू द्या. पण काहीही म्हण हा अनिकेत माझी जीवस्य कंठस्य मैत्रीण हिरावून घेतलीस हा तू माझ्यापासून. अनिकेत इकडे तिकडे पाहून नाकाला हात लावून म्हणाले काही तरी जळाल्याचा वास येतोय का? समीक्षा म्हणाली, मी कशाला जळू? अनिकेत म्हणाले हाहाहा याला म्हणतात चोराच्या मनात चांदनॆ जळणारच ना तू कारण माझी बायको तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते. अनिकेत माझ्याकडे प्रेमाणे पाहून म्हणाले बघ ना ती माझ्यावर इतके प्रेम करते कि, माझ्यासाठी तिने तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचाही विचार केला नाही. समीक्षा नाटकी स्वरात म्हणाली हो ते ही खरे आहे. बघ ना असेच असते कोणी नसते कोणाचे. आता या क्षणी एक गाणे आठवले मला. म्हणू का? अनिकेत म्हणाले इर्शाद… समिक्षा डोक्याला हात लावून गाऊ लागली

“दोस्त दोस्त ना रहा …प्यार प्यार ना रहा…
जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा….

Loading...

मी अनिकेतच्या मिठीतून बाहेर आले आणि सामिक्षाकडे पाहून दोन्ही हात तिच्याकडे करून म्हणाले ऐ नौटंकी ये इकडे खूप दाखवली कलाकारी, मी जितकी अनिकेतची आहे तितकीच तुझीही आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघींनीही तब्बल चार वर्षांनी एकमेकींना प्रेमाने घट्ट मिठी मारली…….

गुंतत गेले अशी तुझ्यात कि, माझ्या मैत्रीचेही मला भान नाही राहीले,
फक्त तुलाच नजरेत सामावून घेतले दुसरे काहीच नाही पाहीले….
तुला गमावेन या भितीने मी मुद्दाम तुला अंधारात ठेवले,
त्याच भितीने खरतर मी थोडीशी स्वार्थी वागले….
तुला मिळवले नसते तर मी कदाचीत जगूच शकले नसते,
तुझ्या शिवाय मला सारेच व्यर्थ वाटले असते…
तू मात्र माझ्यावर माझ्या पेक्षाही जास्त प्रेम केलेस
तुझ्या नावचे कुंकू लावून तू मला नवीन आयुष्य दिलेस
आता देवाकडे एकच मागने आहे तुझे नी माझे प्रेम दिवसें-दिवस असेच वाढत रहावे,
मरण जरी आले तरी ते तुझ्याच कुशीत तुला डोळे भरून पहाताना यावे…

Loading...

Please follow and like us:

Leave a Reply