मनाविरुद्ध….

मनाविरुद्ध…

आम्ही लहान असताना घरातील सगळेच आम्हाला एकमेकांवरून चिडवायचे.कारण आमचे नातेच तसे होते.मनीष माझ्या सख्या आत्याचा मुलगा. लहान होतो तेव्हा लग्न म्हणजे काय हेच कळायचे नाही, त्यामुळे आम्ही दोघेही सगळ्यांचे ऐकून एकमेकांना नवरा बायकोच म्हणायचो.

मनीषला जर कोणी विचारले तुझ्या बायकोचे नाव काय तर तो स्वाती असे सांगायचा. तसेच जर मला माझ्या नवऱ्याचे नाव विचारले तर मीही मनीषच सांगायचे. लग्नाचा अर्थ कळत नव्हता तोवर काही वाटायचे नाही. पण, जसे मोठे झालो तसे एकमेकांसोबत बोलताना जरा अवघडून जायचो आम्ही.

माझे मामा म्हणजे मनीषचे बाबा ज्या ठिकाणी नोकरीला होते तिथून त्यांची बदली आमच्या गावापासून फक्त वीस किलोमीटर असलेल्या गावात झाली होती. त्यामुळे आत्याचे येणे जाणे वाढू लागले होते आमच्याकडे. सोबत मनीषही असायचा. लहानपणी मनीष सुट्ट्यांमध्ये आमच्याकडे यायचा तेव्हा आमच्यात फार छान मैत्री होती तो आला कि मला खूप छान वाटायचे.

Loading...

आम्ही खूप खेळायचो एकत्र. पण मोठे झालो तेव्हा सगळे बदलले आणि लाजेने मी मनीष समोर येणे ही टाळू लागले. आणि मग आत्या जेव्हाही यायची तेव्हा मी स्वयंपाक घरातून बाहेरच निघायचेच नाही.

मला शिक्षणाची फार काही आवड नव्हती. लिहिण्या वाचण्या पुरते शिक्षण व्हावे म्हणून आपली दहावी पर्यंत कशी बशी शिकले. आणि दहावी झाल्यावर घर सांभाळू लागले. शिक्षणापेक्षा मला घर संभाळणे, छान छान जेवण बनवणे आणि आलेल्या पाहुण्यांची मनसोक्त उठ बस करणेच जास्त आवडायचे. घरात आणि नातेवाईकांमध्ये सर्वांनाच माझे फार कौतुक वाटायचे.

Loading...

मला जसे कळू लागले तसे मी माझ्या आईला पाण्याचा ग्लास सुद्धा हातात द्यायचे. आईला आराम देताना मला खूप बरे वाटायचे. आम्ही पाच भावंड होतो. माझे आईवडील थोडे जुन्या विचारांचे होते. त्यामुळे मुलाची फार अपेक्षा होती त्यांना. मुलाची वाट पहाता पहाता आम्ही चार बहिणी झालो.

आणि मग सर्वात शेवटी माझा भाऊ झाला. पाच बाळंतपणे झाल्यामुळे आईची तब्बेत सतत बिघडायची. बाळंतपणात काळजी न घेण्यामुळे सतत कंबर दुखी आणि सांधे दुखीचा त्रास व्हायचा तिला. त्यामुळे मी घराकडे लक्ष देऊ लागले. बाबा सैन्यात असल्यामुळे वर्षातून एकदाच त्यांचे येणे व्हायचे. तसे ते फार शिस्तीचे होते. पण, माझ्यावर प्रचंड जीव होता त्यांचा.

त्यांच्या अनुपस्थित मी घर अगदी व्यवस्थीत सांभाळते या गोष्टीचा त्यांना फार अभिमान वाटायचा. बाबांचा माझ्यावर खूप विश्वासही होता. तसा मीही कधी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नव्हता.

सैन्यातील नोकरीमुळे बाबा आमच्या सोबत फार कमी असायचे. पण, आमचं एवढ मोठ कुटुंब होत कि, आम्हाला फार काही वाटायचे नाही. आमच्या घरी बाबांची आई, बाबांचे मोठे भाऊ, आमची आई आणि आम्ही पाच भावंडे असायचो. तसे बाबांना आणखीही भाऊ होते. पण, त्यांच्या नोकरी मुळे ते सर्व त्यांच्या कुटुंबां सोबत शहराकडे जाऊन स्थाईक झाले होते.

फक्त बाबांचे मोठे भाऊ ज्यांना आम्हीही भाऊच बोलायचो ते आमच्या सोबतच रहायचे. भाऊंचे लग्न झाले होते पण, काही दिवसांतच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर भाऊंनी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. बाबा जवळ नव्हते पण, भाऊ असल्यामुळे आम्हाला फार आधार वाटायचा त्यांचा. मी घरातील सर्वात मोठे अपत्य त्यामुळे भाऊही माझा सर्वात जास्त लाड करायचे.

मीही त्यांची फार काळजी घ्यायचे. माझ्या भाऊंना पांढरे शुभ्र कपडे घालायला आवडायचे. मी कधीही त्यांना वेगळ्या रंगाचे कपडे घातलेले पाहिले नव्हते. पांढरे शुभ्र धोतर त्यावर पांढराच शर्ट आणि पांढरी गांधी टोपी मस्त रुबाब होता त्यांचा. आमच्या वर लक्ष देण्या ऐवजी मोकळ्या वेळेत भाऊ गावाच्या पारावर मित्रांसोबत गप्पा मारत बसायचे.

पारावरच्या तांबड्या मातीने कपडे खूप खराब व्हायचे त्यांचे. आई वैतागायची त्यांचे कपडे धुवायला. आणि मग चीड चीड व्हायची तिची. मला भाऊंना कोणी काही बोललेले नाही आवडायचे त्यामुळे त्यांचा कोणाला त्रास होऊ द्यायचे नाही मी. रोज शाळेतून आल्यावर मी स्वतः त्यांचे कपडे धुवून आणायचे. आणि सुकल्या नंतर छान इस्त्रीही करून ठेवायचे. ते तयार होऊन जायचे तेव्हा सगळा गाव त्यांच्याकडे पहायचा. खूप रुबाब होता त्यांचा गावात.

बाकी आजीचेही वय झाले होते, त्यामुळे ती सतत आजारी पडू लागली होती. त्या दरम्यान आजीसाठी आत्याचे येणे जाणे जरा वाढले होते आमच्याकडे. आत्या सोबत मनीषही यायचा. मी सर्वांची खूप छान उठ बस करायचे शिवाय आजीचेही सर्व मीच करायचे. त्यामुळे आत्याला माझे खूप कौतुक वाटायचे. आत्या सतत माझे नाव काढायची.

एक दोन वेळा आत्याच्या तोंडून गेल ही होत माझ्या मन्याला अशीच बायको मिळावी. ते ऐकून कि काय पण, मनीषच्या मनात माझ्या बद्दल प्रेमाच्या भावना जाग्या झाल्या. आणि एकदिवस त्याने मला प्रपोज केले. तसे पाहायला गेले तर लहानपणा पासून सगळे आम्हाला एकमेकांचे नवरा बायको म्हणुन चिडवायचे त्यामुळे, माझ्या मनाची तयारी आधीच झाली होती.

लहान असतानाही आणि मोठी झाले तेव्हाही त्याच्या शिवाय कधीही कोणाचा विचार आला नाही माझ्या मनात. त्याने विचारल्यावर मी या बद्दल माझ्या भाऊं सोबत बोलले. ते ऐकून भाऊ जरा शांतच झाले. त्यांच्या शांततेची मला फार भीती वाटू लागली होती. पण त्यांचा विरोध असता तर मी मनीषचा विचार पूर्णपणे मनातून काढायचे ठरवले होते. काही दिवस गेल्यावर आत्या आणि मनीष पुन्हा आजीला पाहण्यासाठी आले होते. भाऊ आत्याला आमच्या देण्यासाठी शेतातील हरभरा आणायला निघाले होते. अचानक का त्यांच्या मनात आले कोणास ठाऊक ते मला आणि मनीषला म्हणाले चला रे पोरांनो तुम्ही पण.

माझी धाकधूक आणखी वाढू लागली मी जाण्याचे टाळले ही होते पण भाऊंच्या ते लक्षात आले आणि ते आयुष्यात पहिल्यांदा माझ्यावर ओरडले म्हणाले ताई ग चल म्हणतोय ना. तशी मी पटकन उठले आणि त्यांच्या सोबत जायला निघाले. शेतात गेल्यावर भाऊंनी मनीषला विचारले काय रे मन्या मी जे ऐकल ते खर आहे का? मनीषही अवस्था माझ्या पेक्षाजास्त  वेगळी नव्हती भाऊ आमच्या घरात सर्वात मोठे होते त्यामुळे कोणीही त्यांच्या समोर मान वर करून बोलायचे नाही. भाउंनी आम्हाला विचारायला सुरुवात केल्यावर आम्ही दोघेही मान खाली घालून शांत उभे होतो.

आम्हाला तसे पाहून भाऊ जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले, अरे पोरांनो घाबरता काय? मी आहे तुमच्या बरोबर. माझी पोरगी माझ्या बहिणीच्याच घरी जाईल या पेक्षा जास्त आणि काय पाहिजे मला. ते ऐकून मनीष आणि मी खूप खुश झालो आणि आम्ही दोघांनीही भाऊंना मिठी मारली. आम्हाला जवळ घेतल्यावर भाऊंचे डोळे ओलावले आणि ते मनीषकडे पाहून म्हणाले, हे बघ मन्या पोरगी देऊ आम्ही तुला पण पोरीला दर आठवड्याला माहेराला घेऊन यायचं.

ती आहे म्हणून जगतोय बघ मी. त्यावर मनीष म्हणाला हो मामा चालेल ना नाही तर अस करू मीच येतो घर जावई बणून. ते ऐकून भाऊ खूप हसले आणि हसता हसता शांत झाले आणि म्हणाले ताई ग बाकी काही नाही पण तुझ्या बापाच अवघड वाटतंय बघ मला. बाबांचा विषय काढल्यावर मी पुन्हा घाबरले तसे भाऊ मला म्हणाले जाऊदे तो येईल तेव्हा बघू बोलेन मी त्याच्या सोबत.

ते ऐकून मी आणि मनीष मात्र निश्चिंत झालो. भाऊ आमच्या पाठीशी होते त्यामुळे आम्हालाही खात्री झाली होती कि, आता आमच्या लग्नाला कोणीही विरोध करणार नाही. तशी आत्याचीही फार इच्छा होती मला सून करू घ्यायची पण, मनीषला नोकरी नसल्यामुळे तिने माझ्या बाबांशी बोलण्याची हिंमत केली नाही. दरम्यान आजी गेली.

तेव्हा पासून आत्याचे आमच्याकडे येणे-जाणे कमी झाले. पण मनीष माझ्यासाठी अधून मधून यायचा आमच्या घरी. बाबा सुट्टीवर आले होते. मनीषचे सतत आमच्या घरी येणे बाबांच्या लक्षात आले. आणि अचानक त्यांनी माझ्या लग्नासाठी बघा बघी सुरु केली. बाबांचा स्वभाव मला माहित होता त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याची माझी हिंमतच होत नव्हती.

आईशी बोलायचं तर ती बाबांच्या शब्दा बाहेर नव्हती. आमच्या इतकीच तिलाही बाबांची फार भीती वाटायची. मी सतत भाऊंना बाबां सोबत बोलण्याची आठवण करून द्यायचे पण ते बाबां सोबत बोलायला गेले तरी त्यांची हिंमतच व्हायची नाही.

दिवसही भराभर जात होते. बाबांनी मूले पहायला सुरुवात केल्यापासून सतत कोण ना कोण स्थळं घेऊन आमच्या घरी येऊ लागल होत. त्यावेळी मी खूप आतुरतेने वाट पाहत होते मनीष येण्याची. आणि एक दिवस आत्या आणि मनीष घरी आले. बाबा माझे लग्न ठरवत आहेत आणि मला मुले पहायला येतात हे कळाल्यावर मनीष खूप चिडला.

त्याच्या चेहऱ्यावरचा राग मला स्पष्ट जाणवत होता. बाबा आणि घरचे सगळे समोरच होते. त्यामुळे त्याला कसे समजावू मला काहीही कळत नव्हते. त्याला असे वाटत होते जे सर्व चालू होते ते माझ्या मर्जीने चालू होते. त्यामुळे त्याचे माझ्यावर रागावणे सहाजिक होते. त्याला समजवण्यासाठी माझ्या मनाची नुसती घालमेल होत होती.

जर आता बोलले नाही तर पुन्हा कधीही बोलण्याची संधीही मिळणार नाही हे मला चांगलेच कळत होते. त्याला हे सांगणे फार गरजेच होते कि, हे सर्व माझ्या मना विरुद्ध होत आहे. नाही तर तो मी त्याला फसवल या भ्रमात स्वतःच्या बाजूनेही काही प्रयत्न करणार नाही. मला त्याच्या सोबत काहीही करून बोलायचेच होते.

पण खूप प्रयत्न करूनही मला बोलता काही आले नाही. आणि त्याच वेळी नेमके भाऊही नव्हते घरी. काही वेळ गेल्यावर आत्या आणि मनीष त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. माझ्या हातातून वेळ वाळू सारखी निसटत चालली होती. हतबल होऊन मी त्याच्याकडे पहात होते फक्त. आणि तो माझ्याकडे मी त्याला फसवल्याच्या भावनेने पहात ही नव्हता. आत्या आणि तो घराबाहेर पडले आणि मी हताश होऊन ते दिसेनाशे होई पर्यंत त्यांच्याकडे पाहत राहिले.

आई बाबा त्यांना सोडण्यासाठी गेले होते. मला रडू अनावर झाले. घरात कोणी नव्हते मी दरवाजा लाऊन घेतला आणि माझ्या भावनांना मनसोक्त वाट करून दिली कारण त्यावेळी रडण्याशिवाय माझ्या हातात काहीही नव्हते. तितक्यात दरवाजा वाजला मी डोळे पुसून दरवाजा उघडला तर समोर मनीष होता.

त्याने माझ्याकडे पहिले ही नाही आणि म्हणाला, आईचा चष्मा राहिला आहे तो दे. अखेर मला त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मी त्याला सर्व हकीकत सांगितली. मला त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणा सोबतही लग्न करायचे नाही हे सांगितल्यावर त्याच्याही जीवत जीव आला. आणि मग तो मला म्हणाला, काळजी नको करू मी आजच घरात बोलतो आपल्या विषयी. आई बोलेल मग मामा सोबत.

मनीष घरी जाऊन आत्या सोबत बोलला. आत्या आणि मामांची आमच्या लग्नाला काहीही हरकत नव्हती. पण प्रश्न मनीषच्या नोकरीचा होता. शिक्षण भरपूर असूनही त्याच्या नोकरीचे कुठेही काही होत नव्हते. त्याला काम लागे पर्यंत माझ्या बाबांसोबत बोलून काहीही फायदा नव्हता हे त्यांना चांगलेच ठाऊक होते.

आत्या आणि मामांनी मनीषला आधी नोकरी पहायला सांगितले. तशी त्याची आधी पासूनच नोकरीसाठी धडपड सुरु होती. पण नशीब काही साथ देत नव्हत.

वेळ निघून चाललेली आणि शेवटी बाबांच्या पसंतीनेच माझ लग्न ठरलं. माझ्या लग्नाची सर्व बोलणी झाल्यावर बाबांनी आत्याला बोलावून घेतले आणि माझे लग्न ठरल्याचे सांगितले. आत्या मामा दोघेही आले होते. मी आशेने आत्याकडे पाहत होती मला पाहून आत्यानेही धाडस केले आणि ती बाबांना बोलली.

दादा माझी खुप इच्छा आहे स्वातीला माझी सून बनवून घायची लांब कुठे लोकाला देण्यापेक्षा आमच्याच घरात दे ना तिला. मी खूप चांगली संभाळेन तिला. बाबा त्यांच्या स्वभावानुसार आत्यावर चिडले आणि म्हणाले, नाती गोती एका बाजूला कला. प्रश्न माझ्या पोरीच्या आयुष्याचा आहे. मनीषला अजून नोकरी नाही.

त्यावर आत्या म्हणाली, अरे पण बघतोय ना तो नोकरी आज नाहीतर उद्या लागेलच कि? शिवाय तो शिकलेला आहे. बाबा म्हणाले, आज नाही तर उद्या लागेल या आशेवर पोरगी कशी देऊ मी? नाहीच लागल उद्या काम तर काय करणार? आत्या म्हणाली, नोकरी लागल्यावर करू लग्न तो पर्यंत तरी थांब. बाबा म्हणाले, लग्नाला आली आहे पोर माझी.

बाकीच्या पण पोरी लग्नाला आल्या आहेत तीच झाल्या शिवाय बाकीच्यांचं होऊल का? आता आलाय ते स्थळ चांगल आहे एकुलता एक मुलगा, पाटबंधारे खात्यात नोकरीला आहे. शिवाय चाळीस एकर जमीन आहे त्याला. आत्यापुढे काही म्हणणार तितक्यात बाबाच तिला म्हणाले….पाहुनी आली आहेस चहा पाणी घे आणि निघ मला माझी पोरगी नात्यात द्यायचीच नाही. मला रहावले नाही. धाडस करून मी बाबांना पटकन बोलले.

पण, बाबा मला ही मनीष सोबतच लग्न करायचे आहे. बाबा खूप चिडले आणि माझ्यावर धावून आले. म्हणाले, बाप आहे मी तुझा मला केव्हाच कळाल होत तुझी काय नाटक चालू आहेत ती. स्वतःच चांगल वाईट कळण्या इतकी मोठी झाली आहेस का तू? ते ऐकून मी बाबांना म्हणाले, ‘’मग कशाला लग्न करून देता माझ?’’ लहान आहे अजून तर…. त्यावर बाबा म्हणाले, माझ्या समोर तोंड चालवू नको घरात जा. मी घरत गेल्यावर आत्या बराच वेळ बाबांना समजावत होती. पण, बाबांनी आत्याचे काहीही ऐकले नाही. आत्या आणि मामा निघून गेल्यावर बाबांनी मला पाहायला आलेल्या माणसांना फोन केला.

आणि त्यांना लग्नाची तारीख काढण्यासाठी दुसऱ्याच दिवशी बोलवून घेतलं. दुसऱ्याच दिवशी माझी सुपारीही फोडण्यात आली आणि त्याच दिवशी लग्नाची तारीखही काढली. त्याच दिवशी भाऊ आणि बाबांची माझ्यावरून खूप भांडणे झाली. बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. ते भाऊंना म्हणाले माझी पोरगी आहे माझ मी बघून घेईन तुमचा काय संबंध.

त्यानंतर भाऊंनी घरात थांबणेच बंद केले. जास्तीत जास्त वेळ ते पारावर जाऊन बसायचे. माझ्या सोबतही बोलायचे बंद केले होते भाऊंनी. बाबांच्या बोलण्याने त्यांच्या मनावर ज्या जखमा झाल्या होत्या त्या आतल्या आत एकटेच सहन करत राहायचे भाऊ. ते नाही बोलले तरी माझा जीव राहायचा नाही. जेवणाची वेळ झाली कि, मी त्यांना घेऊन यायचे.

जेवून झाले कि भाऊ काहीही न बोलता पुन्हा घरातून निघून जायचे. मी समजून गेले होते आता आपल्या हातात काहीही नाही. त्या दिवशी नंतर मी बाबां सोबत एकही शब्द बोलले नाही. लग्नाच्या आदल्या दिवशी बाबा आले. मी माझ्या खोलीत लग्नानंतर बरोबर घेऊन जायचे सामान भरत होते. माझी रिकामी झालेली खोली पाहून बाबांना रडू कोसळले. बाबा माझ्या समोर येऊन बसले आणि म्हणाले, ताई ग….आई बाप आपल्या लेकरांच कधीही वाईट बघत नाहीत. मी जे करतोय ते तुझ्या भल्या साठीच करतोय.

तू मोठी आहेस तुझ्या भावंडात. तुझ चांगल झाल तर बाकीच्या पोरींच पण चांगल होईल. चांगल्या माणसांशी सोयरिक केली तर पुढे पण चांगलीच स्थळ येतील. मी काहीही न बोलता बाबांच्या समोरून उठून गेले. मी ठरवलं होत आज लग्नानंतर या घरात पुन्हा कधीही यायचं नाही.

लग्नाचा दिवस सकाळी सर्वांची गडबड सुरु होती. बाबा तेव्हाही माझ्या सोबत बोलण्यासाठी आले. मी त्यांच्या सोबत एकदा बोलण्यासाठी ते मला समजावत होते. मी बोलत नाही पाहून ते आईला म्हणाले तिला फक्त एकदा मला बाबा म्हणून हाक मारायला सांग. आई मला काही बोलणार त्या आधी मीच तिला म्हणाले, आजवर शांत बसली आहेस ना? तर आजही शांतच बस. त्यांना जे हव होत ते करत आहे मी आता.

एक मुलगी म्हणून मी माझी सर्व कर्तव्ये पूर्ण करणार. फक्त एक सांग त्यांना आज नंतर त्यांच्या या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही. माझ मन मारून मी हे लग्न करत आहे तर तुम्हीही समजा कि, मी ही मेले माझ्या मनासोबत. आणि त्यानंतर मग मी घरातून बाहेर पडले…..बाबांच्या मर्जीच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी….आत्याच्या घरातून मात्र कोणीही आले नव्हते माझ्या लग्नाला.

या लागणा सोबत बाबांनी खूप काही गमावलं होत. अगदी मलाही. घरातून निघाल्यावर बाहेर पडताना भाऊंना खूप शोधले मी पण, ते कुठेही दिसले नाहीत.

माझ लग्न लागल तरी भाऊ माझ्या समोरही आले नाहीत. लग्न झाल मी सर्वांचा निरोप घेऊन निघाले. सगळे भेटले पण माझे भाऊ कुठेही दिसत नव्हते. काही वेळाने कोणीतरी मला भाऊ कुठे आहेत ते सांगितले. लग्नाच्या मांडवात एका कोपऱ्यात उभे राहून एकटेच आसव गाळत होते ते. मी जाऊन त्यांच्या पाया पडत म्हणाले भाऊ येते मी. स्वतःची काळजी घ्या. खाण्यापिण्या कडे लक्ष द्या.

ते ऐकून भाऊ जोरजोरात रडू लागले आणि म्हणाले ताई ग… मी तुझ्या साठी काहीही करू शकलो नाही. पण, आजवर तू माझ्यासाठी खूप केलेस बघ. तुझ्याशिवाय वाटत नाही माझा आणखी फार दिवस निभाव लागेल. तू चाललीस आता काय मी ही नाही जगायचो फार दिवस…..भाऊ आणि मी एकमेकांच्या गळ्यात पडून खूप वेळ रडत होतो आणि तितक्यात कोणी तरी बोलले चला चला उशीर होतोय. भाऊंनी मला गाडीत बसवले.

आणि त्यांनतर मी दिसेनाशी होई पर्यंत माझ्या गाडीकडे पहात राहिले. आणि मी माझ्या मनाविरुद्ध एका नवीन आयुष्याच्या वाटेला लागले.

माझ्या आयुष्यात जे काही चालले होते ते सर्व माझ्या मनाविरुद्ध चालले होते. तरीही मी सर्व निमुटपणे स्वीकारले होते. लग्न झाल्यानंतर माहेराहून निघाल्यावर नवीन आयुष्याची नव्याने सुरुवात करून पुढे जायचं ठरवलं होत मी. जे झाल ते झाल आता जे होणार आहे ते छान करायचं ठरवलं होत मी.

पण इथेही माझ्या नशिबाने माझा घात केला. आमच्या लग्नाची पूजा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांकडून कोणीतरी मला घेण्यासाठी येणार होते. पूजेच्या संध्याकाळी मी आणि माझा नवरा संजय आम्हा दोघांना एकांत देण्यात आला मनात खूप धाक धुक होती. आता पर्यंत सर्व स्वीकारलं होत मी एका अनोळखी माणसासोबत सात वाचणे घेतली, त्याच नाव माझ्या नावा सोबात जोडून घेतलं.

पण, आता त्याचे होणारे स्पर्श मला सहन होणार आहेत का? या विचाराने पुरती भांबावून गेले होते. मी संजयच्या खोलीत गेले. माझी होणारी तगमग त्याच्या लक्षात आली असावी. त्याने वातावरण ठीक करण्यासाठी आधी माझ्या सोबत बोलणे चालू केले. त्याने त्याच्या बद्दल सर्व काही मला सांगण्यास सुरुवात केली.

त्या संभाषणातून मला हे कळाले कि, त्याचेही एका मुलीवर फार प्रेम होते. ती त्यांच्या घरा जवळच कुठेतरी रहात होती. संजयच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. हे सांगताना संजयच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्याने मला स्पष्ट सांगितले कि, हे लग्न त्याने त्याच्या मनाविरुद्ध केले आहे त्यामुळे तो त्याचे पहिले प्रेम कधीही विसरू शकणार नाही.

त्याचे बोलून झाल्यावर त्याने मलाही माझ्या भूतकाळा बद्दल विचारले. आणि त्यानंतर मी काही बोलण्या आधीच रडू लागले. मनीषचा चेहरा डोळ्यांसमोर येऊ लागला होता. संजयाने मला खूप विचारल्यावर मी त्याला सर्व सांगण्याचा निर्णय घेतला.

खरतर स्वतःच्या प्रेमासाठी त्याच्या डोळ्यांत आलेले पाणी पाहून मला खात्री झाली होती कि, त्याला प्रेम कळते, त्यामुळे तो माझ्याही भावना समजून घेईल. मला वाटले काही का असेना त्याने त्याच्या भूतकाळा बद्दल मला सर्व सांगितले आहे. तर, मलाही त्याच्या पासून काहीही लपवले नाही पाहिजे.

त्यामुळे मीही माझ्या आणि मनीष बद्दल त्याला सर्व सांगितले. त्यांनतर मात्र सर्व बदलून गेले काही वेळा पूर्वी माझ्या मनापर्यंत पोहोचलेला संजय अचानक विचित्र वागू लागला. मी आणि माझ्या घरच्यांनी त्याला फसवले आहे या भावनेतून तो माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहू लागला. माझ्या नवऱ्या सोबतचा पहिला दिवस मी नवऱ्याचा मार खाऊन सुरु केला. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होते पण, तोंडातून आवाज जरी काढला तरी तो आणखी जास्त त्रास देत होता.

हा तमाशा रात्रभर चालूच होता. माझ्यात जेवढी ताकद होती तेवढा विरोध केला मी पण, त्याच्या ताकदी समोर माझे काहीही चालले नाही. दुसरा दिवस उजाडला मला संजयचे तोंडही पाहण्याची इच्छा नव्हती. मी आमच्या खोलीतून बाहेर आले. आणि अंघोळ झाल्यावर देवपूजा करून सासुबाईंना स्वयंपाक घरात मदत करण्यासाठी गेले. तितक्यात संजय उठून बाहेर आला आणि त्याच्या आईला म्हणाला, हिच्या घरून आज कोणीतरी घेण्यासाठी येणार आहे ना? सासूबाई म्हणाल्या, हो तिचे बाबा येणार आहेत.

ते ऐकून संजय म्हणाला , त्यांना म्हणाव येऊ नका. आज पासून हिला हिच्या माहेरी पाठवायचे नाही. सासूबाईंनी कारण विचारल्यावर संजय आणखी चिडला आणि म्हणाला, मी तुमच्या मर्जीने लग्न केले तेव्हा कारण मागितले का तुम्हाला? त्यामुळे तुम्हीही मला कारण विचारायचे नाही. आजपासून मी जे म्हणेन तेच होईल या घरात आणि जर का ही गेली, तर तिच्या बापाला म्हणाव पुन्हा आणायची नाही हिला इकडे त्यांच्याकडेच ठेऊन घ्यायला सांग. त्यावेळी मला स्वतःचाच राग येत होता रागाच्या भरात मी माझ्या बाबांना आणि आईला या मी या घरात कधीही येणार नाही हे बोलल्याचा.

कारण नेमक त्याच वेळी वास्तू देव माझ्यावर मेहेरबान झाला होता. मी असे बोलली आणि तो ही तथास्तु बोलला. त्यावेळी माझ्या हातात माझ्या नशिबाला दोष देण्या व्यतिरिक्त काहीही नव्हते. पण ते ही मी स्वीकारले होते. खरतर आम्ही दोघेही एकाच वाटेवरचा खडतर प्रवास करत होतो. फरक इतकाच होता त्याला दोष देता येत होता मला नाही. तो त्या सगळ्याला त्याची फसवणूक समजत होता आणि मी माझे नशीब. पुढे संजय ने माझ्या माहेरच्यांना ही माझ्या पासून दूरच ठेवलं होत.

माझ्या घरच्यांनी कारण विचारल्यावर त्याने माझ्या आणि मनीषच्या संबंधांबद्दल लपवाल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे कोणीही पुन्हा माझे हाल विचारायला आले नाही. बाबांच्या स्वभावावरून मला खात्री होती या सगळ्यात नक्कीच त्यांना माझा दोष वाटला असणार.

मी मुद्दाम माझ्या आणि मनीषच्या संबंधांबद्दल संजयला सांगितले असणार, ते याच समजुतीत असणार. पुढे पुढे व्यसन न करणारा माझ्या बाबांच्या पसंतीचा हा मुलगा रोज दारू पिऊन येऊ लागला. दारूच्या नशेत तो माझ्या सोबत काय करायचा त्याचे त्यालाच कळायचे नाही. त्या परिस्थितीत विरोध करण्याचा तर प्रश्नच येत नव्हता.

दिवस तीरास्कारात जायचा आणि रात्र जबरदस्तीमध्ये. माझ्या सोबत जे काही चालू होते ते तब्बल दीड बर्षे चालू होते. त्याच्या त्या जनावरा सारख्या वागण्यात तीळ मात्र ही फरक पडला नव्हता. त्यातच मी माझे पाहिले अपत्यही गमावलं. पण संजयला त्याचे काहीही सोयर-सुतक नव्हते. मी गरोदर आहे कळाल्यावर तरी हे सर्व थांबेल असे वाटले होते पण, नाही मी ज्या भ्रमात जगात होते तो भ्रमही त्याने त्याच्या वागण्याने लवकर तोडून टाकला.

माझ्यावरचे शारीरिक अत्याचार तर मी निमुटपणे सहन केलेच पण, मानसिक अत्याचार करण्यातही संजयने काहीही कसर बाकी ठेवली नाही.. संजयचे ज्या मुलीवर प्रेम होते ती आणि संजय माझ्या समोर एकमेकांना भेटायचे. हे सर्व संजय सासूबाई आणि सासरे घरात नसताना करायचा.

आणि मला बजावायचा आई बाबांना काही बोललीस तर तुझ्या बद्दलही सर्व सांगेन त्यांना. खरतर माझा काहीही दोष नव्हता. पण, तरीही खूप भीती वाटायची. जर का त्यांनी ही संजय सारखाच गैरसमज करून घेतला तर जितका मिळतो तितकाही आधार मिळणार नाही मला म्हणून मी त्यांना काहीही बोलायचे नाही.

तसे पहायला गेले तर मलाही फरक पडत नव्हता त्याच्या अश्या वागण्याचा कारण त्याच्या क्रूर वागण्यामुळे तो केव्हाच माझ्या मनातून उतरून गेला होता. मी फक्त माझे दिवस काढत होते. मी केलेल्या प्रेमाची शिक्षा म्हणून.

या सगळ्याला साधारण दीड वर्षे झाली होती आणि एक दिवस अचानक बाबांचा फोन आला. फोन संजयने घेतला होता. फोनवर बोलून झाल्यावर सासूबाईंनी त्यांना विचारले कोणाचा फोन होता? तेव्हा संजय जे बोलला ते ऐकून माझा तोलच गेला संजय म्हणाले, हिच्या बापाचा फोन होता, तिचा चुलता आजारी आहे वाटत. बाप म्हणतोय घेऊन या. माझा तोल जाताना पाहिल्यावर सासूबाईंनी मला खुर्चीवर बसवले आणि पाणी प्यायला दिले, आणि मला धीरही देत होत्या त्या.

कसबस मी स्वतःला सावरल आणि संजयच्या हाता पाया पडू लागले. तुम्ही म्हणाल तसे वागेन मी. पुन्हा कधीही माहेरी जाण्याच नाव देखील घेणार नाही. पण, मला एकदा माझ्या भाऊंना बघायला जाऊ दे. पण, संजय काही ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, लगेच जीव नाही जाणार तुझ्या चुलत्याचा मेलेला कळाल्यावर घेऊन जातो. माझा नाईलाज होता पण, सगळा जीव भाऊंकडे लागला होता.

बाबांचा फोन आल्यापासून मी अन्न-पाणी टाकले. सतत भाऊंचा चेहरा माझ्या समोर येत होता. शेवटी सासूबाईंना माझी दया आली आणि त्या संजयला म्हणाल्या, मारून जाईल ती पोर अश्याने. का म्हणून तिला असा वागवतोय? तुला त्या सटवी सोबत लग्न करायला नाही दिल हा आमचा दोष होता, तिला का म्हणून त्याची शिक्षा देतोय. तुला नाही ना तिला घेऊन जायचं तर मी घेऊन जाते. तेव्हा कुठे संजय मला घेऊन जायला तयार झाले. आम्ही घरातून निघालो तब्बल दीड वर्षांनी मी बाहेरच जग पाहिलं होत.

मोकळ्या हवेत आली होती. पण, तरीही माझ सर्व लक्ष माझ्या भाऊंकडे होत. कधी एकदाचा रस्ता संपेल असे झाले होते. पण का कुणास ठाऊक खूप पाय खेचत होते मागे. चालत होते तरीही रस्ता काही संपत नव्हता. मला वाटले कदाचित खूप दिवसांनी बाहेर पडल्यामुळे असे होत असावे. अखेर आम्ही भाऊ ज्या हॉस्पिटल मध्ये होते तिथे पोहोचलो. पायऱ्या चढताना अचानक मला भाऊंचा ताई गं…असा आवाज आला.

क्षणभर वाटले भाऊंनीच आवाज दिला मला. खूप दिवसांनी भाऊंचा आवाज कानावर पडल्यामुळे मला आणखीनच रडू येऊ लागले होते. पटापट पाय उचलून मी त्यांच्या खोलीकडे धावत गेले आणि माझ्या कानावर घरच्या सर्वांची रडारड येऊ लागली. ते वातावरण पाहून मात्र माझी पुढे जायची हिंमत काही होत नव्हती. मी तिथेच स्तब्ध उभी राहिले. बाबांनी मला पाहिल्या पाहिल्या मला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले.

म्हणाले, ताई गं… खूप उशीर झाला तुला यायला. भाऊ आपल्याला सोडून गेले……. ते ऐकून मात्र मी स्वतःला अडवू शकले नाही इतक्या दिवस मनात साठलेल्या नदीला भाऊंच्या जाण्याने वाट मोकळी झाली खरी पण, भाऊंच्या जाण्याची पोकळी माझ्या अश्रूंनी नक्कीच भरून निघणार नव्हती.

काही वेळाने आत्या माझ्या जवळ आली आणि म्हणाली, स्वाती दोनच मिनिटा आधी जीव गेला भाऊंचा खूप वाट पाहत होते तुझी. मरतानाही तुझच नाव घेतलं. दोन मिनिट आधी आली असतीस तर भेट झाली असती तुमच्या दोघांची.

मला संजयचा खूप राग आला होता. त्यावेळी मी भानावर नव्हते, सरळ उठले आणि त्याची कॉलर पकडून म्हणाले, बघा म्हणाला होतात ना? मेल्यावर जाऊ. खरच गेले माझे भाऊ, बरोबर मेल्यावरच घेऊन आलात तुम्ही मला इथे. इथेही तुमच्याच मर्जी प्रमाणे झालं. चला घेऊन आता मला.

काय उरल आहे इथे आता माझ? माझ्या भाऊंची मला शेवटच पहाण्याची इच्छाही माझ्याकडून पूर्ण नाही झाली. आता इथे थांबण्यात काय अर्थ? पण, कसे कोण जाणे त्यावेळी संजयने मला तिथे थांबू दिले आणि स्वतःही थांबले. भाऊंना अग्नी देऊन आल्यावर मात्र त्यांनी माझ्यापाठी निघण्याची घाई लावली. तेव्हा मात्र घरातील सर्व नातेवाईक त्यांच्यावर ओरडू लागले. भाऊंचा तिच्यावर फार जीव होता निदान कार्य होई पर्यंत तरी राहू दे तिला.

इतक्या सगळ्या लोकांमध्ये संजलयचे काहीही चालले नाही त्यामुळे नाईलाजाने त्याने मला तिथे राहू दिले. त्याच्या अचानक अश्या वागण्यामुळे मी बिथरून गेले होते. वाटले कदाचित भाऊंच्या जाण्याचा त्यांच्यावर परिणाम झाला असेल. भाऊंची आणि माझी शेवटची भेट त्यांच्यामुळे होऊ शकली नाही याचा पश्चाताप झाला असेल त्यांना म्हणून हा बदल झाला असावा.

कार्यापर्यंत मला तिथे थांबण्याची परवानगी मिळाल्यामुळे मी थांबले होते. पण, जाऊन बाबांशी बोलण्याची इच्छा मात्र झाली नाही. घरात आलेली पाहुणे मंडळी कमी झाल्यावर बाबा माझ्याकडे आले आणि मला जवळ घेऊन रडू लागले. मी ही माझा राग सोडून बाबांच्या मिठीत मनसोक्त मन हलक करून घेतल.

या नंतर कधी पुन्हा मला माझ्या माहेरी येता येईल कि, नाही मलाही माहित नव्हते. त्यावेळी मला बाबांना माझ्या सोबत जे काही घडत आहे ते सांगावे वाटत होते. पण, माझी हिंमत झाली नाही. कारण तेव्हाही बाबा मला समजून घेणार नाहीत याची खात्री होती मला. आणि घरात इतके पाहुणे होते कि मला काही बोलताही येत नव्हते.

भाऊंचे सर्व अंत्यविधी माझ्या हातून पार पडल्यावर जरा मनाला शांती मिळाली. आता पुन्हा त्या नरकात जाण्यासाठी मी माझ्या मनाची तयारीही केली होती. माहेरी गेल्यापासून अनेक वेळा मनीष आणि मी समोरासमोर आलो कित्येकदा तर तो सर्वांची नजर चुकवून पहायचा मला. पण, त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखे वाटत होते.

त्याला पाहावे असे मला ही वाटत होते पण, तेव्हा तो अधिकार आता मला नाही हे मला कळून चुकले होते. जाऊ दे जे माझ्या नशिबातच नव्हत त्याबद्दल विचार करून त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे असे मीच मला समजावत होते. आई बाबांच्या चेहऱ्यावर तसे खुप प्रश्न दिसत होते मला.

कि, सुखात दिसत नाहीस तू, जाच होतो का तुला तिकडे? पण विचारण्याची हिंमत काही केली नाही दोघांनीही. कारण विचारलं तर उपाय काढावा लागला असता आणि तो उपाय म्हणजे मी कायमची माझ्या माहेरी आले असते. नवऱ्याने टाकलेली सांभाळत बसण्यापेक्षा बिन लग्नाची सांभाळली असती तर बर झाल असत अस वाटत असेल तेव्हाही त्यांना. कारण माझ्या मागच्या बहिणींची लग्ने बाकी होतीत.
कार्य झाल्यावर संजय मला घ्यायला आले.

मी सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाले आता पुन्हा या सर्वांची भेट होईल कि नाही माहित नव्हते. त्यामुळे सर्वांना मनसोक्त बघून घेतले आणि निघाले. काही दिवस बरे गेले पण, संजय पुन्हा तसेच वागु लागला. मला होणारी मारहाण सासू-सासऱ्यांना पहावत नव्हती. अनेकदा त्यांनी मला वाचवण्याचाही प्रयत्न केला. पण, त्यानेही काही फरक पडला नाही. संजय त्यांच्या सोबतही भांडणे करायचा. शेवटी थकून सासू-सासरे आमच्या शेतातील घरी जाऊन राहू लागले.

ते गेल्यानंतर तर माझे आणखीनच हाल होऊ लागले. कामाला जाताना संजय मला घरात कोंडून जायचा. एका रात्री असेच पुन्हा त्याने दारू पिऊन मागच्या सर्व विषयांवरून मला मारहाण केली. ती मारहाण इतकी भयानक होती कि, त्यांनतर मी बराच वेळ शुद्धीत नव्हते. हाताला येईल त्या वस्तूने संजय मला मारत होता. दुसरा दिवस उजाडलेला ही मला माहित नव्हते. बराच वेळ आमच्या स्वयंपाक घराच्या खिडकीतून कोणीतरी मला आवाज देत होत.

कशी बशी मी उठून तिथ पर्यंत गेले. तिथे आमच्या आजूबाजूला रहाणाऱ्या काही स्त्रिया आल्या होत्या. त्यांनी माझी विचारपूस केली. रात्री संजयने मला जी मारहाण केली होती ते सर्व ऐकले होते त्यांनी. त्या मला धीर देत होत्या. त्यावेळी माझीही सहनशक्ती संपून गेली होती. मला त्या नरकातून बाहेर निघायचं होत पण, कशी निघणार आणि जाणार कुठे? मला काहीही काळात नव्हत. त्या स्त्रियांनी मला आणखी धीर दिला म्हणाल्या, तुला जाण्यासाठी ठिकाण नसल तरी निघ तू इथून. तू जोवर इथून जाणार नाहीस तोवर तो तुला अशीच मारहाण करत राहील. तू जावीस म्हणून तर तो असा वागत आहे.

मलाही त्याचं म्हणन पटत होत. मी त्यांच्याकडे मला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी विनवणी करू लागले. त्यानंतर त्या स्त्रियांनी आणखी काही लोक त्यांच्या मदतीला घेऊन आमच्या घराचा टाळा तोडला आणि मला त्या घरातून बाहेर काढले.

मला फार भीती वाटत होती होत्या कपड्यांवर मी तिथून निघाले. कारण मला फक्त तिथून पळायचे होते त्यावेळी संजयच्या हाताला लागण म्हणजे मृत्यू हे मला चांगलेच ठाऊक होते. घर सोडले तर खरे पण, जवळ एकाही पैसा नव्हता. भर दुपारची वेळ रात्रीच्या माराणे शरीरात चालण्याचेही त्राण नव्हते. पण, मी जीव मुठीत घेऊन मी पळण्याचा प्रयत्न करत होते. उन्हाने शरीरावरच्या जखमांची आग होत होती. तहानेने जीव व्याकूळ झाला होता.

आनवाणी घर सोडले होते त्यामुळे तापलेली जमीन माझ्या पायांना पोळवत होती. पण, माझ्या सुटके पुढे मला त्यावेळी कशाचेही काहीही वाटत नव्हते. खूप भीती वाटत होती. कोणाची तरी मदत घेण्याशिवाय माझ्याकडे ही पर्याय नव्हता. त्यावेळी अक्षरशः माझ्यावर भिक मागण्याची वेळ आली होती. मग माझ्या लक्षात आले कि माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. रस्त्यात भेटलेल्या एका इसमाला मी मदत मागितली.

मदत घेण्यासाठी नाईलाजाने मला त्याला माझी सर्व हकीकत सांगावी लागली. माझ्या गावाला जाण्या पुरते मला शंभर रुपये देण्यासाठी मी त्याच्या विनवण्या करू लागले. त्याच्या बदल्यात मी त्याला माझे मंगळसूत्र काढून दिले. पण, त्या माणसाने ते घेतले. म्हणाला ताई तुमच्या जागी माझी बहिण असती तर मी तिच्याकडून घेतले असते का पैसे? खरच त्या माणसाचा उदार पणा पाहिल्यावर पटले कि, या जगात चांगली माणसेही आहेत अजून. मला पैसे तर दिलेच शिवाय मी घाबरली आहे ते पाहून त्याने मला गाडीतही बसवून दिले आणि माझी गाडी चालू झाल्यावर तो तिथून गेला.

माझ गाव सोडल्यावर मी बाबांच्या घरी आले माझी अवस्था पाहून घरातील सगळेच रडू लागले. झाल्या प्रकार बद्दल सर्वांनी माझी विचारपूसही केली. मी आई-बाबांना माझ्या सोबत जे जे घडत होते ते सर्व सांगितले. आई बाबांना म्हणाली, आता नाही माझी पोर मी त्या घरी पाठवणार. बाबा शांत झाले आणि तितक्यात त्यांना संजयचा फोन आला.

तो बाबांना काय बोलला माहित नाही. पण, फोन ठेवल्यावर बाबा मला म्हणाले, ताई गं… …पोरीच खर घर म्हणजे तीच सासर. भांडण कोणाच्यात होत नाहीत? आमची पण व्हायची म्हणून काय तुझी आई मला सोडून गेली का? एखाद पोर बाळ झाल म्हणजे होईल सर्व ठीक. आता आलीच आहेस तर काही दिवस रहा. तुझा राग शांत झाला कि, मग मी संजयला बोलावून घेतो आणि समजावतो त्याला.

मग नाही तो तुला त्रास देणार. ते ऐकून मला बाबांना काय बोलावे तेच कळत नव्हते. माझ्या शरीरावरच्या जखमा बाबांना का दिसत नाहीत याचे मला फार वाईट वाटत होते. मी समजून गेले आता माझी ह्या सगळ्यातून मेल्याशिवाय तरी सुटका होणार नाही. मी बाबांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नेहमी प्रमाणे मला नाहीच समजून घेतले. या घरात मला थारा नाही हे मी समजून गेले होते.

मी उठले आणि बाबांना म्हणाले, काही दिवस तरी कशाला ठेऊन घेता बाबा मला? इथून पुढे नाही पुन्हा कधी तुम्हाला त्रास होणार माझा. या सगळ्यात जर का माझ काही बर वाईट झाल, तर मात्र बाप म्हणून रडत या माझ्यासाठी असे म्हणून मी, बाबांचे घर सोडले आणि निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला……

खूप आशेने बाबांच्या घरी गेले होते मी. पण, तिथेही निराशाच पदरी पडली. काहीही झाल तरी बाबा मला पुन्हा संजयकडे पाठवणार हे मला कळून चुकले होते. पण, माझ्यात पुन्हा मात्र संजयकडे जाण्याची हिंमत नव्हती. बाबांच घर सोडल्यावर मात्र मला कुठे जाऊ काहीही कळत नव्हते. खरतर मला कोणावर ओझे ही व्हायचे नव्हते.

जिथे माझे जन्मदाते माझे नाही झाले, तिथे दुसरे कोणी काय माझी मदत करणार? शेवटी खूप विचार करून मी देहांताच्या निर्णया पर्यंत पोहोचले. होय मी स्वतःला संपवून या जगाचा कायमचा निरोप घ्यायचे ठरवले होते. म्हणजे कोणालाच पुन्हा माझ्यामुळे काही त्रास नको. मनाशी पक्का विचार केला आणि माझे पाय नदीच्या दिशेला वळवले.

काही अंतर गेल्यावर मी माझे भाऊ ज्या पारावर मित्रांसोबत बसायचे तिथ पर्यंत पोहोचले. थोडी थांबले तिथे आणि भाऊंना आठवून मनसोक्त रडून घेतल. मन हलक झाल्यावर मी पुन्हा नदीकडे जायला निघाले. तितक्यात कोणीतरी मला आवाज दिला. मी मागे वळून पाहिले तर, माझ्या भाऊंचे खूप जवळचे मित्र अण्णा मला आवाज देत होते.

म्हणाले स्वाती ना तू भाऊंची पुतणी, तू आणि इथे? काही तरी उत्तर द्यावे लागणार म्हणून मी म्हणाले, काही नाही भाऊंची आठवण आली होती म्हणून आले. त्यानंतर बराच वेळ ते भाऊं बद्दल बोलत होते. बोलता बोलता अण्णांची नजर माझ्या चेहरा आणि हाताच्या जखमांवर गेली. रडून रडून डोळ्यांवर आलेली सूजही अण्णांपासून लपली नाही. अण्णांनी खूप विचारले पण मी त्यांना काहीही सांगत नव्हते. अखेर अण्णा म्हणाले, माझ्या जागी भाऊ असता तर नसती बोललीस का तू त्याला? अस समाज मी भाऊच आहे.

तेव्हा मात्र मी अण्णांना माझी सर्व हकीकत सांगितली. अण्णांनी मला खूप धीर दिला. बरीच रात्र झाली होती माझी मानसिक अवस्था पाहता अण्णांनी मला खूप आग्रहाने त्यांच्या घरी न्हेले. तिथे गेल्यावर अण्णांनी त्यांच्या पत्नीलाही सर्व हकीकत सांगितली. माझ्यात आता जगण्याची इच्छाच उरली नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते दोघेही घाबरले.

बराच वेळ ते दोघेही मला समजावत होते. काही वेळाने अण्णांच्या लक्षात आले माझ्या बाबांचे लहान भाऊ मुंबईला असायचे. बाबा आणि काकांच्यात भांडणे झाली होती अनेक वर्षे गेली तरी काका काय पुन्हा गावी आले नव्हते. अण्णांनी गावात कोणाकडे तरी जाऊन काकांचा फोन नंबर आणला. आणि फोन करून घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. काका समाजाच्या अगदी विरोधात वागायचे त्यांनी कधीही समाजाचा विचार केला नाही.

काही वर्षां पूर्वी काकांनी समाजाच्या आणि घरच्या सर्वांच्या विरोधात जाऊन अंतरजातीय विवाह केला होता. तेव्हा पासून बाबा त्यांच्या सोबत बोलत नव्हते. माझ्या बद्दल कळल्या बरोबर दुसऱ्या दिवशी काका आणि काकी मला घ्यायला आले. आणि मला त्यांच्या घरी मुंबईला घेऊन गेले. काही दिवस गेल्यावर काकांनी संजयला घटस्पोटाची नोटीस पाठवली. नोटीस पाहिल्या पाहिल्या संजयने बाबांना फोन केला असावा. मी काकांकडे असल्याचे बाबांना कसे कळले माझीत नाही.

पण, नोटीस पाठवल्याच्या एक दोन दिवसांतच बाबांचा काकांच्या घरच्या फोनवर मला फोन आला. त्या दिवशी बाबा माझ्या सोबत फार प्रेमाने बोलले, ते मला घरीही बोलवत होते. बाबांसोबत बोलून झाल्यावर मला खूप बरे वाटले पण, का कुणास ठाऊक मला त्यावेळी बाबांवरही विश्वास बसत नव्हता. मनात नको नको त्या शंका येत होत्या. मला बाबांना काय बोलावे हेच कळत नव्हते. संध्याकाळी काका कामावरून घरी आल्यावर मी त्यांना बाबांच्या फोन बद्दल सांगितले.

तेव्हा काका हसले….. आणि मला म्हणाले, दादाला म्हणाव ठीक आहे येते मी, पण माझ्या घटस्पोटाचा निकाल लागल्यावर. काकांनी मला सांगितल्या प्रमाणे मी दुसऱ्याच दिवशी बाबांचा फोन आल्यावर त्यांना म्हणाले, बाबा मी येईन घरी पण माझ्या घटस्पोटाचा निकाल लागल्या वर. ते ऐकून बाबा भडकले आणि त्यांनी माझ्या सोबत त्यांचे सर्व संबंध तोडले. तेव्हा मात्र माझ्या लक्षात आले कि माझ्याशी गोड बोलणे आणि मला पुन्हा बोलावून घेणे यात बाबांचा नक्कीच काहीतरी कटच होता.

तसे बाबा चुकीचे होते असे नाही पण ते समाजाचा आणि स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेचा फार विचार करायचे. त्या दिवशी नंतर मात्र मीही बाबांचा विचार करणे सोडून दिले. काका-काकी मला फार छान सांभाळायचे. त्यांनाही दोन मुली होत्या ओवी आणि दुर्वा. त्यांच्या सोबत वेळ कसा जायचा कळायचेच नाही.

कोर्टाच्या तारखे शिवाय मी माझ्या भूतकाळा सोबत जराही जोडलेली नव्हती. काही दिवस गेल्यावर माझा घटस्पोटही झाला. खूप मोठ्या संकटातून बाहेर पडल्या सारखे वाटले मला त्या दिवशी. इतक्या दिवसानंतर सुटकेचा श्वास घेतला होता मी.काका- काकी मुळे मी माझ्या भूतकाळातून आणि त्या भयंकर माणसाच्या तावडीतून सुटले खरी पण, मला त्यांच्यावर असे ओझे बणून रहाणे आवडत नव्हते. मी माझी घाल मेल काकांना बोलून दाखवल्यावर काकांनाही माझे म्हणणे पटले. त्यावेळी काकाही मला स्वावलंबी बनवण्याच्याच विचारात होते. तसेही काका- काकी दोघेही नोकरी करायचे आणि त्यांची मोठी मुलगी ओवी कोलेजच्या दुसऱ्या वर्षाला आणि धाकटी दुर्वा नववीत शिकत होती. त्यामुळे घरीही कोणीच नसायचे.

मीही घरात एकटी राहून राहून कंटाळू लागले होते. मग काकांनी मला मशीन क्लास आणि पार्लरचाही कोर्स लावला. दिवस अगदी छान चालू होते. मीही व्यस्थ राहू लागले होते. एके दिवशी काकांच्या मुली बराच वेळ कोणासोबत तरी फोनवर बोलत होत्या. त्यावेळी मी मशीनवर माझे काम करत होते. बोलता बोलता काकांची ओवी समोरच्या व्यक्तीला म्हणाली, आई-बाबा नाही आहेत. घरात आता आम्ही दोघी आणि आमच्याकडे आमची ताई आली आहे ना ती ही आहे. बोलणार का तू तिच्या सोबत? खूप छान आहे ती. थांब हं…….बोल तिच्या सोबत. मला काहीच कळेना कोणाचा फोन आहे आणि मी काय बोलणार ते.

मग ओवी माझ्या हातात फोन देत म्हणाली, हे घे बोल ताई …. आमचा दादा आहे आज त्याचा वाढदिवस  आहे. त्याला शुभेच्छा दे. मुलींच्या आग्रहा खातर मी फोन घेतला. आणि समोरून जसा आवाज आला हेलो…… …..तशी मी स्तब्ध आणि निशब्दही झाले. आणि माझ्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले. मला रडताना पाहून काकांच्या मुलीही घाबरून गेल्या.

काय झाले हे त्यांना काहीच कळत नव्हते. मला विचारत-विचारतच  ओवीने माझ्या हातून फोन घेतला आणि समोरच्या त्या व्यक्तीला विचारू लागली काय बोललास दादा तू आमच्या ताईला, रडतीये का ती? तिच्या त्या दादालाही माझ्या रडण्याचे कारण कळाले नाही. त्याला शंका आल्यावर त्याने तिला माझे नाव विचारले आणि तिनेही पटकन त्याला सांगितले.

म्हणाली, अरे स्वाती ताई….माहित आहे का तुला? गावाचे काका आहेत ना? त्यांची मुलगी. त्यांनतर तिचा भाऊ तिला माझ्याकडे फोन देण्यासाठी विनवण्या करू लागला. पण, माझी पुन्हा फोन घेण्याची हिंमत काही झाली नाही. कारण तिच्याशी बोलणारा तिचा तो दादा दुसरा तिसरा कोणी नसून मनीषच होता….. खरतर त्यावेळी माझ्याकडे मनीष सोबत बोलण्यासारखे काहीही नव्हते.

त्यानंतर मात्र तो पूर्ण दिवस मी अस्वस्थच होते. खाण्या-पिण्याकडेही माझे लक्ष नव्हते. रात्रीही जेवणाची इच्छा नव्हती. काका-काकीने ही खुप आग्रह केला. पण, तरीही मी जेवत नाही आणि माझा चेहरही उतरलेला पाहून काकांनी मुलींना माझ्या अश्या वागण्याचे कारण विचारले. काका मुलींना म्हणाले, ताईला त्रास दिलात का तुम्ही आज? तेव्हा मुलींनी काकांना सकाळी फोनवर झालेला सर्व प्रकार सांगितला. मग मात्र काका-काकी मला मनीषचा फोन आल्यावर रडण्याचे आणि माझ्या अस्वस्थ होण्याचे कारण विचारू लागले. पण, मला नाहीच सांगता आले.

मग काकांनी मनीषलाच फोन केला आणि विचारले तेव्हा मनीषने आमच्या बाबतीत जे घडले ते सर्व काकांना सांगितले. काका मनीषला ओरडू लागले म्हणाले, गधड्या स्वातीच्या लग्ना आधी तुला हे सर्व मला सांगायला काय झाले होते? खरतर आधीच बाबांचा आमच्या लग्नाला विरोध होता आणि त्यात पुन्हा काकांना मध्ये घेतले असते तर बाबा आणखी चिडले असते असे मनीषला वाटले असावे. त्यामुळे तो काकांना आमच्या विषयी काही बोलला नसावा.

आत्याही काकांचे लग्न झाल्यापासून बाबांच्या भीतीने काकांसोबत फार बोलायची नाही. बराच वेळ या विषयावर काका आणि मनीषचे बोलणे चालू होते. आणि अखेर काका त्यांच्या स्वभावानुसार मनीषला म्हणाले, अजूनही वेळ गेली नाही. ती तुझ्यावर आताही किती प्रेम करते हे, मी पाहू शकतो तिच्या डोळ्यांतून न थांबणारे अश्रू मला सर्व सांगत आहेत. वेळे नुसार तुझ प्रेम बदलल नसेल तर, पोरीचा बाप म्हणून आता मी, तुला विचारतो करतोस का माझ्या पोरी सोबत लग्न ? मी काकांकडे आश्चर्याने पाहू लागले आणि काकीला म्हणाले, अगं ….हे काय बोलत आहेत थांबव त्यांना, आता हे शक्य नाही……ते ऐकून काकीने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, आता आम्ही तुझे आई-बाबा आहोत. आम्ही जे काही तुझ्यासाठी करू ते योग्यच करू. आमच्यावर विश्वास आहे ना ?…..त्यानंतर मात्र मी काकीला घट्ट मिठी मारली आणि इतक्या दिवसांत आईच्या मायेच्या ज्या उबेसाठी मी तहानलेले होते, त्या उबेमध्ये स्वतःला झोकून देऊन मनसोक्त जगून घेतला तो क्षण. काकांचे फोनवर बोलून झाले आणि काका माझ्या जवळ येऊन म्हणाले, मग ताई गं…..लग्नाच्या तयारीला लागायचं ना ? काकांच्या तोंडून ताई गं ….ऐकल्यावर मला माझ्या भाऊंची आठवण आली आणि आणखी हुंदका दाटून आला….ते पाहून काका म्हणाले, बाळा तुझ्या नशिबात जितके रडायचे लिहिले होते. ते रडून झाले आहे.

आता बिलकूल रडायचं नाही. अगं… वेडा बाई आता तर आनंदाचे दिवस आले आहेत…..    सर्व अगदी स्वप्नात घडावे तसे घडत होते. पण त्यातच मला बाबा आठवले मी काकांना म्हणाले, पण बाबा नाही ऐकणार….तेव्हा काका म्हणाले, नको ऐकू दे. आता आहे का तो तुझ्या बरोबर? जे कि, तुझ्या लग्नाचे कळल्यावर तुझ्या सोबत बोलणार नाही. आताही नाही बोलत आहे तसेच पुढेही समजत रहा.

कि  नाही बोलत आहे. आणि मी चांगला ओळखतो माझ्या दादाला अगदी नारळा सारखा आहे त्याचा स्वभाव वरून जितका कठीण तितकाच आतून गोड. ‘’समाज हा एक किडा त्याच्या डोक्यातून निघाला ना तर त्याच्या सारखा माणूस नाही जगात दुसरा कोणी’’. एक ना एक दिवस नक्की त्याला त्याची चूक कळेल…… काही दिवसांतच माझ्या आणि मनीषच्या लग्नाची तयारी सुरु झाली. काकांनी आणि आत्याने बाबांना लग्नाचे आमंत्रण दिले होते पण, ते नाहीच आले.

माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आणि माझ्या सोबत माझे आई बाबा नव्हते. सर्व काही मनासारखे घडत होते, तरीही मला आई बाबांची कमी प्रकर्षाने जाणवत होती. मग काय त्यांच्या अनुपस्थितीतच काका-काकीने माझे कन्यादानही केले. आणि मी आणि मनीष आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत बांधले गेलो. लग्न छान पार पडले. सर्व छान सुरु होते आत्या, मामा, मी आणि मनीष छोटसं होत आमचं कुटुंब पण, खूप छान रहायचो आम्ही. अधून-मधून काका काकी यायचे आमच्याकडे आम्हीही त्यांच्याकडे जायचो वरचेवर. आई बाबंची मात्र सतत आठवण यायची. वाटायचे एकदा का त्यांनी मला माफ केले म्हणजे, मी मोकळे पणाने जगायला मोकळी. पण. ते या जन्मी तरी अशक्यच वाटत होते.

काही दिवस गेल्यावर माझ्या पाठच्या बहिणीचे लग्न ठरले. तिने मला फोन केला आणि ती, मी तिच्या लग्नाला जाण्यासाठी माझ्याकडे हट्ट करु लागली. मी तिला खूप समजावले बाबांना नाही आवडणार हे. पण, तिने माझे काहीही ऐकून घेतले नाही. तिच्या हळदी दिवशी पुन्हा तिने फोन केला आणि मी जाण्यासाठी पुन्हा हट्ट करू लागली. मी काकांना फोन केला काकांनीही मला जाण्याचा सल्ला दिला. मग मात्र घाबरतच मी बाबांच्या घरी गेले. आत्या आणि मनीषही आले होते माझ्या सोबत. मला पाहिल्या बरोबर माझी सर्व भावंड माझ्या जवळ आली आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली. बाबा घरात नव्हते मी घरात गेले आईची आवरा- आवर चालू होती. मला पाहिल्या बरोबर आईनेही मला घट्ट मिठी मारली. खूप बर वाटल तिच्या मिठीत जाऊन मनावरच अर्ध ओझ तरी उतरून गेल्या सारख वाटल.

त्यांनतर आम्ही हळदीची तयारी करून घेतली. हळद सुरु करणार तितक्यात बाबा आले. त्यांनी मला पाहिल्या बरोबर ते रागाने घरात निघून गेले. आणि हळद लावायला ही बाहेर आले नाहीत. मी समजून गेले मी तिथे असे पर्यंत तरी बाबा बाहेर येणारच नाहीत. त्यांनतर मग, मी आत्या सोबत बोलून आम्ही तिथून निघून आलो. हळदीच्या रात्री पुन्हा बहिणीचा फोन आला आणि म्हणाली, ताई लग्नाला ये तेव्हाही मी तिला खूप समजावलं पण तिने तेव्हाही माझे ऐकले नाही.

तिच्या हट्टा खातर अक्षता टाकून येण्याचे ठरवले मी आणि गेले लग्नालाही. त्यावेळी मात्र आत्या आली नाही. मनीषही नव्हता येत पण, आत्याने मनीषला जबरदस्तीने माझ्या सोबत पाठवले. आम्ही दोघे लग्न लागण्याच्या काही वेळ आधीच तिथे पोहोचलो. बाबा कुठेही दिसले नाहीत. लग्न लागल्यावर मी लगेचच बहिणीला विचारून जाऊ लागले.

पण, तिने मला थांबवून ठेवले. लग्न झाल्यावर तिला गाडीत बसवे पर्यंत तिने मला सोडलेच नाही. तिची गाडी गेल्यावर मग आम्हीही निघालो. तितक्यात पाठीमागून बाबांचा आवाज आला. म्हणाले ताई गं….कुठे चालली? चला घरी दोघेही. खूप पाहुणे आले आहेत घरी सगळे विचारतात तुला. तुझ्या सारखी पाहुण्यांची उठबस करणं नाही जमत तुझ्या आईला. ……..काही वेळ तर मला जे घडत होते त्यावर विश्वासच बसत नव्हता. मी बिथरल्या सारखी सर्वांच्या तोंडाकडे पहात होते.

आणि बाबा पुन्हा त्यांच्या कणखर आवाजात म्हणाले, ताई गं…. येतेस ना? मी काठोकाठ भरलेल्या डोळ्यांनी बाबांकडे पाहिलं आणि मन इतके भरून आले होते कि, तोंडातून श्बद्च फुटत नव्हते मी मान हलवूनच हो म्हणाले, मग बाबांनीही मायेने मला मिठीत घेतले आणि लेकींशिवाय घराला घरपण नाही असे म्हणून आयुष्यात पहिल्यांदा ते माझ्या जवळ ढसा ढसा रडले…..

त्यानंतर मात्र त्यांच्या त्या डोळ्यांच्या दर्यांमधून वाहणाऱ्या त्या नदीने आमच्या मधले सर्व बांध तोडले. आणि मला माझे हरवलेले बाबा आणि त्यांना मी पुन्हा एकदा नव्याने गवसलो……

………..समाप्त

 

 

Please follow and like us:

Leave a Reply