शंभुराजे आणि गोदावरी, कमळा, तुळजा प्रकरण

शंभुराजे आणि गोदावरी, कमळा, तुळजा प्रकरण

सत्य, तथ्य आणि मिथ्यसंतोष काशीद.छत्रपती संभाजी राजे आणि वाद हा इतिहासात पडलेला पायंडा आपल्या सारख्या शिव-शंभुप्रेमींना नक्कीच क्लेशदायक आहे.यावर अनेक मतप्रवाह आहेत. या मतांतरामुळे आजवर शंभुराजांच्या चारीत्र्यावर या ” गोदावरी ” आणि तत्सम काल्पनिक स्त्री व्यक्तिरेखांचा आणि त्यासंदर्भात रचलेल्या प्रकरणांचा काहीसा पूर्वग्रहदूषित परिणाम झाला आहे.

हे मात्र मान्य करावेच लागेल.संभाजी राजेंच्या बाबत सर्वात पहिला नकारात्मक उल्लेख हा मल्हार रामाराव चिटनीस लिखित ” चिटनीस बखर ” मधे सपडतो. मुळात ही बखर ही संभाजी राजांच्या मृत्यु नंतर सुमारे १२२ वर्षांनी म्हणजे १८११ साली लिहिली गेली.आता १२२ वर्षांनी लिहिलेल्या या बखरीमधला वृत्तान्त किती खरा मानावा हाही एक प्रश्न आहेच.

Loading...

कारण केवळ आपल्या एका वंशजाला शंभुराजांनी राजद्रोह अन स्वामीद्रोह या गुन्ह्यांखाली हत्तीच्या पायी दिले म्हणून या बखरीमधे असा धादांत खोटा इतिहास लिहिला गेला.त्या अगोदर म्हणजे साधारण १६९७ मधे जींजीच्या किल्ल्यात असताना छ. राजाराम महाराजांच्या अश्रयाला असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद याने राजाराम महाराजांच्या आज्ञेने छ. शिवरायांचे चरित्र वर्णन लिहिले.

या बखरीमधे शंभुराजेंच्या बदनामीचा पाया रचला होताच. या बखरीमधे असलेल्या कित्येक निखालस खोट्या आरोपांना आज अनेक संशोधकांनी आपल्या चिकित्सक संशोधनाने साफ़ खोडून काढले आहे.त्याचामुळे ” सभासद बखर ” ही विश्वसनीय ऐतिहासिक दस्तावेज मानला जात नाही.

Loading...

याच कागदांचा आधार घेत काही परकीय सत्तेच्या वकिलांनी किंवा प्रतिनिधींनी शंभुराजेंच्या बदनामिस हातभार लावला. यात त्यांनी आपल्या धन्याची मर्जी राखान्याचाच प्रयत्न अधिक केला.

मात्र, तब्बल चाळीस वर्ष संशोधन करुण

वा.सी. बेंद्रे यांनी १९६० साली लिहिलेले ” छ.संभाजी महाराज “, हा ग्रंथ,आपल्या “विद्यावाचस्पतीच्या”( Ph.D.) प्रबंधासाठी संभाजी चरित्र हा विषय घेऊन डॉ. कमल गोखले यांनी १९७१ साली लिहिलेला ” शिवपुत्र संभाजी ” ग्रंथ,ज्येष्ठ अभ्यासक डॉ.जयसिंगराव पवार यांनी १९९० साली लिहिलेला ” छ. संभाजी महाराज ” हा स्मारक ग्रंथ,तसेच आनखीही अनेक प्रसिद्ध लेखकांच्या उत्कृष्ट ग्रंथांमुळे ( छावा, संभाजी, शापित राजहंस, ज्वालज्वलनतेजस संभाजी राजा, ई. ) या सर्वांमुळे शंभु चरित्राकडे पाहन्याचा सर्वसामान्य शंभुप्रेमींचा कल बदलला.

यातून आपल्या पुढे एक बेडर, शुर अन प्रजाहित दक्ष ” संभाजी ” उभा राहिला.पण तरीही, संभाजीराजांच्य जीवन चरित्रात कही अज्ञात स्त्री पात्रे घुसवली गेली. यातून त्यांना बदफैली, रंगेल अन अय्याशी असेच प्रतीत केले गेले.

त्यांचा मोठा विपरीत परिणाम पुढे राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य हनन करण्यासाठी केला गेला.

कोण होती ही पात्रे___?? काय त्यांची सत्यता___? किती खरी किती खोटी___?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला काही ऐतिहासिक दस्तावेजांचा आधार घ्यावा लागेल. त्याचाच आधार घेत आपण पुढे गेले तर, यावर अधिक प्रकाश पडेल अन आपल्याला या आरोपांवर उत्तरेही सापड़तील.शिवकालीन अन शिवोत्तरकालीन काही बखरकारानी संभाजी राजांच्या आयुष्यात विनाकारण प्रवेशलेली तीन ऐतिहासिक स्त्री पात्रे म्हणजे ,

1) गोदावरी,2) तुळसा,3) कमळा

याच पत्रांच्या भोवती राजांचे तथाकथित ” लंपटपनाचं ” आयुष्य फिरत राहिले आहे.

आपण प्रथम, गोदावरीचा निकाल लावू

सभासद बखरीत जरी संभाजी राजांच्यावर बीघडलेला युवराज असा ठपका ठेवला असला तरी, त्यात राजांच्या आयुष्यातील ” स्त्री ” विषयासक्त लिखाण कुठे आढळत नाही. मात्र शंभु मृत्यु नंतर तब्बल १२२ वर्षांनि लिहिलेल्या ” चिटनीस बखरी ” मधे संभाजी राजांनी अष्टप्रधान मंडळातील सुरानविस अण्णाजी दत्तो यांच्या भाचीवर राजवाड्यात हळदी-कुंकु कार्यक्रमासाठी आल्यावर एकटी असताना बलात्कार केल्याचा उल्लेख आहे.शिवाय, शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना आपल्यापेक्षा उच्च वर्णातील मुलीशी अगम्यागमन केल्यामुळे शिक्षा केली असेही म्हटले आहे.

अर्थात शिवरायांचं जीवन पाहिले तर, त्यात जाती भेदाला त्यांनी किती महत्व दिल असेल हे आपल्या सहज लक्षात येईल.अदिलशाहीचा इतिहास महम्मद झुबेरी याने ” बुसातीन उस सलातीन ” या ग्रंथात लिहिला. हा ग्रंथ चिटनीस बखरी नंतर सुमारे १३ वर्षांनी म्हणजे १८२४ साली लिहिला.यात त्यानेच चिटनीस बखरीचीच री ओढली आहे.

आणि शंभुराजेंना दोषी ठरवले आहे.१८२६ साली सातारचा पॉलिटिकल एजंट असलेल्या डफ याने ” हिस्टरी ऑफ़ मराठाज ” हा ग्रंथ लिहिला यातही त्याने चिटनीस बखरीमधे असलेले संभाजी राजांच्या दुर्वर्तनाचे उल्लेख पुन्हा केले आहेत.यापुढील काळातही या चिटनीस बखरीचा आधार घेऊन अनेकांनी संभाजी राजांच्या विरोधात मत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

अर्थात त्यामुळे राजांच्या बाबत समाज प्रतिमा विरोधात्मक नक्की झाली.संभाजी म्हणजे एक दुर्वर्तनी, अय्याशी, लंपट,हेकेखोर अन अपात्र युवराज अशीच प्रतिमा समाजासमोर निर्माण झाली.पुढे १९६० नंतर वसंतराव कानिटकर यानी “रायगडाला जेव्हा जाग येते”हे नाटक लिहिले. या नाटकालाही वसंतरावांनी चिटनीस बखरीचाच आधार घेतला.

त्यांनी जर वा.सी.बेंद्रे यांच्या “छ.संभाजी महाराज ” या अभ्यासात्मक लिहिलेल्या कादंबरीचा आधार घेतला असता तर कदाचित शंभुराजांची प्रतिमा तत्कालीन समाजात अधिक चांगली राहु शकली असती.”गोदावरी “हे स्त्री पात्र सर्वात प्रथम या नाटकातून समाजासमोरआले.

चिटनीस बखरीमधील तोपर्यंत अज्ञात असलेल्या त्या अनामिक मुलीला सर्वात अगोदर ” गोदावरी ” नाव देण्याचा मान यामुळे आपोआप वसंतराव कानिटकर यांना जातो.ज्येष्ठ पुरानकथा लेखक द.ग.गोडसे यांनी केसरीच्या १९८४ च्या दिवाळी अंकात ” संभाजी राजा आणि गोदावरीची कथा ” या नावाने आपले एक संशोधन प्रसिद्द केले.यात ते म्हणतात की, ही समाधी सवाई माधवराव पेशवे यांची पत्नी यशोधरा बाई ( की, यशोदाबाई?) यांची आहे. ( अर्थात याबाबत सुद्धा शंका आहेच)यावरून आपल्याला हे म्हणायला वाव आहे की, चिटनीस बखर ही तद्दन खोटी असून त्यातील ” ती ” मुलगी म्हणजे एक कल्पित पात्र आहे.म्हणजेच ” गोदावरी ” हे एक निखालस काल्पनिक पात्र आहे जे, शंभुराजांच्या जीवनात कानेटकरांनी जबरदस्ती घुसवले आहे.

आता आपण ” कमळा ” या एका काल्पनीक पात्राकडे येऊ

प्रसिद्द कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ़ कवी बी यांनी ” कमळा ” नावाचे काव्य लिहून या कमळा पात्राला संभाजी राजांच्या आयुष्यात घुसवले.यावर पुढे भालजी पेंढारकर यांनी ” थोरातांची कमळा ” नावाचा चित्रपट काढून तिला संभाजी राजांची प्रेयसी म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवले.आणि संभाजी राजे या माध्यमातून पुन्हा एकदा बदफैली म्हणून समाजासमोर आले.पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या ” आपटी ” नावाच्या गावात असलेल्या एका समाधीला आज ” कमळेची समाधी ” असे समजले जाते.

मात्र खरच ती समाधी कोण्या कमळा नावाच्या स्त्रीची आहे का? हीच का ती समाधी जी थोरातांच्या कमळेची म्हटली जाते?

याचा पाठपुरावा मात्र कोणी करत नाही काय आहे याचे सत्य?पन्हाळ्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक मु.गो.गुळवणी यांनी यावर संशोधन करुन अधिक प्रकाश टाकला आहे. गेली कित्येक वर्षे सज्जाकोठीच्या खाली असलेल्या “आपटी ” गावामधील ते समाधी मंदिर खरच त्या थोरातांच्या कमळेचे आहे काय?याच सत्याचा मागोव घेत गुळवणी सरांना हाती लागलेली माहीती मोठी मनोरंजक आहे.

सदर समाधी ही, राजाराम पुत्र ” दूसरा संभाजी ” यांच्या दरबारातील एक शुर सेनानी यशवंतराव थोरात यांची व त्यांच्या पत्नीची म्हणजे गोड़ाबाई यांची आहे.ज्या जागेत आज ही समाधी आहे त्या जागेची नोंद तहसील कचेरीत आहे. या जागेचे वहिवाटदार श्री आप्पा धोंडी कदम हे असून सर्वे नंबर १९७, क्षेत्र १ एकर १५ गुंठे आहे. याच क्षेत्रातील ३ गुंठे पोटखराब जागेत असलेल्या थड़ग्याला ” थोरातांचे थडगे ” असे संबोधले जाते.यातही कुठे ” कमळा ” नावाच्या स्त्री व्यक्तीमत्वाचा उल्लेख सापडत नाही. गुळवणी सरांनी यावर अधिक संशोधन केले असता, त्यांना ” जीवाजी बिन शिवाजी ” यांच्या ‘ करीन्यात ‘ याबाबत बरीच माहीती मिळाली. हे ” करीने ” म्हणजे त्या त्या घराण्यांचा इतिहास असतो.यशवंतराव थोरात हे पन्हाळ्याच्या पायथ्याला कोल्हापुरकरांच्या बाजूने पेशव्यांच्या विरोधात झालेल्या एका लढाईत छातीत भाला घुसुन ठार झाला. पुढे त्याची बायको म्हणजे गोड़ाबाई ही समस्त गावाच्या समोर सती गेली. त्या दोघांचे थडगे ( समाधी ) याठिकानि बांधण्यात आली.सध्या यात दोन पाषाण मूर्ति असून त्यातील एकाच्या हातात ढाल तलवार ई. शस्त्रे सुद्धा आहेत.यावरुन गोदावरी सारखेच ही कमळा सुद्धा संभाजी राजांच्या आयुष्यात काल्पनिक रीत्या घालण्यात आली. पुढे हीच क़मळा इतिहासात संभाजी राजांची प्रेयसी म्हणून अजरामर झाली.

तुळजा — एक निराधार पात्र

वरील दोन काल्पनिक व्यक्तिरेखांप्रमानेच शंभुराजांच्या आयुष्यात आणखी एका काल्पनिक स्त्रिला जागा मिळाली. हिला ज्येष्ठ नाटककार रा.ग.गडकरी यानी समाजात संभाजीची प्रेयसी म्हणून मान्यता मिळवून देण्यात ” मोलाचा ” वाटा उचलला.कानिटकरांची गोदावरी आणि थोरातांची कमळा या जशा अलगद शंभुराजेंच्या गळ्यात अडकल्या तशीच ही गडकऱ्यांची कमळा संभाजीच्या गळ्यात अडकली.

कसलाही ऐतिहासिक आधार नसलेल्या या तुळजाला १८९१ साली आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी आपल्या संगीत ” श्री छ. संभाजी महाराज “या नाटकात प्रथम जन्म दिला. याच नाटकाचा आधार घेऊन पुढे ही तुळजा प्रसिद्द झाली.हिचं वरील दोघींसारखे थडगे व समाधी कुठेही अस्तित्वात नाही.

तरीही १८९१ साली पाठारे यांनी तिला जन्म दिला. याच तुळजाला पुढे १९२२ साली रा.ग.गडकरी यांनी आपल्या ” राजसन्यास ” या लोकप्रिय नाटकात मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणून सर्वसामान्य लोकांपुढे स्थिर केले.१९२३ साली आपल्या ” राजसंसार ” मधे वि.वा. हड़प यानी सुद्धा हाच कित्ता गिरवत तुळजाला आणखी प्रकाशात आणले.सुदैवाने या तुळजाचं दृश्य स्वरुपात ( समाधी ई. ) कुठेही अस्तित्वसापडत नाही त्यामुळे गोदावरी आणि कमळाच्या तुलनेत ती मागे पडली.पण तरीही संभाजी राजांच्या आयुष्यात मात्र तिचे नाव आजही येतेच___वरील तीनही काल्पनिक व्यक्तिरेखांनी संभाजी महाराजांचा जीवनवृक्ष डागाळला गेला. त्यावर आलेल्या मधुर फळांना समाजाने दगडांचा प्रसाद दिला.पण आपल्या अत्युच्च पोषण मूल्यांनी हा वृक्ष आजही आपल्याला माधुर्याचा सुवास देत आहे.संभाजी आणि वरील तीनही स्त्री पात्रे यांच्यावर आजपर्यंत निर्माण केलेल्या काही प्रमुख कलाकृती पुढील प्रमाणे ( आजपर्यंत संभाजी राजांच्या जीवनावर आधारीत किमान पन्नास पेक्षा अधिक कलाकृती निर्माण झाल्या आहेत)

१) छ. संभाजी – आत्माराम मोरेश्वर पाठारे ( १८९१ )

२) राजसन्यास – रा.ग.गडकरी ( १९२२ )

३) राजसंसार – वि.वा.हड़प ( १९२३ )

४)थोरातांची कमळा मा. के. सोनसुखार ( १९५१ )

५) सती गोदावरी – शं. ब. चव्हाण ( १९६७ )

६) थोरातांची कमळा – भालजी पेंढारकर ( १९४१ )

७) थोरातांची कमळा – भालजी पेंढारकर ( १९६३ )

८) रायगडचा राजबंदी – कवी राजा बढे ( १९६५ )

एकूणच वरील सर्व विवेचनावरून छ. संभाजी राजांच्या आयुष्यात आलेली गोदावरी, कमळा , तुळजा यांना कवडीचाही सत्याधार नाही. केवळ पूर्वग्रहदुषित मताने भरलेले मन आणि प्रचंड दुःस्वास यांमुळे या काल्पनिक स्त्रियांचा शंभुराजांच्या आयुष्यात प्रवेश झाला आहे हे स्पष्ट होते.या स्त्रियांव्यतिरिक्त आणखी काही स्त्रीयांची नावे सुद्धा संभाजी राजांच्या नावाबरोबर घेतली जातात. त्यात, मोहित्यांची मंजुळा, औरंगजेब कन्या झिनत उन्नीसा, कवी कलश पत्नी सुरंगा, हिरोजी फर्जंद यांची एक कन्या, तसेच एक त्तन्त्र विद्येत पारंगत असलेली व्रजला नामक स्त्री.मात्र यातील एकाही स्त्री बाबत एकही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे असल्या तद्दन खोट्या दंतकथांना शंभुप्रेमींनी कवडीची ही किंमत देऊ नये.मराठा साम्राज्याच्या एका युवराजाला व तदनंतर एका अभिषिक्त राजाला बदनाम करण्याची एकही संधी इतिहासाने सोडली नाही.पण शेवटी सत्य अधिक काळ लपून राहत नाही हेच खरे. जी व्यक्ति बुधभूषणम् सारखा संस्कृत प्रचुर ग्रंथ लिह शकते, एकाच वेळी पाच पाच पातशाह्यांना धूळ चारते, स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवते त्या व्यक्तीला असे बदफैलीच्या दावणिला बांधने म्हणजे आपल्या जाज्वल्य अन देदीप्यमान इतिहासाला पायदळी तुड़वन्यासारखेच आहे.निदान आतातरी आपण शहाणे होने गरजेचे आहे.

संदर्भ-

१) शिवपुत्र संभाजी – डॉ.कमल गोखले.

२) छ.संभाजी महाराज, स्मारक ग्रंथ- डॉ.जयसिंगराव पवार.

३) छ. संभाजी महाराज – वा.सी. बेंद्रे.

४) संभाजी – विश्वास पाटील.

५) शापित राजहंस – अनंत तिबीले.

#_____________संतोष_काशीद___________
#____________९९२३९७५०५३____________

Please follow and like us:

1 thought on “शंभुराजे आणि गोदावरी, कमळा, तुळजा प्रकरण

  1. खुपच छान मुद्देसुद मांडणी केली आहे.

Leave a Reply