कन्यादान….!

मी आसावरी चाळीतील सर्वांची चिऊ.माझे बाबा सरकारी नोकरी करत असल्याने माझे संपूर्ण बालपण सरकारी घरांमधेच गेले.आमचे घर एका चाळीमधे होते चाळीमधे वरती खाली मिळूण एकून चोवीस खोल्या होत्या.साधीशीच पण फार जिवंतपणा होता त्या चाळीमधे.तिथे कधीही कोणी फक्त स्वतःपूरते जगले नाही.जी काही सुखः दुःख असायची ती सर्वांची असायची.

फार छान दिवस होते ते.माझे तर फार लाड झाले तिथे.पण चाळीच्या अती लाडाचा माझ्यावर एक दुष्परीणाम ही झाला.मला एकही दिवस उपाशी रहाता येत नाही.अहो लहाण पणी कधी रुसून जेवायचे नाही ठरवले की,या सगळया माझ्या चाळीतील काक्या,माम्या आणि आत्या मला त्यांच्या घरी नेऊन जबरदस्ती खाऊ घालायच्या.

आजही ते सोनेरी दिवस आठवले की,पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते.खुप एकाजीवाने रहायचो आम्ही सगळे.चाळीमधे कधी कोणत्या मुलीला पाहूणे बघायला येणार असतील तर सगळयांची धांदल उडायची.कोणी म्हणायचे मागच्याच आठवड्यात मी नवीन कपबश्या घेतल्या आहेत त्या घेऊन जा पाहूण्यांसाठी.

Loading...

तर कोणी नवीन आणलेली साडी नेऊण देई,कोणी म्हणायचे माझा नेकलेस घाल तर कोणी कानातले आणून देई.त्यावेळी माणसांच्या भावने पुढे कपड्या दागीण्यांना काडीचेही मोल नव्हते.अजूनही आठवते मला आम्ही सगळे एकत्र मिळूण रात्रीचे एक दिड वाजे पर्यंत गप्पा मारत बसायचो.

थंडीच्या दिवसांमधे तर दिवसभर काट्या कुट्या जमा करून रात्रीची शेकोटी करून शेकत बसायचे सगळे.गम्मंत म्हणून आजूबाजूच्या चाळीतल्यांचे तारेवर सुकणारे कपडे ही चोरून आणायचो शेकोटी साठी.आजकाल आपल्या शेजारचे कोणी आजारी पडले की आपण फक्त एक आैपचारीकता म्हणून फळे फुले घेऊण भेटायला जातो.

Loading...

पण आमच्या चाळीमधे कोणी आजारी पडले की चाळीतील प्रत्येक जण आळी पाळी ने दवाखाण्यात थांबत असे.जेवाणाचे डबे ही पोहोचवत असे.उन्हाळ कामे दिवाळीचे फराळ ही सगळे एकत्र मिळूण करायचे.

त्यासाठी दिवसही वाटून घ्यायचे.आज हिचे करू उद्या तिचे परवा माझे.माझ्या चाळीमधे कधीच कोणी कोणासोबत तुलना केली नाही.कोणाचे वाईट झाले की,सर्वांना दुःख व्हायचे तसेच कोणाचे चांगले झाले की,सगळे मिळून आनंद साजरा करायचे.

माझा तर जन्मच या चाळीमधला लहानपण ते लग्नापर्यंतच्या प्रवासातील एक एक आठवण अजूनही तितकीच ताजी आहे.माझ्या घरामधे माझे आई बाबा मी आणि माझ्या तीन बहीणी.असे आम्ही सहा जण होतो.फक्त मुली असल्या तरी चाळीतील मुलांमूळे कधीच आई बाबांना मुलगा नसल्याचे जाणवलेही नाही.

आणि आम्हालाही भाऊ नाही असे कधीही वाटले नाही.रक्षाबंधनला तर सगळे न सांगता यायचे राखी बांधून घ्यायला.चाळीतील सगळेच आम्हाला आमचीच माणसे वाटायची.पण त्या सर्वांच्यात जे कुटूंब आमच्या जिवाभावाचे होते ते म्हणजे दाते कुटूंब.दाते कुटूंबात किशोर काका,त्यांची पत्नी उमा काकू आणि त्यांची अजीत सुजीत नावाची दोन मुले असा फक्त चार जणांचा परिवार.

त्यांचे आणि आमचे आजही तितकेच घट्ट नाते आहे.प्रत्येक गोष्टी मधे आमची दोन्ही घरे कायम एकत्र राहीली.दाते काकू आणि काका म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा.कोणालाही हेवा वाटेल अशी त्यांची गोड जोडी.रस्त्याने चालत चालले तरी सगळे नुसते पहात रहायचे त्या दोघांकडे.कायम हसतमूख असे ते जोडपे.त्या काळातही नवरा बायको पेक्षा मित्र मैत्रीनी सारखे रहायचे ते दोघे.

काका नेहमी काकूचे सर्व हट्ट आनंदाने पुरवायचे. आठवड्यातून प्रत्येक रविवारी मुव्ही पहाणे बाहेर जेवणे फिरायला जाणे हे त्यांचे ठरलेले.एखाद्या पुरूषाला जोरू का गुलाम म्हंटल की त्याला राग येतो पण दाते काकांना असे म्हणालेले आवडायचे.खर सांगायचे तर माझ्या आता पर्यंतच्या आयुष्यात मी आपल्या बायकोवर इतके प्रेम करणारा नवरा अजूनही पाहीलेला नाही.

आज कालचे नवरे जेवताना मीठ नाही म्हणून भांडतानाही पाहिले आहेत मी पण दाते काका असे अजीबात नव्हते.एखाद्या दिवशी काकूला जेवण बनवायचा कंटाळा आला तर रात्रीच्या जेवणातही ते शिरा,पोहे,उपमा काहीही खायचे.काका जितके प्रेमळ तितकेच हौशीही होते.

काकू छान दिसलेली नटली सवरलेली त्यांना फार आवडायचे.त्यासाठी कायम नवीन साड्या त्यांना मॅचींग बांगड्या,रबर,क्लिप बो सर्व काही आवडीने स्वतः जाऊण घेऊण यायचे.एखादे वडील जितके आपल्या मुलीवर प्रेम करतात तितकेच किंबहूणा त्याहूनही जास्त प्रेम काका काकूवर करायचे.प्रेम विवाह केलेली जोडपी पण जितकी छान रहात नसतील तितके ते दोघे रहायचे.

नेहमी हसत खेळत रहाणारे त्या दोघांचे ते एक आदर्श कुटूंब होते.त्या दोघांच्या आयुष्यात कमी होती ती फक्त एका मुलीची त्या दोघांनाही मुलीची फार आवड होती पण त्यांना दोन्ही मुलगेच झाले.काही दिवसांनी माझा जन्म झाला.माझी आई मला नेहमी सांगते.मी झाल्यावर काका काकूला खुप आनंद झाला होता.

काकांनी तर पुर्ण चाळीमधे जिलेबी वाटली होती.पुढे मी कायम त्यांच्याचकडे असायची.आई सांगते माझी आंघोळ,काजळ-पावडर सारं काही काकूच करायची फक्त दुध पिण्यापूरती मी माझ्या आईकडे असायची.

ते दोघे कुठेही निघाले की,मी त्यांच्या मागे लागून रडून गोंधऴ घालायचे.त्या दोघांनाही मी रडलेली जराही सहण नाही व्हायचे.दोन्ही दादांपेक्षा जास्त माझे लाड पुरवले त्या दोघांनी.माझा इतका लळा लागला होता त्यांना की भविष्यात माझे लग्न होणार आणि मी दुसयाच्या घरी जाणार या विचारांनी त्यांना मी छोटी असतानाच रडू यायचे.

माझे कन्यादान करे पर्यंतची स्वप्ने ही पाहीली होती त्यांनी.इतका जीव लावायचे मला की सर्वांना वाटायचे मुलगी नाही म्हणून दत्तक घेतले त्यांनी मला.खरतर दत्तक घेणे या आैपचारीकतेची त्यांना कधी गरजच वाटली नाही.मनापासून प्रेम आणि माया करायची असेल तर त्यासाठी अश्या कागदी आैपचारांची गरज नाहीच लागत.मी दुसरीला असेन तेव्हाची गोष्ट एका रात्री काका काकू आमच्या घरी आले होते.आई बाबा आणि त्या दोघांनी खुप वेळ गप्पा मारल्या.

काकांना नोकरी मधे बढती मिळाली होती.दुस-याच दिवशी ते दिघेही तारापूरला जाणार होते. तिकडे काकांच्या सत्काराचा कार्यक्रम होता.ते दोघेही आई बाबांनाही येण्याचा आग्रह करत होते.पण,आईचे काका खुप आजारी होते त्यांना पहाण्यासाठी आई-बाबा कराडला जाणार होते.कराड पासून तारापूर जवळ असल्याने तिकडून तसेच तारापूरला जायचे आई बाबांनी ठरवले.

त्याच्या नंतर काका काकूने सर्वांच्या घरी जाऊण ही बातमी सांगीतली.त्या रात्री निघण्याची तयारी सुरू झाली पण अचानक छोट्या दादाची तब्बेत बिघडली.त्यामुळे काकूचे जाणे रद्द झाले.काका एकटेच निघाले.काका नेहमीच बाहेर जाताना दोन्ही दादांची आणि माझी पापी घेऊन निघायचे.त्यांनी मला उचलून घेतले येताना तुला काय घेऊण येऊ विचारले.

मी मागे लागल्यावर म्हणाले बच्चा मी गाडी घेऊन नाही चाललो लगेच येणार आहे.स्कुटर घेऊन जाताना दिसले नाहीत म्हणून मीही फार हट्ट केला नाही. निघताना त्यांनी आईला आवाज दिला म्हणाले पोराला बर नाही जरा लक्ष असूद्या.काकू कडे पहात म्हणाले आणि आमच्या सौ ही नाराज आहेत.त्यांच्याकडे ही लक्ष द्या.आई म्हणाली तुम्ही निश्चींत होऊण जा इथे आम्ही सगळे देऊ लक्ष. त्यानंतर काका तारापूरला जाण्यासाठी निघून गेले.

दुस-या दिवशी सकाळी चाळीचे वातावरण खुप भयंकर झाले होते रात्री पासून चाळीच्या समोर कुत्री रडत होती.खुप भकास वाटत होत सारं.कामे झाल्यावर काकू मला घेऊन जायला आली.तिचा चेहरा खुप उतरल्या सारखा वाटत होता.

आई ने विचारले सुजीतची आई काय झाल? इतक्या उदास का दिसत आहात तब्बेत बरी नाही का?काकू आईला म्हणाली काहीच कळेना खुप अस्वस्थ वाटत आहे.चिऊला घेऊण जाते जरा बर वाटेल.काकू रोज दोन्ही दादां सोबत मलाही दुध चपाती भरवायची.भरवत असताना अचानक घरी एक माणूस आला.

तो काकूला घेऊण जाण्यासाठी आला होता.काकांना आमच्याच इथल्या एका सरकारी दवाखान्यात अॅडमीट केले होते.विचारल्यावर कळाले की,चक्कर आली होती बीपी लो झाला होता.त्यानंतर काकूने आईला आवाज दिला त्यांच्या घरात मुलांजवळ कोणीही नव्हते आईला तिने ती जाऊण येईपर्यंत तिच्या घरात थांबायला सांगीतले.

त्या दवाखान्यात गेल्या तेव्हा काकांना घरी सोडलेही होते.काका ऑफीसच्या गाडी मधे होते.त्यांच्या सोबत त्यांचे वडील मधला भाऊ आणि काकूचा भाऊही होता काकूचा छोटा दिर तिला घेऊण रिक्षाने घरी आला.त्यांच्या पाठोपाठ सुमो आली.काकू घरात आली आणि तिच्या मागे काकांचे बाबा येऊण बसले खुप भयानक शांतता झाली होती चाळीमधे.काकू बाबांना म्हणाली आले का ते?आणि बाबा जिवाच्या आकांताने किशोर…….

म्हणून ओरडून जोरजोरात रडू लागले.काकूला काय चालले होते ते काहीही कळत नव्हते.ती वेड्यासारखी सैरभैर होऊण सगळयांच्या तोंडाकडे पहात होती.आणि तितक्यात दोन चार माणसे काकांचा मृतदेह घेऊण घरात आले ते पाहूण चाळीतील सर्वांनी टाहो फोडला.कोणाला स्वप्नातही वाटल नव्हत अस काही होईल ते.सार काही संपल होत.

रात्री पासून कुत्री रडण्याचा अर्थ तेव्हा जाऊण सर्वांना कळाला,काकूला वाटणारी हुरहूर,काकांचे जाताना आईला मुलांकड़े आणि माझ्या बायकोकडे लक्ष द्या म्हणने,आणि जाण्याच्या आदल्या दिवशी चाळीत सर्वांना भेटून जाणे.हे सगळे फक्त योगायोग नसूण त्यांच्या कायमचे निघूण जाण्याचे संकेत होते.

असे म्हणतात माणसाच्या अखेरच्या वेळात नेहमीच त्याच्या खुप जवळचे त्याच्या सोबत नसतात,म्हणूनच तर काकूची तयारी होऊणही तिचे एेन वेळी जाणे रद्द झाले. काकूला हे सर्व पाहूण खुप मानसीक धक्का बसला होता.ती काकांच्या मृतदेहा जवळ बसून एकटक पहात होती त्यांच्याकडे.काय पहात असेल ती? कधीही एक दिवस ही तिच्या शिवाय न रहाणारा तिचा नवरा.

तिला न सांगता कुठे चालला आहे ते? सगळे जण तिला रडवण्याचा प्रयत्न करत होते.कारण तिचे रडणे फार गरजेचे होते.अश्रूं वाटे तिच्या वेदना बाहेर पडल्या नसत्या तर तीला त्याचा खुप त्रास झाला असता.पण तिचे डोळे पाणी आटलेल्या विहीरी सारखे कोरडे ठिकूर पडले होते.
त्यानंतर खुप लोक काकांच्या शेवटच्या दर्शनाला येत होते.अंत्यसंस्काराची तयारीही झाली.

आईने मला बाजुच्या सिमा ताईकडे बसवले होते.थोड्यावेळाने मी आईला शोधत काकूकडे गेले.घरात खुप माणसे पाहूण घाबरूण मी काकूकडे जाऊन तिला मिठी मारली.तिने तसेच मला छातीशी कवटाळले आणि ती जोरजोरात रडून बोलू लागली.

चिऊ तुझ्या काकांना उठव त्यांना सांग तुला गाडीवर राऊंड मारून आणायला.ती रडत असताना मी आणखी घाबरेन म्हणून कोणीतरी मला तिच्यापासून दुर घेऊन गेले.त्यानंतर अंत्यविधीला दोन्ही दादां सोबत मुलगी म्हणून माझा हात पकडून बाबांनी काकांना माझ्या कडूनही शेवटचे पाणी पाजले.

त्यानंतर त्यांना न्यायची वेळ आली.रिती प्रमाणे काकूच्या बांगड्या फोडण्यात आल्या तिचे मंगळसुत्रही काढले,काकांना काकूने सजलेले सवरलेले फार आवडायचे.आणि म्हणूनच कदाचीत जाताना बरोबर ते तिचा सर्व साज श्रुंगारही घेऊन गेले.

आजही प्रश्न पडतो असेच होते तर मग काकू पण त्यांना खुप आवडायची?काका गेल्यानंतर तिचे संपुर्ण आयुष्य बदलून गेले.ते जिवंत असताना एकही दिवस माहेरी न राहीलेली काकू काकांनंतरही घर सोडून कुठेही गेली नाही.

दोन्ही मुलांना घेऊन ती चाळीतच राहीली.काका गेल्यापासून पुन्हा कधीही मी तिला सजलेली पाहिली नाही.आजही तिचे मोकळे हात,कुंकू नसलेले कपाळ आणि मोकळा गळा पाहून मनात गलबलून येत.तिला हिरवा रंग खुप आवडायचा त्या रंगाकडे ती आज पहात ही नाही.काकांनी असे अचानक जाऊण खुप मोठा दगा दिला होता सर्वांना.

मला माहीत आहे शरीराने आमच्यात नसले तरी मनाने ते आमच्या जवळच आहेत.काकू आजही माझ्यासाठी माझी दुसरी आईच आहे. माझ्या लग्नावेळी मी तिच्या पाया पडायला गेल्यावर तिने मला नजरेने खुणवून आधी काकांच्या फोटोच्या पाया पडायला सांगीतले.

आणि फोटोकडे पाहूण म्हणाली आहो पोरीला आशीर्वाद द्या कन्यादान करणार होतात तिचे.मला खुप भरून आले.वाटले खरच काकांची माझे कन्यादान करण्याची इच्छा अपूर्णच राहीली.मी तशीच मागे वळून काकूला घट्ट मिठी मारली.

काका गेल्यानंतर मुलांसाठी खंबीरपणे उभी राहून हुंदका गिळत मनातल्या मनात झुरणारी काकू पुन्हा एकदा तिच्या पोरीला निरोप देताना तिच्या गळयात पडून तितक्याच आकांताने रडू लागली.

Please follow and like us:

Leave a Reply