त्या वाटेवर….!

माझे लग्न होण्या आधी पासूनच मी त्याला पूर्णपणे विसरून गेले होते. खरतर त्याला आठवणीत ठेवावे असे काहीही कारण नव्हते माझ्याकडे का लक्षात ठेवावे मी त्याला? मान्य आहे तो माझे पहिले प्रेम होता पण, आठवणीत राहण्यापेक्षा कपाळात बसावा असाच वागला तो कायम, प्रणव माझ पाहिलं प्रेम लहानपणापासून एकाच गावात राहीलो होतो आम्ही.

एकत्र शाळा कॉलेज झाल्यामुळे फार छान मैत्री होती आमच्यात. मग तीच बालपणीची मैत्री हळूहळू कधी प्रेमात परिवर्तीत झाली हे कळलेच नाही. प्रेमापेक्षा अधिकारच जास्त गाजवायचा तो माझ्यावर. मी त्याच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत बोललेले त्याला जराही आवडायचे नाही. पण, खर सांगायचे तर मला त्याच्या अश्या वागण्याचे कधीच काही वाटायचे नाही. त्याच्या वरच्या निस्सीम प्रेमा खातर मी त्याचे सर्व वागणे त्याच्या प्रेमाचा भाग म्हणून कायम दुर्लक्षित करायचे.

पुढे पुढे त्याच्या अश्या वागण्याचा अतिरेक होऊ लागला. पण, तेव्हाही मी काहीही तक्रार न करता त्याच्या सामाधानासाठी घरातच राहू लागले. व्यक्ती स्वातंत्र्य काय असते हे तर मी विसरूनच गेले होते. आमच्या दोघांच्या नात्याबद्दल तसे गावात सर्वाना माहीत होते. माझ्या आई-बाबांच्याही कानावर आले होते बऱ्यापैकी पण, कोणाच्या मनाला आमचे वागणे खटकेल असे कधीही न वागल्याने आणि लहानपणापासूनच आमच्यात छान मैत्री असल्यामुळे आई-बाबांनी मला स्वतःहून या विषयी काही विचारले नाही.

Loading...

प्रणवचा स्वभाव तसा फार रागीट होता त्याला स्वतःच्या रागावर जराही ताबा ठेवता यायचा नाही त्याच्या रागाचे अनेकदा दुष्परीणाम भोगावे लागायचे मला. पण, त्यांनतर त्याला त्याच्या वागण्याची जाणीव व्हायची आणि नेहमी प्रमाणे तो माझी समजूत घालायचा आणि मीही नेहमी प्रमाणे त्याच्या त्या गोड गोड बोलण्यावर भाळून माझ्या आत्मसन्मानाचा विचारही न करता पुन्हा सर्व काही विसरून त्याला स्वीकारायचे. त्याला सोडून द्यावे असे अनेकदा वाटायचे पण, पुढे होणाऱ्या परिणामांच्या विचाराने हिम्मतच व्हायची नाही.

तसा स्वभावाने छानही होता तो. जितका कठोर तितकाच प्रेमळही होता मी त्याच्यावर इतके प्रेम करायचे कारण त्याच्यातला लपलेला तो मला त्याच्यावर तितके प्रेम करण्यासाठी प्रवृत्त करायचा. खर तर त्याच्या अश्या वागण्याचे कारण त्याने लहानपणापासून जे काही पाहीले आहे ते होते. हे मला फार चांगलेच ठाऊक होते कारण अगदी बालपणापासू मी त्याला पहात आले होते.

Loading...

प्रणवच्या बाबांची दोन लग्ने झाल्यामुळे सतत त्याच्या आई बाबांची भांडणे व्हायची हे पाहून पाहून तो असा वागू लागला होता. शिवाय त्याच भांडणांमुळे त्याला स्वताच्या घरापासून दूर मामाच्या गावी येऊन राहावे लागले होते. त्याची आणि त्याच्या आईची सर्व जवाबदारी अचानक त्याच्या मामावर येऊन पडल्यामुळे त्याची मामी ही सतत मामांसोबत भांडणे करायची.

मला आठवत जेव्हा कधी त्याच्या घरी भांडणे व्हायची तेव्हा तो एकटा गावदेवीच्या मंदिराजवळ जाऊन बसायचा. त्यावेळी कोणीही त्याच्य सोबत बोलायला गेले कि, खूप चिडायचा. तसा एकटे बसून आणि विचार करून तो असा विचित्र होत चालला होता. मी इतक्या जवळ असूनही तो माझ्या सोबतही कधी त्याच्या मनातील काही बोलायचा नाही.

त्याच्या मनात धुपणारे ते विचार पुढे अश्या प्रकारची आग पकडतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मी त्याच्यावर प्रेम करायचे म्हणून कायम त्याला बदलवण्याचा प्रयत्न केला. पण, नुकत्याच झालेल्या प्रेमाचे औषध वर्षानुवर्षे चिघळत असलेल्या घावांना इतक्या सहज नाही बरे करू शकत आणि तेच झाले आमच्या प्रेमा बद्दलही.

माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला स्थळे येऊ लागली. कित्येक स्थळे नाकारून झाल्यावर पुढे सतत नकार देण्याचे कारण आई-बाबा मला विचारू लागले. त्यावेळी माझ्याकडे त्यांना पटेल असे एकही कारण नव्हते. प्रणवला या संदर्भात काहीही विचारले कि, तो चिडायचा आणि म्हणायचा जा कर जा मग लग्न. असे अनेक दिवस चालू होते.

पुढे न राहुन आई-बाबांनी मला माझे दुसऱ्या कोणावर प्रेम आहे का? हे विचारले. त्यावेळी मात्र मी प्रणव आणि माझ्या बद्दल आई-बाबांना सर्व काही सांगितले. तसे तर आई बाबांना प्रणवच्या घराच्या सर्व गोष्टी माहीत होत्या. पण, माझ्या वरच्या प्रेमा खातर आणि मी प्रणव शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न नाही करणार या माझ्या बालीशपणाच्या हट्टा खातर आई बाबांनी मला प्रणवला भेटण्यासाठी बोलवण्यास सांगितले.

त्यानंतर खूप विनवण्या केल्यावर प्रणव आई बाबांना भेटण्यासाठी तयार झाला. प्रणव घरी आला मी मनातून खूप खुश होते मला खात्री होती आई बाबा मला कधीच विरोध करणार नाहीत. माझे आणि प्रणवचे लग्न होणार या भावनेने खूप सुखावून गेले होते मी. त्याच्या सोबतच्या आयुष्याची छान छान स्वप्नेही पाहू लागले होते मी.

पण, माझे ते स्वप्नात रहाणे फार काळ टिकू शकले नाही. कारण बाबांनी लग्नाचा विषय काढला आणि प्रणव लग्नाबद्दल लहानपणापासून त्याच्या मनात साठलेले सर्व विष ओकू लागला. प्रणव कशाचाही विचार न करता बाबांना म्हणाला, माझा लग्न या नात्यावर मुळीच विश्वास नाही.

त्यामुळे, मी भविष्यात कधीही लग्नाचा विचारच करणार नाही. त्यावर बाबा म्हणाले, पण मग लग्न करायचेच नव्हते तर माझ्या पोरीला नादाला लावलेच कशाला? प्रणव म्हणाला, नादाला लावले म्हणजे ठरवून कधी कोणावर प्रेम होते का? लहानपणा पासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत मोठे झालो आणि गुंतत गेलो एकमेकांच्यात.

माफ करा पण, हव तर विचरा तुम्ही जुईला लग्नाची वचणे कधीही दिली नाहीत आम्ही एकमेकांना. लग्नाशिवायही खूप छान राहू शकतो आम्ही एकमेकांसोबत. बाबा चिडले आणि म्हणाले, अरे पण गाढवा अश्या नात्याला समाज मान्यता देत नाही. त्यावर प्रणव म्हणाला, समाजाचा विचार मी करत नाही. आणि समाज काय विचार करतो याचा मला फरकही पडत नाही.

तुमची इच्छा असेल तर हो म्हणा मी आता लगेच जुईला स्वीकारायला तयार आहे. बाबा प्रचंड चिडले आणि म्हणाले, काहीही नको झाला एवढा तमाशा खूप झाला माझी पोर रस्त्यावर पडलेली नाही आणि ती मला जडही झाली नाही. दुसऱ्या कोणाशी जर लग्न करायचे नाही तीला तर अशीच बिन लग्नाची सांभाळेन मी.

पण, तुझ्या सारख्या माथेफिरूच्या गळ्यात बांधणार नाही मी तिला, चालता हो माझ्या डोळ्यासमोरून. त्यानंतर बाबांनी मला सक्त बजावले याचा विषय डोक्यातून काढून टाक नाहीतर आई बापाचे मेलेले तोंड पहावे लागेल तुला. प्रणव निघून गेले बाबांनी बजावले तरी मी स्वतःला अडवू शकले नाही मी प्रणवला समजावण्यासाठी त्याच्या मागे धावत गेले.

त्याला खूप समजावले मी त्याच्या शिवाय कशी राहू शकेन आईबाबांच्या इच्छे साठी औपचारिकता म्हणून लग्न कर हेही समजावले मी त्याला. पण, त्याने ऐकले नाही तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि मी काही वेळापूर्वी स्वप्नात जगणारी सारकाही संपल्याच्या भावनेने अर्धमेली होऊन घरी परतले आणि स्वतःला स्वतःच्या खोलीत बंद करून घेतले.

दोन दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग करून मी माझ्या खोलीत बंद होते. पण, त्या दरम्यान एकदाही प्रणवने मला कॉल किंवा मेसेज केला नाही. कि, मी केलेल्या कॉल मेसेजचे उत्तर देणे त्याला गरजेचे वाटले नाही. पण, इकडे घरात आई-बाबा दोघेही माझ्यासाठी उपाशी रहात होते. मी खाल्ले नाही म्हणून, बाबा जेवत नव्हते आणि बाबा जेवत नाही म्हणून आई.

त्या दरम्यान बाबांची शुगर वाढून त्यांना चक्कर आली. आईचा गोंधळ ऐकून मी खोली बाहेर आले. पहाते तर काय, बाबा हॉल मध्ये सोफ्यावर निपचित पडले होते. आईने आणि मी त्यांना दवाखान्यात नेले बराच वेळ झाला तरी बाबा शुद्धीवर आले नव्हते. मला माझीच लाज वाटू लागली. बाबांना काय झाले तर मीही नाही जगणार असे मी मनात ठरवले होते पण, मला बाबा हवे होते. मला त्यांची माझ्यामुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागायची होती. माझी चूक मला सुधारायची होती.

एका आदर्श मुली प्रमाणे त्यांच्या इच्छे प्रमाणे वागून त्यांना खूप सुख द्यायचे होते. पण, बाबा उठत नव्हते. मनातल्या मनात मी देवाचा धावा करू लागले परमेश्वरा फक्त एक संधी दे मला माझे बाबा परत दे, पुन्हा कधीही तुझ्याकडे काही मागणार नाही. आणि काही वेळातच बाबा शुद्धीवर आले. बाबांना शुद्धीवर आलेले पाहून मला फार आनंद झाला.

मी बाबांची खूप माफी मागितली आणि बाबांनीही मला मोठ्यामनाने माफ केले. काही वेळाने डॉक्टरांनी बाबांना जेवण करण्यास सांगितले बाबांनी तेव्हाही माझ्याकडे पाहीले. त्यांना काय म्हणायचे होते ते मला कळाले मला खूप रडू आले मी बाबांकडे पाहून म्हणाले, बाबा मीही खाणार आहे खरच खूप भूक लागली आहे आपण एकत्रच खाऊ.

त्यांनतर आई जेवण घेऊन आली आणि आम्ही तिघांनीही दवाखान्यातच एकत्र जेवण केले. काही दिवसांनी बाबा घरी आले आणि आम्ही पुन्हा मी लहान असताना रहायचो तसे राहू लागलो आई बाबा आणि मी छोटेसेच पण, खूप छान कुटुंब होते आमचे. मी प्रणवला माझ्या मनातून पूर्णपणे काढू शकले नसले तरीही त्याला विसरण्याचा प्रयत्न मात्र आई बाबांच्या नकळत करत होते. बाबांच्या तब्बेतीत छान सुधारणा होत होती. दरम्यान त्यांची शुगरही नॉर्मल झाली होती.

माझे वाढते वय हे एकमेव काळजीचे कारण होते आता त्यांच्या. पुढे काही दिवस गेल्यावर नराहून बाबांनी माझ्याकडे लग्नाचा विषय काढला. म्हणाले, जुई प्रत्येक आई बापाचे एक स्वप्न असते आपल्या मुलीचे कन्यादान करण्याचे, तिचा फुलणारा संसार पहाण्याचे, तिची मुले मांडीवर खेळवण्याचे आम्हाला आमच्या स्वप्नाचे काही वाटत नाही बाळा कारण तुझ्याकडे पाहीले तरी आम्ही सर्व सुख अनुभवतो बेटा.

पण, आई बाप आयुष्याला पुरत नाहीत बेटा आम्ही आज आहोत तर उद्या नाही. एकदा का तू तुझ्या हक्काच्या घरी गेलीस म्हणजे आमची काळजी मिटली. लग्नाचा विचार कर बाळा. हे बघ तूझ्यावर कोणाचीही जबरदस्ती नाही तुझ्या मर्जी शिवाय काही होणार नाही तुला मुलगा पसंत पडेल तरच लग्नाला होकार दे नाहीतर मुलांची काही कमी नाही आपण आणखी मूले पाहू.

मला बाबांना पुन्हा दुखवायाचे नव्हते मी बाबांना म्हणाले, तसे नाही ओ बाबा माझे काहीही म्हणणे नाही तुम्ही म्हणाल त्या मुलासोबत मी लग्न करायला तयार आहे. त्यादरम्यान प्रणवचा काहीही पत्ता नव्हता तो कुठे आहे कसा आहे मला काहीच माहीत नव्हते. काही दिवसांनी मला सागर नावाच्या मुलाचे स्थळ चालून आले.

फार मोठे कुटुंब होते त्यांचे ते घरात सर्वात लहान होते. त्यांच्या दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ त्यां सर्वांचीही लग्ने झाली होती. वडील निवृत्त पोलीस होते आणि आई गृहिणी. मोठ्या भावाला दोन मुले असा त्यांचा परिवार. सागरही पोलीसच होते पण स्वभावाने अतिशय प्रेमळ, समजूतदार. घरात सर्वात लहान असल्याने सर्वांचे लाडके.

आई बाबांचा फार आदर करायचे ते. त्यांचे संस्कार त्यांच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसायचे बाबांना ते पाहिल्या पाहिल्या आवडले. पाहायला आल्यावर मला आणि सागराला घराच्या सर्वांनी थोडावेळ बोलण्यासाठी एकटे सोडले. अगदी थोडाच वेळ बोलले पण, मला वाटले मी सागरला माझ्या आणि प्रणव बद्दल सर्व काही सांगावे पण, बाबांनी मला आधीच प्रणव बद्दल कोणालाही काहीही न बोलण्याची शप्पत घातली होती.

खर सांगायच तर माझ्या होणाऱ्या नवऱ्या पासून माझा भूतकाळ लपविणे माझ्यासाठी फार कठीण होते. आणि माझ्या मनाला ते पटत ही नव्हते. अगदी ओठापर्यंत आलेल्या गोष्टी मला नाईलाजासत्व गिळाव्या लागल्या. बोलून झाल्यावर आम्ही खाली आलो. इकडे मोठ्या लोकांचे काय बोलणे झाले होते ठाऊक नाही पण, सगळेच फार खुश दिसत होते. सागरच्या घरचे निघून गेल्यावर बाबांनी मला माझे मत विचारले माझ्याकडे सागरला नकार द्यावा असे काहीही कारण नव्हते मग मी माझा होकार सांगितला.

त्यानंतर अगदी काही वेळातच सागरच्या घरच्यांचा होकाराचा फोन आला आणि आमचे लग्न ठरले. लग्नाची तारीख महिन्या नंतरची निघाली असल्यामुळे दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली. त्या महिन्या भरात सागर रोज मला फोन करायचे.

जशी जशी मी त्यांना ओळखत गेले तशी तशी त्यांच्य बद्दल वाटणारी भीती कमी होऊ लागली आणि असे वाटू लागले कि, त्यांना गेले अनेक वर्षे ओळखते. लग्न झाले. सर्व छान सुरु होते सागर घरात सर्वात लहान असल्याने त्यांच्या सोबत माझेही फार लाड व्हायचे. देव-देव झाल्याबरोबर लगेचच सागर मला मनालीला फिरायला घेऊन गेले.

फोन वर बोलत असल्यामुळे त्यांच्या बद्दल भीती जरी मेली असली तरी त्यांच्या पासून काहीतरी लपवले आहे ही गोष्ट मला आतल्या आत पोखरत होती त्यामुळे ते जवळ आले कि, त्यांच्यात एकरूप होऊ शकायचे नाही. सागरने त्या बद्दल मला विचारण्याचा प्रयत्नही केला पण, मला सांगता आले नाही.

दिवसभर फिरताना मी खूप छान असायचे त्यांच्या सोबत आणि रात्री ते जवळ आले कि, मी इतकी घाबरून जायचे कि, माझे मलाच कळायचे नाही माझ्या सोबत हे असे का होत आहे ते. तेव्हाही सागराने मला खूप समजून घेतले त्यांना वाटायचे कि, त्या गोष्टी साठी मला थोडा वेळ द्यायला हवा. मला तशी घाबरलेली पाहिल्यावर तेच म्हणाले जुई घाबरू नकोस तुला स्वतःला माझ्याबद्दल काही वाटे पर्यंत मी तुला कसलाही स्पर्श करणार नाही.

शरीराने एकरूप व्हायला संपूर्ण आयुष्य पडले आहे आधी मनाने एक होऊया आधी एकमेकांचे छान मित्र होऊया. मनाली वरून आल्यावर मी आई बाबांकडे गेले. तिथे गेल्यावर मात्र मी आधी होते तशी जराही नव्हते माझ्यात खूप बदल झाला होता. खूप दिवसांनी माहेरी येऊनही माझे मन कशातच लागत नव्हते.

खूप शांत शांत राहू लागले होते मी. सतत सागर दिसायचे समोर. आई बाबांशीही मोकळेपणाने बोलता यायचे नाही मला. हा बदल का झाला कशामुळे झाला मला काहीही काळात नव्हते. एक दिवस अशीच माझ्या खोलीत विचार करत बसले असताना आई माझ्याजवळ आली. तिने मला विचारले काय झाल जुई? आल्यापासून पहाते तू खूप शांत शांत आहेस सासरी सर्व ठीक आहे ना? सागर कसे आहेत करामत नाही का तुला तिथे? मी आईला म्हणाले नाही ग आई खूप छान आहेत माझ्या घराचे सगळे सागर तर खूप समजून घेतात मला. खूप लाड होतात माझे तिथे.

तेच मलाही कळत नाही आहे इतक सर्व छान असताना माझ मन का लागत नाही आहे कुठेच? आई माझ्याकडे पाहून हसली आणि मला जवळ घेऊन म्हणाली कारण, कारण तुझे मन आता तुझ्याकडे नाही राहिले लग्न झाल्यावर सर्व मुलींचे हे असेच होते. कालपर्यंत अनोळखी असलेल्या माणसात असा जीव गुंतत गेला कि, होत अस हरवल्या सारख मला सांग, सतत सागरचा चेहरा दिसतो ना समोर ? मी आईकडे आश्चर्याने पाहीले आणि म्हणाले हो पण, हे तुला कसे काय माहित? आई म्हणाली बाळा मी आई आहे तुझी मी ही या सर्वातून गेली आहे.

मी म्हणाले म्हणजे? आई म्हणाली म्हणजे काही नाही आजचा दिवसच आहेस इथे उद्या येणार आहे सागर तुला घ्यायला तिकडे गेलीस कि, नाही होणार असे हरवल्या सारखे वेडी कुठली. आणि असे बोलून आई निघून गेली. ती गेल्यावर मी पुन्हा वेड्यासारखी सागरचाच विचार करत होते आई जे जे बोलली ते सर्व आठवू लागले आई म्हणाली होती कि, जीव गुंतला कि, होते असे याचा अर्थ मी सागरच्या प्रेमात पडत चालले होते.

हे कळल्यावर मात्र मला क्षणभरही तिथे थांबवत नव्हते असे वाटत होते धावत जावे आणि सागरकडे माझे प्रेम व्यक्त करावे. कशी बशी ती रात्र काढली आणि सकाळी लवकर उठून निघण्याची तयारी करू लागले. सतत फोन चेक करणे, कोणाच्या गाडीचा आवाज आला कि, दरवाजा उघडून पहाणे चालूच होते.

आई बाबा मात्र माझी ती गम्मत पाहून एकमेकांकडे पाहून हसत होते. तितक्यात दारावर बेल वाजली मी धावत जाऊन आनंदाने दरवजा उघडला आणि दरवाजा उघडल्यावर अगदी काही क्षणातच माझा सर्व आनंद मावळला कारण दरवाजात सागर नसून प्रणव होता. माझे लग्न झालेली पाहून तो गोंधळ घालू लागला त्याने आई बाबांच्या समोर माझा हात पकडला आणि म्हणाला तू फक्त माझी आहेस. मला माहित आहे हे सर्व तू फक्त तुझ्या आई बाबांच्या सांगण्यावरून केले असणार. त्याला पाहून माझी बोलतीच बंद झाली होती. आणि त्यात बाबांच्या तब्बेतीची काळजी.

त्यातूनही मी प्रणवला स्पष्ट सांगितले हे लग्न मी माझ्या मर्जीने केले आहे प्रणव. आणि तुला त्याने काय फरक पडतो? कुठे होतास तू? तुझ्यामुळे मी आणि माझ्या घरच्यांनी आधीच खूप सहन केले आहे. तू जा इथून निघून मला तुझे तोंडही पहायचे नाही. मी असे म्हणाल्या बरोबर तो आणखीनच चिडला आणि म्हणाला, जा म्हणजे काय हा? प्रेम माझ्यावर केलेस आणि लग्न कोणा दुसऱ्या सोबत.

ते काही नाही तू मला हवी आहेस कोणत्याही परीस्थित नाहीतर तुला माहित आहे तुझ्या नवऱ्या पर्यंत पोहोचायला मला वेळ लागणार नाही. मी आणि आई बाबांनीही प्रणवला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या तो माझे ऐकायला तयार नव्हता. मी जर त्याची झाले नाही तर तो कोणालाच सोडणार नाही हे बोलल्यानंतर मात्र मी घाबरले आणि मग नाईलाजाने मी त्याच्याकडे सागर सोबत बोलण्यासाठी काही वेळ मागितला. आणि ज्या माझ्या नात्याची मी नवी सुरुवात करणार होते ते नाते सुरु होण्या आधीच संपण्याच्या वाटेवर येऊन पोहोचले.
मी बोलाण्यासाठी वेळ मागीतल्यामुळे प्रणव तर निघून गेला. पण, मी मात्र खूप घाबरले होते. कारण मला माहित होते प्रणव जे बोलतो करून दाखवतो. आता पुढे काय काहीच सुचत नव्हते आई बाबाही फार घाबरले होते कशी बशी त्यांची समजूत काढली त्यांना सामाजावातच होते तितक्यात दारावर पुन्हा बेल वाजली.

सागर आले होते. आईने दरवाजा उघडला आणि अचानक हसून म्हणाली, अरे तुम्ही या, ना आम्ही तुमचीच वाट पहात होतो. सागर घरात आले. आल्या आल्या ते मला शोधू लागले. मला पाहील्या बरोबर आईला म्हणाले, आई काय हे, माझ्या बायकोचा चेहरा का उतरला आहे? फार वेळ लावला ना मी यायला.

पण, काय करणार ट्राफिक खूप होते आणि काय माहीत का आज रस्ताही संपत नव्हता. आई हसली आणि म्हणाली हो का ? इकडेही एक माणूस सकाळ पासून आवरून बसले आहे. आणि गाड्यांचा आवाज आला कि, बाहेर पहात आहे. आईने बोलत बोलतच सागरला पाणी आणून दिले. मी माझ्या खोलीकडे जात म्हणाले मी आलेच माझे सामान घेऊन.

पाणी पिऊन झाल्यावर सागर आईला म्हणाले, आई मी ही आलोच पहातो तिला काही मदत हवी आहे का? सागर माझ्या खोलीत आले आणि उगीच माझे लक्ष जावे म्हणून खोकाण्याचे नाटक करू लागले. मी सामानाची आवरा आवर करत होते. मी म्हणाले, थांबा हा झाले आहे आवरून निघुयात लगेचच.

सागर माझ्या जवळ आले आणि म्हणाले, फार आठवण काढत होतीस का माझी? तू इकडे आल्या पासून खूप उचक्या लागत होत्या मला. आणि तुझा चेहरा का उतरला आहे? मला यायला उशीर झाला म्हणून का? खरतर आत्ताच आली आहेस तू माझ्या आयुष्यात आणि बघ ना तुझ्या शिवाय काहीच सुचेनासे झाले आहे मला.

कधी एकदाचा तुला घरी घेऊन जाईन असे झाले आहे मला. खरतर त्यावेळी मला सागराच्या मिठीत जाऊन खूप रडावे असे वाटत होते पण, आधीच माझ्यावर इतक्या प्रेम करणाऱ्या त्यांना मला त्यांचा जवळ जाऊन त्यांना आणखी माझ्यात गुंतू द्यायचे नव्हते. मी शांत उभी ते काय काय बोलत आहेत ते ऐकत होते. त्यांनी मला शांत उभी पाहून विचारले काय झाले बोलत का नाहीस ? मी काही बोलणार तितक्यात आई आली आणि म्हणाली, जुई पानं वाढायला घेतली आहेत दोघेही जेवायला या.

त्यांनतर सागर फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेले. आईने  माझ्याकडे पाहिले तिला माझी मनस्थिती चांगलीच कळत होती. माझ्या डोळ्यात पाणी आलेले पाहिल्यावर आईने मला जवळ घेतले आणि म्हणाली, रडू नकोस जुई सर्व ठीक होईल. खरतर आमचेच चुकले  तुला सर्व सांगायचे होते सागरला पण, आमच्या शपथीने तुला अडवले.

आम्ही आहोत तुझ्या पाठीशी काही घाबरू नको मी आणि बाबा प्रणवच्या आईकडे जाऊन येतो उद्या त्या समजावतील त्याला. मी आईला  म्हणाले, नाही अजिबात अशी करू नको मी प्रणवला चांगली ओळखते तो नाही ऐकणार कोणाच. मी पहाते काय  करायचे ते तू फक्त बाबांची काळजी घे.
जेवण झाल्यावर आम्ही निघालो. काही अंतरावर गेल्यावर सागराने माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, किती छान दिसतो ना हिरवा चुडा मुलींच्या हातात? सागरने हात हातात घेतल्यावर मात्र माझ्या हृदयाचे ठोके वाढले. त्या सकाळी जे काही झाले ते सर्व मी त्यावेळी विसरून गेले होते.

त्या क्षणी मी फक्त माझा आणि सागराचा विचार करत होते. मी लाजेने डोळे मिटून घेतले. त्यावेळी मी त्यांच्याकडे पहात ही नव्हते. मला लाजलेली पाहून सागर म्हणाले, पण एका गोष्टीसाठी मी तुला आधीच सॉरी बोलतो हा जुई मी डोळे उघडले आणि म्हणाले, कोणत्या? सागर म्हणाले आज तुझ्या बांगड्या काही रहाणार नाहीत. मी म्हणाले म्हणजे ? सागर जोरजोरात हसले आणि म्हणाले, कशी ग अशी तू? म्हणजे काय ते घरी गेल्यावर कळेल.

काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो छान स्वागत झाले आमच्या दोघांचेही मला पाहून सर्वांनाच फार आनंद झाला होता. मला ही खूप बरे वाटले घरी गेल्यावर पण अचानक आठवले हे सुख इतकी गोड माणसे फार काळ माझ्या नशिबात नाहीत. सर्वांना पाहून खूप रडू आले मला सगळेच फार खुश होते सगळे मिळून सागरची मस्करी करत होते.

मी माहेरी गेल्यापासून माझ्या आठवणीत त्यांचा वागण्यात झालेल्या बदला बद्दल सगळेच मला एक एक किस्से रंगवून सांगत होते. मनात खूप साऱ्या वेदना घेऊन मी हसण्याचा प्रयत्न करत होते. हसता हसता माझे सागरकडे लक्ष गेले सागर एकटक माझ्याकडे पहात होते. आमची नजरा नजर झाल्यावर सागराने माझ्या डोळ्यात आलेले पाणी पाहून नजरेनेच मला विचारले काय झाले ? मी ही नजरेनेच काही नाही असे उत्तर दिले आणि हसले त्यांच्याकडे पाहून.
काही वेळाने जेवणे झाली आणि मग गप्पा टप्पा झाल्यावर आम्ही आमच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेलो. तिथे गेल्यावर पहाते तर काय आमची खोली आणि बेड फुलांनी खूप छान सजवला होता. मी गेल्याबरोबर यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले हे हो काय ? सागर हसले आणि म्हणाले आपल्या घरच्यांची करामत सकाळी मी निघतानाच तयारी सुरु होती या सर्वांची.

मी तरी म्हणालो हनिमून वरून आलो ना आता आम्ही, मग हे आता आणि कशाला? पण, तुला तर माहित आहे कसे फिल्मी आहेत आपल्या घरचे सगळे. म्हणूनच गंमतीने मी मघाशी येताना तुला बोललो एका गोष्टी साठी आधीच सॉरी बोलतो मी तुला. पण तू निश्चिंत रहा मी आधी म्हणाल्या प्रमाणे जोवर तुझ्या मनाची तयारी नाही होत तोवर मी तुला हात ही लावणार नाही.

काही वेळाने साडी चेंज करून मी बेडवर गेले आम्ही दोघेही छान गप्पा मारत होतो. बोलता बोलता सागरने विचारले जुई आई कडे गेल्यावर एकदा तरी माझी आठवण आली का तुला? मी त्यांच्याकडे पाहीले मला सांगायचे होते हो खूप आठवण येत होती मला तुमची पण, प्रणव बद्दल बोलायचे असल्यामुळे भीतीने माझ्या तोंडातून शब्दच येत नव्हते.

मला शांत झालेली पाहून सागरच म्हणाले, अगं म्हणजे मित्र म्हणून तरी माझी आठवण झाली कि, नाही ? मग मी म्हणाले, हो ना तशी फार आठवण येत होती तुमची आणि घरातील सर्वांची. सागर हसले आणि म्हणाले, आणखी एक विचारू? मी म्हणाले, हो विचाराना सागर म्हणाले मघाशी गाडी मध्ये मी तुझा हात पकडला तेव्हा तू डोळे का मिटून घेतलेस ? मी पुन्हा लाजेने माझा चेहरा त्यांच्या विरुद्ध दिशेला फिरवला सागरने माझ्या हनुवटीवर हात ठेऊन माझा चेहरा त्यांच्याकडे वळवला.

मी तेव्हाही डोळे बंद करून शांत पडून होते. त्यांनतर त्यांनी त्यांच्या हाताची बोटे माझ्या खांद्याकडून अलगद माझ्या हाताच्या  टाळाव्या पर्यंत न्हेली आणि त्यांचा हाताची बोटे माझ्या हाताच्या बोटात गुंतवली. माझ्या चेहऱ्याकडे पहात ते मला म्हणाले, जुई…. मी समजून गेले ते मला माझ्याकडे त्यांच्यात एकरूप होण्याची परवानगी मागत आहेत.

मग मीही जाणतेपणी त्यांच्या हातात गुंतलेल्या माझ्या हाताच्या बोटांनी त्यांचा हात घट्ट पकडला. खर सांगायच तर त्या क्षणी मी मलाही पूर्ण विसरून गेले होते. सागर समजून गेले कि, आता मी त्यांची होण्यासाठी तयार आहे. आम्ही दोघेही त्यावेळी सार जग विसरून एकमेकांच्यात विरून जाण्यास तयार होतो. त्यानंतर त्यांनी त्यांचे ओठ माझ्या माथ्यावर टेकवले मीही मग त्यांच्या मिठीत स्वतःला झोकून दिले. वातावरण अगदी रोमांचित झाले होते.

त्यांच्या पहील्या स्पर्शाने भीतीने मी अक्षरशः थरथरत होते. माझी भीती त्यांच्या लक्षात आल्यावर वातावरण नॉर्मल करण्याच्या उद्देशाने ते माझी मस्करी करू लागले मला म्हणाले, जुई माहेरी जाऊन इतकी बदलणार आहेस ठाऊक असते तर हनिमूनला जाण्या आधीच मी तुला माहेरी सोडून आलो असतो. इतका वेळ मी माझे माहेर, माझा भूतकाळ सार काही विसरून गेले होते.

पण सागरने आठवण करून दिली आणि त्याच क्षणी मला प्रणवची आठवण झाली. माझा मूड अचानक चेंज झाला मी पटकन सागरच्या मिठीतून बाहेर आले आणि रडू लागले. सागरला मला काय झाले. मी, कां रडते काहीही कळत नव्हते. त्यांनी मला खूप विचारल्यावर मी त्यांना माझ्या भूतकाळा बद्दल सर्व काही सांगितले.

त्यांनतर मात्र वातावरण अगदी बदलून गेले. तू मला या आधी या बद्दल सांगायला हवे होते हे तू ठीक नाही केलेस. असे बोलून सागर कूस बदलून माझ्या सोबत बाकी काहीही न बोलता झोपून गेले. ही शांतता वादळा पूर्वीचीही असू शकते या विचाराने ती रात्र मला झोपच आली नाही रात्रभर मी सागरच्या पाठमोऱ्या देहाकडे पहात सुरु होण्या आधीच हे गोड नातेही माझ्या हातातून जाणार आणि खरे प्रेम कदाचित माझ्या नशिबातच नाही हा विचार करत मी माझ्या नशिबाला धोश देत होते.

पण एक होते कि, सागर माझ्यात आणखी गुंतण्या आधी त्यांना मला सर्व सांगता आले याचेही समाधान वाटत होते मला. दुसऱ्या दिवशी माझी आंघोळ झाल्यावर सागराने मला माझी तयारी करण्यास सांगितले. मी विचारले त्यांना कुठे जायचे आहे? त्यावर ते म्हणाले, जिथे तुला असायला हवे तिथे. त्यांच्या मनात काय चालले होते मला काहीही समजत नव्हते.

आणखी काही विचारत बसण्यापेक्षा मी माझी तयारी केली आणि आम्ही दोघे निघालो. गाडी मार्गस्त झाल्यावर माझ्या लक्षात आले आम्ही माझ्या माहेरी निघाले आहोत. घरी पोहोचल्यावर ते मला म्हणाले, जुई प्रणवला फोन करून इथे बोलवून घे. मला काहीही कळत नव्हते मी त्यांना कशी समजावू.

माझ्या मनात प्रणव बद्दल आता काहीही नाही हे मला ओरडून ओरडून त्यांना सांगायचे होते पण, ते मला काहीही बोलू देत नव्हते. आई बाबाही सागरला खूप समजावत होते.पण, सागर त्याला बोलावून घे या एका वाक्यावरच अडून बसले होते. शेवटी मी प्रणवला फोन केला आणि त्याला घरी बोलवून घेतले.

सागर आई बाबांना मला जुई आणि प्रणव सोबत एकांतात जरा बोलायचे आहे म्हणाल्यावर आई बाबां त्यांच्या खोलीत गेले. मी आणि सागर हॉल मध्ये प्रणवची वाट पहात होतो. काही वेळाने प्रणव आला प्रणवला पाहील्या बरोबर सागर उठले आणि त्यांनी थेट जाऊन प्रणवच्या कानाखाली सणसणीत लाऊन दिली.

त्या आवाजाने माझे हात पाय थरथरू लागले. काय करू काय नको मला कहीही समाजात नव्हते. लग्न झाल्यास सागरला या रुपात मी पहील्यांदा पाहीले होते. त्यांना कशी समजावू मला काहीही कळत नव्हते. त्यांच्या मनात काय चालू आहे मला अजूनही कळाले नव्हते सागर प्रणवला म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला धमक्या द्यायची.

इथून पुढे जर तिला कॉल मेसेज केलास तर माझ्या सारखे वाईट कोण नसेल. तुझ्या सोबत मला कायद्यानेही बोलता आले असते पण, तुझ्या सारख्या मूर्ख माणसासाठी माझ्या बायकोला आणि तिच्या घरच्यांनाही त्रास होऊ द्यायचा नाही आहे मला. आणि कुठल्या नात्याने तू तिच्यावर हक्क गाजवत आहेस? जेव्हा तिला तुझी गरज होती तेव्हा कुठे होतास तू? तिच्याच प्रश्नांपासून वाचण्यासाठी मित्रांसोबत मजा मारत फिरत होतास गावोगावी.

तुझ्या मूर्ख पणा मुळे तिने तिचे बाबा गमावले असते याची जरा तरी कल्पना आहे का तुला? तुझे प्रेम खरे असते तर मी स्वतःच या लग्नाला नकार दिला असता. आता पर्यंत जे झाले ते झाले पण, या पुढे तसे नाही झाले पाहीजे नाहीतर होणाऱ्या परिणामांना सामोरा जायची तयारी ठेव. सागरच्या रागापुढे प्रणवचे काहीही चालले नाही.

काही वेळाने तो तिथून निघून गेला. मी मात्र मनात खूप सारे प्रश्न घेऊन सागरकडे पहात होते. सागरला इतके सगळे कसे माहीत हे मला त्यांना विचारायचे होते. माझ्या मनात काय चालू आहे त्यांनी अचूक ओळखले आणि म्हणाले, पोलिसात नोकरी करतो चौकशी न करता लग्न करेन का ? तुला पहातच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो होतो तूच माझ्या आयुष्याची सोबती होशील हे तेव्हाच ठरवले होते. आणि त्याचमुळे तुझा भूतकाळ मला कधीही सलला नाही.

लग्न झाल्यापासून तू एका दडपणा खाली वावरत होतीस शिवाय तुला माझ्या सोबत काही तरी बोलायचे आहे हे ही मला कळले होते. पण, तुला ते बोलता येत नव्हते. तुला काय बोलायचे आहे हे सर्व मला आधीच माहीत होते. पण, मला आपल्या नात्यालाही वेळ द्यायचा होता. म्हणून, मी जाणून बुजून त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले.

घरात काही कळू द्यायचे नव्हते म्हणून रात्री मुद्दाम मी तो विषय टाळला. खरतर तू माझ्यावर माझ्या इतकेच प्रेम करतेस हे मी तुला घ्यायला आलो तेव्हाच कळाले होते मला. तुझे आतुरतेने वाट पहाणारे डोळे मला सर्व काही सांगून गेले. मला ठाऊक आहे तुझ्या मनात आता फार गोंधळ सुरु असेल. तुझ्या डोळ्यात प्रेम दिसणे हा कदाचित माझा गैरसमजही असेल मला जबरदस्ती तुला माझ्या सोबत बांधून नाही ठेवायचे.

तेव्हा कदाचित नाईलाजाने तुला माझ्या सोबत लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला असेल. पण, आता मी स्वतः तुला विचार करायला वेळ देतो ठरव तुला काय करायचे आहे आणि यावेळी प्लीज स्वतःच्या मनाचा विचार कर… असे म्हणून सागर जायला निघाले मी धावत जाऊन त्यांना पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाले, मला आताच यायचे आहे तुमच्या सोबत.

माझा नाही जीव लागत तुमच्या शिवाय आता कुठेही. सागर मागे वळाले आणि त्यांनीही मला तितक्याच प्रेमाने मीही नाही राहू शकणार आता तुझ्या शिवाय असे म्हणून त्यांच्या मिठीत सामावून घेतले. त्यावेळी जे नाते त्यावाटेवर संपण्याच्या भीतीने माझी झोप उडाली होती ते नाते फार विश्वासाने त्यांनी कोणत्याही तक्रारी शिवाय सहज स्वीकारले.
पहीले प्रेम सर्वांच्याच आठवणीत गोड आठवणी ठेऊन जाते असे नाही. काही अपवादही असतात त्याला माझ्या आयुष्यात तर माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी पाहीलेला जोडीदाराच माझ्यासाठी योग्य होता आज दहा वर्षे झाली आमच्या लग्नाला. खूप सुखात आहे मी. सई आणि साहील झाल्यावर खऱ्याअर्थाने आम्ही दोघे पूर्ण झालो.

सागरच्या विश्वासामुळे माझा भूतकाळ पुन्हा कधीही परतून आला नाही आमच्या आयुष्यात. दहा वर्षे जशी गेली तशीच पुढची सर्व वर्षेही आनंदात जावीत हीच इच्छा.
………समाप्त

Please follow and like us:

Leave a Reply