एक भेट गरजेची…..

एक भेट गरजेची…..

किरकोळ गोष्टींमुळे होणारे वाद आता तिला ही असह्य होत चालले होते. कधी त्याला समजून घ्यायचे नसायचे आणि कधी तिला समजून घ्यायला वेळ लागायचा. मागच्या काही दिवसात ती त्याच्या वर इतके प्रेम करू लागली होती जितके कि, तिने या आधी कधीच कोणावर केले नसावे.

Loading...

तीचे सबंध आयुष्य व्यापले होते त्याने. त्याच्या शिवाय दुसरे काहीही सुचायचे अगदी बंदच झाले होते तिला. या सर्वाची सुरुवात का झाली? कशी झाली? आणि कशाला झाली कशाचेही भान नव्हते तिला.

पण तिच्या त्या जीव घेण्या एकांतात अचानक त्याचे येणे झाले आणि तिनेही नव्याने जगण्यासाठी त्याची साथ स्वीकारली.

Loading...

प्रेम तर तोही करायचा तिच्यावर अगदी ती करायची त्याहून जास्त पण, कधी कधी त्याचे त्यालाच कळायचे नाही कि, आपल्या अश्या वागण्या मुळे तिलाही त्रास होत असेल. ती होती समजूतदार अरे पण किती काळ ? आणि समजूतदार  आहे म्हणून काय आयुष्यभर इतरांना फक्त समजूनच घ्यायचे का तिने?

आणि समजून तरी का घ्यायचे, प्रेम करते म्हणून? मग तिला समजून घ्यायची वेळ येते तेव्हा काय होते ? तिच्या दिवसाच्या सुरुवाती पासून ते अगदी रात्री पर्यंत फक्त तो आणि तोच असायचा.

त्याचीही अवस्था यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. पण समजून घेणे काय त्याला फारसे जमायचे नाही. खरतर अगदी टोकाला जातील इतक्या मोठ्या गोष्टीही नसायच्या. पण याच किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करत गेल्यामुळे त्या गोष्टी एक दिवस टोकापर्यंत जाऊन पोहोचल्याच.

प्रत्येक वेळी असे व्हायचे तिला एखादी मनातील गोष्ट त्याला सांगायची असायची तेव्हा तो चुकीचा अर्थ लावून स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि मग, ती स्वतःचा त्रास बाजूला ठेऊन त्याला समजवू लागायची. पण, तिच्या मनातील अशांत वादळाचे काय ते कोण शांत करणार ? तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार ?

खूप अपेक्षा असायची तिची कि, कधी तरी त्यानेही तिला समजून घ्यावे, ती रुसेल तेव्हा तिला जवळ घेऊन समजवावे, तिच्या मनातील सर्व प्रश्न सहज सोडवावे.

पण असे काहीही होत नव्हते या उलट वाद व्हायचे आणि तो अबोला धरायचा. अशावेळी मग इकडे हिची अवस्था मेल्याहून मेल्या सारखी व्हायची अंगातून जीव गेल्यासारखे वाटायचे. अगदी ती जिवंत आहे कि नाही याचेही तिला भान उरायचे नाही.

या आधी एकदा असेच झाले होते फोन वरच्या बोलण्याने दोघांच्यातही गैरसमज झाले आणि मग तिनेच त्याच्या पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. खरतर हा निर्णय घेणे तिच्या साठी अगदी जीवघेणे होते पण, तिला जाणवत होते जसा तिला त्रास होतो आहे तसाच त्याला ही होत असणार तिच्यामुळे.

त्यावेळी मग तिने त्यांच्या नात्याची गरज ओळखून अगदी मनावर दगड ठेऊन तो निर्णय त्याला ऐकवला. निर्णय तिने फोन वरच सांगितला काही वेळ तो शांत झाला त्याचा फोन वर आवाज येणे बंद झाल्यावर मात्र त्याला न पहाताही त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची तिला जाणीव झाली. मग मात्र ती पुन्हा कमजोर पडली.

कारण त्याला होणाऱ्या वेदने पुढे तिला तिच्या स्वतःचे कसलेही भान रहायचे नाही. नेहमी नेहमी त्याची आसवे तिला हतबल करून टाकायची. अखेर तिनेच माघार घेतली आणि ती त्याला समजावू लागली.

रडू नको सोन्या, शांत हो, काही नाती नाहीत जात आयुष्याच्या शेवटापर्यंत, पण हो जिथे असेन तिथे तुझ्यावरच प्रेम करत राहीन वैगेरे, वैगेरे.

थोडा वेळाने शांत झाल्यावर मात्र तोही बोलला तुला खरच अस वाटत का? कि आपल्या प्रेमाला आता पूर्णविराम द्यायला पाहीजे? अस असेल तर आता या क्षणी मला तुझा अंतिम निर्णय काय आहे सांग?

त्रास मलाही होत आहे आणि तुला ही. पण हा त्रास एकमेकांमुळे नसून एकमेकांसाठी होता हे त्या दोघांच्याही लक्षात येत नव्हता. त्याने तिला जेव्हां तिचा अंतिम निर्णय विचारला तेव्हा मात्र तीच्या पाया खालची जमीन सरकली. कारण तिने जेव्हा हाच प्रश्न त्याला विचारला होता तेव्हा तिला केवळ त्याला जाणीव करून द्यायची होती कि, आपल्यात चाललेल्या तणावांचे परिणाम आपल्या दोघांत दुरावा आणू शकतात.

त्यावेळी तिच्या त्या प्रश्नानंतर तिला अपेक्षित होते कि, तो तिच्यावर ओरडेल रागावेल सोडून जाण्याची भाषा तुझ्या तोंडी आलीच कशी याचा तो  तिला जाब विचारेल.

पण, झाले उलटेच त्यानेही तिला तोच प्रश्न पुन्हा विचारला. कि, आपण थांबूयात का? तेव्हा मात्र तिच्याकडे काहीही उत्तर नव्हते त्यामुळे, शेवटी तिने तो निर्णय त्यालाच  घ्यायला सांगितला तूला जसे वाटते तसे करू.

त्यानेही मग वेळ न घालवता तिला त्याचा निर्णय सांगितला कि, हो आपण आपले नाते इथेच थांबवूया. हे ऐकल्यावर मात्र ती कोसळली. आता पुढे काय ? ज्याच्या शिवाय एक क्षणही मन लागत नाही तो आपल्यापासून दूर जात आहे हे तिला सहन होणे शक्यच नव्हते. काय बोलावे तिला काहीही सुचत नव्हते.

त्याला कसे समजवावे हे ही तिला कळत नव्हते. तो फोन शेवटचा फोन असेल या पुढे कधीही आपले बोलणे होणार नाही याचा विचार करून फोन ठेवण्याचीही तिच्यात हिंमत येत नव्हती . काही वेळाने जसे तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता तसाच तोही तिला समजावू लागला.

रडू नको सोन्या, शांत हो, काही नाती नाहीत जात आयुष्याच्या शेवटापर्यंत, पण हो जिथे असेन तिथे तुझ्यावरच प्रेम करत राहीन वैगेरे, वैगेरे. त्याचे बोलणे ऐकून मात्र ती  इकडे ढसाढसा रडत होती.

काही वेळाने जेव्हा तिच्या लक्षात आले कि, हा आपण बोललेलेच शब्द हा आपल्याला ऐकवत आहे तेव्हा मात्र ती भडकली आणि म्हणाली, माझेच शब्द का मला ऐकवत आहेस, तुझ्याकडे मला बोलायला तुझे स्वतःचे शब्दही नाही राहिलेत का आता ?

ते ऐकून मात्र तो हसला आणि म्हणाला, नाही ग सोन्या तू, तुझे आणि तुझ्या शिवाय माझे असे काय आहे आता माझ्याकडे?. मला फक्त तुला जाणीव करून द्यायची होती कि, एखाद्यावर निर्णय लादून पुन्हा त्याला समजावणे खूप सोप्पे असते पण, कोणी आपला कसलाही  विचार न करता जेव्हा असे निर्णय ऐकवत तेव्हा ते सहन करणे मात्र कठीण असते. किती सहज बोलून गेलीस ना आपण वेगळे होऊ. त्यावेळी मला कसे वाटले असेल याची जाणीव करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. वेडाबाई कुठे जाणार मी तुला सोडून जीव तरी लागेल का माझा. लवकरच सुट्टी टाकून येईन मी खूप दिवस झाले तुला पाहीलेही नाही.

खरतर त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून त्याला तिला फार वेळ देता यायचा नाही. त्यामुळे त्या दोघांच्या मनातील प्रेम तेव्हा फक्त कॉल आणि मेसेज वर येऊन थांबले होते. त्यांच्यात निर्माण होत चाललेली ती दरी मिटवण्यासाठी त्या दोघांनाही एका भेटीची गरज नक्कीच होती.

जो काही मनात राग रुसवा आहे तो एकमेकांच्या मिठी मधेच जाऊन विरघळणार होता. आणि त्यानंतर काय मग अगदी काही दिवसांतच त्या दोघांची भेट झाली आणि नेहमी प्रमाणे एकमेकांसोबतचे ते क्षण मनसोक्त जगून घेतले त्या दोघांनी.

त्या भेटी नंतरचे काही दिवस मात्र नेहमी प्रमाणे छान गेले. प्रत्यक्षात भेटी मधून होणारे संभाषण आणि फोन व मेसेज मधून होणारे संभाषण यात फरक असतो पुन्हा एक दिवस किरकोळ गोष्टींवरून दोघांच्यात गैरसमज झाले आणि त्यामुळे पुन्हा वाद झाले. तिला जे बोलायचे होते त्याचा नेमका उलट अर्थ त्याने घेतला आणि त्या चुकीच्या समजुतीतून तो पुन्हा दुखावला गेला त्यावेळी मात्र ती कमजोर न पडता तिच्या मनात चाललेले सर्व काही त्याला बोलू लागली.

जे आता पर्यंत कधीही नाही बोललेली ते सर्व. या सगळ्याच त्याला त्रास होईल याचा विचार करण्याच्या मनस्थितीत तीही नव्हती ओघाने ती त्याला बोलत गेली. आणि ते काही त्याच्या हळव्या मनाला सहन झाले नाही. काही वेळाने ती भानावर आली आपण काय बोलून गेलो हे तिच्या लक्षात आले आणि नेहमी प्रमाणे पुन्हा ती त्याला  समजावू लागली.

त्याने तिला समजून ही घेतले. दोघांच्यात पुन्हा छान बोलणे झाले प्रेमाने दोघांनी एकमेकांची समजूत काढली. दोघेही शांत झाल्यावर काही वेळाने त्यांनी फोन ठेवला. रात्र झाली नेहमी प्रमाणे तिने त्याला मेसेज केला. कसा आहेस सोन्या, शांत झालास का,बर वाटत आहे का आता? कशाचाही विचार करू नको शांत झोप उद्या कॉल करते.

त्यावर त्याचे काहीच उत्तर आले नाही. त्याने मेसेज पाहीले पण उत्तर दिले नाही. इकडे ही मात्र बैचेन होऊ लागली. पुन्हा काही वेळाने तिने मेसेज केला. काय  झालं सोन्या बोलत का नाहीस ? त्यावर ही काही उत्तर नाही. पुन्हा काही वेळ वाट पाहून तिने त्याला पुन्हा मेसेज केला त्यावेळीही त्याचे उत्तर नाहीच आले आणि मग मात्र  हिचा संयम तुटला आणि रागाच्या भरात तिने त्याला शेवटचा मेसेज केला.

सर्व ठीक झाले होते आपण दोघेही शांत झाले होतो तरीही तू पुन्हा तेच घेऊन बसलास. प्रत्येक वेळी जिथे जिथे मला गरज होती तिथे तिथे तू स्वतःला  होणाऱ्या त्रासा बद्दल बोलत राहीलास आणि मग मी , मला होणारा त्रास विसरून तुझा विचार करू लागले आताही तुझाच विचार करते.

तुला नाही वाटत आहे बोलावेसे तर ठीक आहे मीही नाही आता तुला जबरदस्ती करणार आणि यापुढे तुला त्रास ही नाही देणार. प्रयत्न करेन कि माझे तोंडही तुला कधी दिसू देणार नाही आणि त्यानंतर तिने रागाने स्वतःचा व्हॉट्स अप डीपी काढून टाकला. यावेळीही तिला अपेक्षा होती कि, त्याचा एक तरी मेसेज येईल.

पण, नाही असे झाले नाही. आगदि काहीच वेळात त्यानेही तिला त्याच्या सर्व सोशिअल अकौंट वरून ब्लॉक करून टाकले. या आधी अनेकदा असे किरकोळ वाद झाले होते पण, त्या दोघांनी एकमेकांना कधीही ब्लॉक केले नव्हते. हा त्यांच्या नात्याचा शेवट तर नसेल ? ती रात्र मात्र कशी बशी काढली तिने, अर्थात या परीस्थितीत झोप येणे तिला शक्यच नव्हते.

श्वास घेणेही जड जात होते तिथे झोपेच काय येणार ? पहाट झाली उठल्या पासून ती सतत स्वतःचा फोन चेक करत होती. पण, त्याचा कॉल मेसेज नव्हताच आला. आता पुन्हा कधी येईल कि, नाही हे ही तिला ठाऊक नव्हते. स्वतःलाही तिला कमजोर पडू द्यायचे नव्हते. त्याचा नंबर डाईल तर करायची पण कॉल करताना स्वतःच स्वतःला अडवायची.

कारण तिलाही आता कळून चुकले होते समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपली कमजोरी कळते तेव्हा तो आपला अधिक अधिक फायदा घेऊ लागतो. तिला हे जे शहाणपण आले होते ते परिस्थिती मुळे आले होते पण हेच शहाणपण आता तिच्या अंगाशी येऊ लागले होते. त्याच्या फोनची वाट पहात असताना जशी जशी वेळ जाईल तसा तसा तिचा संयम तुटत चालला होता.

मनात वाटायचे आपण फोन केला आणि त्याने तो नाही घेतला किंवा घेऊन आपल्याला स्पष्ट पणे जे आपण सहन नाही करू शकणार ते सांगितले तर ? सहनही होत नाही नाही आणि कोणाला सांगता ही येत नाही अश्या अवस्थेतून ती जात होती.

या नंतर कधी त्याचा फोन येईल कि नाही, काय माहीत? कि खरच त्याने त्याच्या कडून सर्व संपवले असेल ?…..आणि जर संपवलेच असेल तर तिचे काय ? जी एक क्षणही त्याच्या शिवाय राहू शकत नव्हती, त्याच्या आवाज ऐकल्याशिवाय जिचा दिवस सुरु ही  होत नव्हता ती त्याच्या निघून जाण्याने एकटी जगू शकेल काय ?

कदाचित त्यांचे नाते पुन्हा एका भेटी नंतर ठीक होईल ती भेट झाल्यावर, एकमेकांना समोर पाहील्यावर भावनेच्या भरात जेव्हा पुन्हा ते दोघे एकमेकांच्या मिठीत जातील तेव्हा सगळी किल्मिषे विसरून ते दोघे नक्की विरघळतील पण, असे न बोलता अबोला धरून  त्यांच्या नात्याला गरज असलेली ती भेट पुन्हा कधी होऊ शकेल का ?

कि पुन्हा एकदा त्याच्या जाण्याने आलेल्या त्या  जीवघेण्या एकटेपणा सोबत ती निघून जाईल. कदाचित इतक्या दूर कि, जिथून पुन्हा कधीही परतून येणे अशक्य असेल ……

Please follow and like us:

Leave a Reply