उचकी (हिक्का ) 

उचकी (हिक्का )

छाती आणि पोट ह्यांच्यामध्यें एक विभाजक पडदा (डायाफ्रम) आहे. त्याच्यावर मेंदू मधून निघून एक मज्जातंतु (फ्रेनिक नर्व्ह) पसरला आहे. या विभाजक पडद्यास मध्यपटल व मज्जातंतूस मध्यपटलतंतु असें म्हणतात.

उचकीमध्यें विभाजक पडदा एकदम संकोचन पावून खालीं उतरतो, त्यामुळें हवा, श्वासमार्गाच्या तोंडावरील पडदा जोरानें उघडून, आवाज उत्पन्न करणार्‍या रज्जूवर (व्होकल कार्डस ) आदळते व त्यामुळेंच उचकीचा विशेष आवाज उत्पन्न होतो.

Loading...

कारणें

मध्यपटलतंतूस इजा झाली असतां लागलीच उचकी लागते. आधिक अन्न किंवा उदक सेवन केल्यानें किंवा पचनक्रिया नीट न झाल्यामुळें कोठ्यांत वायूचा संचय होऊन कोठा अधिक फुगतो व तेणेंकरून उचकी लागते असा नेहमीं अनुभव आहे.

विशेषत: मोठ्यापेक्षां लहान माणसास उचकी लागण्याचें कारण बहुधां हेंच असतें. उचकी प्रत्यक्ष किंवा दूरच्या कारणांनींहि उत्पन्न होते. पुष्कळांनां उष्ण व तिखट पदार्थ सेवन करतांक्षणींच उचकी लागते.

Loading...

क्वचित थोडयांनां नुसता कढत पातळ पदार्थाचा घोट घेतल्यानें उचकी लागते. आंत्रवेष्टनत्वगदाहा मध्यें (पेरिटोनायटीस) जेव्हां मध्यपटलाच्या वरील सूक्ष्म जलत्वचा सुजते तेव्हां उचकी लागते.

कोट्यांत काळपुळी किंवा दुष्ट विद्रधि (क्यानसर) झाला असतांना उचकी लागते. महामारीचा रोगी बरा होत असतांना कधीं कधीं अनिवार उचकी लागते व त्याबरोबर ढेकरा येऊन एखादे वेळीं वांतीहि होते.

सारांश बहुतकरून उचकी हें कोठ्यांतील किंवा उदरांतील विकाराचें सूचक लक्षण होय. तथापि मेंदूत विकार होऊन तो मध्यपटलतंतूच्या मुळास पोंचला असतांना फारच कठिण उचकी लागते. भूतोन्माद किंवा गर्भाशयोन्मादामध्यें (हिस्टिरिया) सारखी तासांचे तास स्त्रियांस उचकी लागलेली आढळते.

क्षयादि दुर्धर रोगांच्या शेवटच्या स्थितींत, भयंकर विषम ज्वरांत, मेंदूमध्यें कायमचा बिघाड होऊन उत्पन्न झालेल्या रोगांत, व दुसर्‍या जाज्वल्य, ताज्या किंवा जुनाट आजारांत उचकी लागली असतांना तें असाध्य व भयंकर लक्षण समजतात. कांहीं विशेष रोग नसतांना कसलीहि भयंकर व एकसारखी उचकी लागली तरी भिण्याचें मुळींच कारण नाहीं.

कारण रात्रंदिवस मध्यें न खळतां आठ दिवस किंवा अधिक दिवसपर्यंतहि उचकी लागलेले रोगी, त्यांच्या यातनेवरून असाध्य वाटले, तथापि बरे होतात असें पुष्कळदां अनुभवास येतें.

मात्र अशा रोग्यास अन्न जात नाहीं. निद्रा मिळत नाहीं व उचकीच्या सारख्या श्रमामुळें अगदीं थकून जातो, त्यामुळें त्याला आपण जगत नाहीं असें वाटतें व क्वचित असा प्रकार होणें संभवनीय आहे.

उपाय

उचकीवर उपचार करणें तो तिच्या कारणांवर अवलंबून आहे. कोठ्यांत अपक्व अन्नाचा संचय असल्यामुळें उचकी लागल्यास मोहरीची पूड, मीठ किंवा दुसरे वामक पदार्थ ऊन पाण्यांत द्यावे.

नुसतें ऊन पाणी पुष्कळ पिऊन घशांत बोट घातल्यानेंहि वमन होतें, किंवा पचनाची कोठ्यांतील क्रिया वृद्धि पावून तें अन्न पचावें अशासाठीं पाचक औषधें द्यावींत.

सोडा किंवा सज्जीखार दहा गुंजा व सुंठ दोन गुंजा पाण्याबरोबर द्यावी, किंवा थोडें हिंगाष्टक चूर्ण द्यावें. स्पिरिट अमोनिया आरोम्याटिकचे तीस थेंब किंवा चमचाभर ब्रांडी घोटभर पाण्यांत दिल्यानेंहि उचकी रहाते; पोटावर अथवा मानेवर राईचें पोटीस लाविल्यानेंहि उचकी रहाते.

शंभर अंक मोजीपर्यंत श्वास न सोडला तर किंवा एक मिनिटपर्यंत श्वास कोंडून धरला तर उचकी रहाते; क्लोरोफार्म हुंगण्यास दिल्यानें किंवा एक दोन थेंब साखरे बरोबर पोटांत दिल्यानें तात्काळ उचकी राहाते.

साखरे बरोबर कापराच्या अर्काचे पांच थेंब प्रत्येक पांच मिनिटांनीं उचकी राहीपर्यंत द्यावे; पोटासा ब्रोमाईड दहा ग्रेन व क्लोरल हायड्रेट दहा ग्रेन घोंटभर पाण्यांत दिल्यानेंहि उचकी बंद होते, असा अनुभव आहे.

थोंडी कस्तुरी दिल्यानेंहि उचकी बंद होते. मॉरफियाची त्वचेखालीं पिचकारी दिल्यानेंहि सतत लागणारी उचकी राहते. पण ही क्रिया माहितगार वैद्यानेंच केली पाहिजे; बर्फाचे तुकडे चोखल्यानेंहि उचकी रहाते;

संवय नसलेल्या मनुष्यानें तंबाखू ओढल्यानें उचकी तात्काळ बंद झाली असेंहि पाहण्यांत आहे; क्लोरोडाईन वीस थेंब उचकीवर देण्याचा पुष्कळांचा प्रचार आहे;

पोटाच्या डाव्या बाजूस म्हणजे कोठ्याच्या भागावर पट्ट्यानें अथवा हातानें चांगला दाब ठेविल्यासहि उचकी रहाते [ भिषग्विलास पृ. १ पु. १२४ – १२६ ].

आयुर्वेदीय निदान

यासंबंधीं आर्यवैद्यकांत पुढील माहिती आढळते. श्वासाचीं व उचकीचीं कारणें, पूर्व रूपें, प्रकार व स्थानें एकच आहेत.वायु ऊर्ध्व होऊन हिक् असा आवाज उत्पन्न करतो, त्यास हिक्का (उचकी) असें म्हणतात (हिगितिकृत्वाकायते मा. नि. टी. पृ.९०).

उचकीचे भक्तोद्भव, क्षुद्रा, यमला, महती व गंभीरा असे पांच प्रकार आहेत.रुक्ष, तीक्ष्ण, जाडेभरडें व असात्म्य, अन्नपान, घाईघाईनें व यथेच्छ सेवन केल्यानें वायु पीडित होऊन उचकी उत्पन्न करितो. या उचकींत पीडा होत नाहीं.

शब्द मंद असतो, ती शिंकेबरोबर येते आणि सात्म्य अन्नपानानें बंद होते तीस *अन्नजा* असें म्हणतात.श्रमाच्या योगानें वायु किंचित् कुपित होऊन क्षुद्रा नांवाची उचकी उत्पन्न करितो.

ही जत्र (गळ्याखालचें हाड) च्या मुळापासून उत्पन्न होते. हिचा वेग थोडा असतो. ही फारशी पीडा करीत नाहीं. श्रम केले असतां वाढते आणि जेवल्याबरोबर कमी होते.

आहाराचें पचन होऊं लागण्याच्या संधीस बर्‍याच वेळानें जी उचकी दुहेरी वेगानें सुरू होते व पचन झाल्यावर वाढते, जींत डोकें व मान हीं कापतात, पोट फुगतें, अतिशय तहान लागते, मनुष्य बडबडतो, वांती व जुलाब होतात, डोळे कावरेबावरे होतात व जांभया येतात, तीस यमला, वेगिनी किंवा परिणामवती अशीं सार्थ नांवें दिलीं आहेत.

महती नांवाच्या उचकींत भिंवया व आंख ताठतात, डोळे पाण्यानें भरतात व चंचल होतात, शरीर निश्चेष्ट होतें, वाचा बंद होते, स्मृति व शुद्धि नाहींशीं होते, अन्नमार्ग बंद होतात, हृदयादि मर्मांस धक्का बसतो, रोगी पाठीच्या बाजूनें वांकतो आणि शरीर शुष्क होतें.

हिचें उत्पत्तीकरण, शब्द, वेग व बल हीं जबर असतात.गंभीरा उचकी पक्वाशयापासून किंवा नाभिस्थानापासून उत्पन्न होते आणि तिचा उत्पत्तिप्रकार व लक्षणें हीं महती नांवाच्या उचकीसारखींच असतात.

विशेष एवढाच कीं हींत वरचेवर जांभया येतात व रोगी हातपाय ताणून आळस देतो. हिच्यामागून गंभीर नाद होतो म्हणून हीस गंभीरा असें म्हणतात. सदरहुपैकीं पहिल्या उचक्या अन्नजा व क्षुद्रा या साध्य आहेत.

शेवटच्या दोन महती व गंभीरा असाध्य समजून सोडून द्याव्या. तशीच बाकी राहिलेली यमला सर्व लक्षणयुक्त असल्यास तीहि असाध्यच समजावी.

तसेंच ज्या मनुष्याचा पुष्कळ दिवसांचा आम सांचला आहे असा व म्हातारा, फार स्त्रीसंग करणारा, इतर रोगांनीं ज्याचें शरीर क्षीण झालें आहे असा, अन्न तुटल्याकारणानें क्षीण झालेला, अशा मनुष्यास कोणत्याहि प्रकारची उचकी लागली तरी ती असाध्य समजावी.

चिकित्सा

दमा, व उचकी, यांचीं कारणें व संप्राप्ति एकच असल्यामुळें दोहोंची चिकित्साहि एक स्वरूपाचीच आहे. दम्याच्या चिकित्सेंत सांगितल्या प्रमाणेंच शेकणें, अनुलोमन औषधें, ओकारीचीं व हलकीं विरेचनें देणें यानेंच वायूचा अडलेला मार्ग मोकळा होऊन उचकी थांबतें.

इतकें करूनहि उचकी न थांबेल तर सूक्ष्म स्रोतसांतून चिकटलेला कफ सुटून बाहेर येण्याकरितां चंदन, राळ, दर्भ, या सारख्या पदार्थांचा धूम घ्यावा.लसूण, कांदा, गाजर किंवा चंदन यांचा रस आंगावरील दुधांत वाटून नाकांत घालावा किंवा माशीची विष्ठा अळित्याच्या रसांत खलून नाकांत घालावी.

यानें ताबडतोब उचकी थांबते.केव्हां केव्हां उचकी केवळ उपासानें थांबते. दुसर्‍या पुष्कळ रोगांनीं उचकी लागते त्यावेळीं त्या रोगावरील औषध दिल्यानें उचकी बरी होते.तापाच्या जशा दोषभेदानें मुदती आहेत त्याप्रमाणें उचकी हा रोगहि केव्हां केव्हां मुदतीचा असतो.

त्यावेळीं हलकें अन्नपान व अनुलोमन औषध एवढीच चिकित्सा करावी, तीव्र औषधें देऊं नयेत.हर्ष, इर्ष्या इत्यादि मनोविकार उत्पन्न करूनहि दम्याप्रमाणेंच उचकी जाते.

पथ्याकरितां साठेसाळी, हुलगे, सातू वगैरे धान्यें व दम्याच्या चिकित्सेंत सांगितलेल्या भाज्या व पाणी वगैरे सर्व अन्नपान दम्याच्या चिकित्सेप्रमाणें उचकीवरहि समजावें [..वाग्भट; चरक; योगरत्‍नाकर ]

Please follow and like us:

Leave a Reply