शेतकऱ्यांची शेतातली शापीत पोरं -शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुलाने अवश्य वाचा

शेतकऱ्यांची शेतातली शापीत पोरं –

शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुलाने अवश्य वाचा

(याला भरपूर अपवादही असतील किंवा त्या अपवादाने ही किंचितसं हे अनुभवलं असेल.)

हा विषय शेतीचा आहे अन् अकालीच म्हातारपण आलेल्या शेतकरी मुलांचा आहे. शेतकरी मग तो कुण्याही गावातला असू द्या कधीकाळी सुखी होता.

खूप अलिकडचा १९९० च्या दशकातला काळ जरी आठवला तरी भरपूर शेती,माळवदी वाडे,मोठ्या पडव्या,आडं,बळद,चोपा,गुरेढोरे,घराघरात धान्याच्या कणगी,दुधाच्या आडी,परसात भरपूर भाजीपाला हे सगळं आठवतं.

Loading...

भौतिक सुखासोबत मानसिक  समाधान ही होतं.जिवनात इरस होती पण जिवघेणी स्पर्धा नव्हती.त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण कमी होतं.माणसं नैसर्गिक जगायचे अन् नैसर्गिक मरायचे.

पुस्तकी अज्ञान असेल पण किमान जिवनाचं गणित सुटायचं. हे चिञ आता धुसर झालं, आताही वयोवृद्ध शेतकऱ्यांना ह्या आठवणी सांगु वाटतात.

Loading...

तेंव्हाचा पाऊस,तेंव्हाची एकत्र कुटुंब पध्दती (खटलं) ,तेंव्हाची उसाची गुराळं आणि तेंव्हाची ईमानदार माणसं  हे सर्व आता चिञपटात पाहिल्यासारखं वाटतं.

आपल्या भविष्याची काही चिंता नाही असं त्यावेळी शेतकरी मुलांना स्पष्ट दिसायचं.पण आता शेतकऱ्यांच्या लेकरांवर आई जेवू देईना अन् बाप भिक मागू देईना अशी वेळ आली आहे.

आत्मविश्वास पुर्ण हरवून हे आत्महत्यांच्या परंपरेचे वारस मरण्याची हिम्मत नसल्यामुळे जिवंतपणाचं ओझं वागवत आहेत.गावा गावात असे भरपूर चेहरे आढळतील जे स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे कसल्याही स्पर्धेत न पडता एकाएकी निरासक्त झाले आहेत.

धावत्या जगासोबत धावताना त्यांना काहीतरी आडवतं.ते काय आहे हाच प्रश्न आहे. आपल्याकडे सत्ता असावी असं सा-यांना वाटतं,मग त्यांच्या त्यांच्या लेवलवर कुणाला देशाची,कुणाला राज्याची,कुणाला तालुक्याची,कुणाला गावातली आणि कुणाला घरातली सत्ता हवी असते.

ही नैसर्गिक भावना आहे .मोठा भाऊ लहाण भावावर सत्ता गाजवतो.कांही तरी करून दाखवल्याशिवाय हा सत्तेचा सोपान भेठत नाही.फक्त समाजासाठीच नाही तर स्वतः साठी,स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी देखील काही तरी करणं हे गरजेचं आणि जगण्यास कारण देणारं असतं.

पण काही जनांना अशी वेळ येते की ते शेतातलं बुजगावणं होवून जातात.चार रूपयाचा किसान तोटा घ्यायचा म्हणला तर दहा एकरच्या मालकाच्या पोराला दुकानदाराकडे लाजून लाचार होवून उधारी करावी लागते.

स्वतःच्या घरामध्ये पैसे ठेवण्याची सर्व गुप्त ठिकाणे याला माहित आसतात, साखरेच्या डब्यात,दाळीच्या डब्यात आईने जपून ठेवलेले पैसे चोरण्याचे आजबगजब किस्से असतात.

आजच्या डिजीटल काळात पिशवीमध्ये शेरभर धान्य विकायला घेवून येवून चिरीमिरी हौस भागवणारे बळीराजाचे शापित पुञ पाहिले की मन सुन्न होतं.पैसा नसणाऱ्याला ना घरात किंमत रहाते ना समाजात.

पैसा येतो काही तरी प्रयत्न केल्यास,प्रयत्न करण्यासाठी लागतं स्वातंत्र्य आणि शेतकऱ्यांच्या पोरांस्नी स्वातंत्र्यच नाही.कारण स्वातंत्र्य देण्यासाठी त्याला अक्कल नाही अशी त्यांच्या पिताश्रींची (गैर)धारणा.

मग हा राग अगदी प्रेमळपणाने आमचा म्हातारा,डंगरं डुंगरं अशी पाठीमागे संबोधनं सुरू होतात.जेंव्हा नोकरदाराची पोरं दहावीलाच टु व्हिलर घेवून फिरतात तेंव्हा हा तुटका चप्पल लेवून भटकत असतो एसटीने, वायरची पिशवी हातात घेवून.

ग्यानगेलीपणाचा प्रवास इथूनच सुरू होतो.या शापिताचा पहिला संघर्ष घरातून सुरू होतो.सुरूवातीला लाड होतो.तो लाड काहीच करू देत नाही.जेव्हा काही करून दाखवण्याची इच्छा होते.

तेव्हा शेतात काबाडकष्ट करावे लागते.कुठली नवीन कल्पणा शेतीत मांडली की घरात स्विकारली जात नाही.कारण पीढीतला संघर्ष.त्यात पुन्हा दुष्काळ,भाव नसणे,हजारो सण,सांस्कृतिक गुलामगिरी या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आर्थिक अराजकता.

देशात आर्थिक आणीबाणी कधी लागू झाली नाही पण यांची आर्थिक आणीबाणी कधी संपलीच नाही.अगोदर विरोध करणारं घर आता एकाएकी कुजवून कुजवून काहीतरी कर म्हणून मागे लागतं.

आता हाजारो स्वप्नांचा चुराडा होवून उत्साह संपल्यावर याची अशीही काही करण्याची इच्छाच उरत नाही.विद्रोह करण्याची ताकद होत नाही कारण संस्कार तसे शिकवित नाहीत.बरेच जण बंड करून शहराची वाट धारतात आणि आयुष्यात काही करून दाखवितात.

एका नामांकित शेतकरी पुढाऱ्याचा ३८ वर्षाचा फक्त खिशाला पेन आडकावून मारूतीच्या पारावर विचार करत बसलेला मुलगा मी पाहिला आहे.मोठ्या झाडाच्या सावलीखाली लहाण झाडे येत नाहीत तसा हा निष्क्रिय राहिला.

हा कधीच चुकणार नाही कारण याला व्यवहार कधी कोण शिकु देणारच नाही.आयुष्यात काही वाईट केलं नाही एवढाच काय तो आनंद.वारसा हक्काने मिळालेली अन् उरलेली थोडीफार जमिन हा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी स्वतःच्या नियोजनाने कसणार !

म्हणजे अगोदरची पीढी येणाऱ्या पीढीला पुर्णपणे संपवल्याशिवाय रिटायर्ड होणारच नाही.आणि या लाडाक्या मांजराच्या हातामध्ये व्यवहार देणारच नाही.

लाडकं मांजर म्हणण्याचे कारण…  एका लहाण मुलाला एक मांजर खूप प्रिय होतं.आपल्या मांजराला एखादं कुञ खावून टाकेल म्हणून ते मांजर नेहमी जवळच मिठीत घेवून ठेवायचं.

जगाच्या भितीने त्या मांजराला कधी खाली सोडलच नाही.अतिप्रेमाने अतिमिठी मारल्याने त्या लहाण मुलाला हे समजलच नाही की ते मांजर श्वास घ्यायला न मिळाल्यामुळे मरून गेलं.

अशी अवस्था आहे गावाकडच्या कष्टकरी मुलांची.शाळेत असल्यापासूनच सगळी मुलं सहलीचं नियोजन करायले तर हा उठून जातो कारण त्याला माहित असते की घरून सहलीसाठी पैसे मिळणार नाहीत.

पार्टी करताना फुकट्या म्हणून त्याची हेटाळणी ठरलेली असते.लग्नाच्या बाजारात तर शेतकऱ्याचं पोरगं बेकिंमतच.मुलीकडचे त्याला नाही शेती बाघायला अगोदर येतात.

शेतकरी नवरा हा बदनाम शब्द.असं मानसिक,आर्थिक ,सामाजिक खच्चिकरण होवून उरतो फक्त थंड हाडामासाचा जिवंत वाटणारा गोळा.वर्षानुवर्षे अंधारकोठडीत राहिलेल्यांना जसा प्रकाश सहन होत नाही तसं बौध्दिक विचार यांना भावत नाहीत.

कुजून मरण्यापेक्षा झिजून मेलेलं केव्हाही चांगलं असतं.कांगारू जन्मलेल्या पिलाला जन्म होताच लाथ मारून पळायला शिकवतं कारण हे जग गोल नाही,चपटं नाही तर हरामखोर आहे.

इथे प्रत्येकजण शिकार तरी होतो किंव्हा शिकारी तरी होतो.बांधावरून किंव्हा कुठल्याही किरकोळ कारणावरून शेजा-याशी जेंव्हा भांडण होतं तेंव्हा ते भांडताना त्या भांडणाचं कारण हे दहा टक्के तर आयुष्याची निर्रथकता नव्वद टक्के वाटा उचलते.

म्हणून ते भांडण जास्त हिंस्र होतं.हीच मानसिकता मोठी मोठी होत आत्महत्येपर्यंत पोहचते. इकडे जागतिकीकरण,खाजगीकरण सोडा बाजारभाव अन् ऋतुमानाच्या पुढे अभ्यास गेलेला नसतो.

पण टी.व्ही.वरच्या मालिका चिञपट अन् शहरी नोकरदारांचा उच्च रहाणीमानाचा झिरपता सिध्दांत मनामध्ये असंतोष मुरवतो.तो गाठण्याचा मृगजळी प्रयत्न अन् खच्चिकरणातून निर्माण झालेलं न्युनगंड संभाळत हा संघर्ष चाललेला असतो.

पुण्या मुंबईकडे गेलेला आणि तिकडेच स्थायिक झालेला  एखादा भाऊ असेल तर तो गावाकडच्या या शेतकरी भावाला तुच्छ समजतो.त्याला पहिल्यापासूनच अक्कल नाही असं बिरूद लावतो.

हा शेतातला भाऊ लहाणपणापासून कष्ट करून दुसऱ्या भावाच्या शिक्षणासाठी हातभार लावतो.आणि शेवठी चिञपटातल्या राजेश खन्नासारखा याला ही न्याय मिळत नाही.

असे कितीतरी राजेश खन्ना आपल्याला जोगीजागी आढळतात.त्यांच्या कथेला चेहरा नसतो.बुड ही नसतं अन् शेंडाही नसतो.असते फक्त निशब्दता .असामाण्यत्वाकडून अतिसामाण्यत्वाकडे होणाऱ्या या प्रवासात तो कोणालाही दोषी ठरवत नाही.

कारण आपण खूप कांही करू शकत नाही हे त्यानं स्विकारलेलं असतं.बारोमास तग धरणे हाच पर्याय रहातो.

मग म्हशी राखण्यातलं छोठं छोठं अर्थशास्त्र अनुभवत चिल्लर मोजण्याऐवढा शहाणपणा तरी नियती त्याच्या उतारवयापर्यंत त्याला बहाल करते.

© जगदिश पाटील

7517772019

Please follow and like us:

Leave a Reply