आडवे तिडवे “डावे”-

एप्रिल १९६१. विजयवाडा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय अधिवेशन भरलेले. मध्यरात्री अचानक सायरनच्या आवाजाने प्रतिनिधींना उठवले गेले. आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आलेला रशियाचा सोस्लॉव्ह याचे भाषण सुरु झाले.

अमेरिकेच्या नाकावर टिच्चून सोव्हिएट रशियाने अंतराळात पहिला मानव पाठविल्याचे त्याने जाहीर केले. रशियन अंतराळयानातून युरी गागारीन हा ‘कॉम्रेड’ प्रथमच अंतराळात पाऊल ठेवत असल्याचे त्याने प्रतिनिधींना सांगितले.

सर्व भारतीय प्रतिनिधी उठून उभे राहिले.रशियाच्या पराक्रमाला मानवंदना दिली गेली. टाळ्यांचा मोठा गजर,घोषणा,गाणी याने अधिवेशना चा परिसर दुमदुमून गेला. याच दरम्यान देशात अत्यंत तणावाची परिस्थिती होती. पूर्वोत्तर सीमांच्या बाबतीत चीनने आक्रमणाची धमकी दिलेली होती. भारतीय कम्युनिस्टांची लेनिन,स्टालिन आणि माओ ही आराध्य दैवते हॊती.

Loading...

या डाव्यांमधील ‘अतिडाव्यांना’ माओ अधिक जवळचा. प्रमोद दासगुप्ता आणि बंगालमधील अन्य कम्युनिस्टांना चीनचे भारता वरील संभाव्य आक्रमण हे भारताला खरे ‘स्वातंत्र्य’ मिळवून देईल असेच वाटत होते. अमेरिकेच्या मदतीने व ब्रिटनच्या सल्ल्याने भारतानेच नकाशात फेरफार केले आहेत आणि चीनचे आक्रमण न्याय्य आहे ही या ‘अतिडाव्यांची’ भूमिका.

Loading...

कॉ.श्रीपाद डांगे या एकाच नेत्याने खणखणीत राष्ट्रवादी भूमिका घेत चीनचा निषेध केला. ज्योती बसू आणि अन्य बहुसंख्य ‘डावे’ कुंपणावर तर बंगाल मधील बहुसंख्य कम्युनिस्ट नेते हे चीनचे उघड समर्थक.

रशियाच्या अंतराळ प्रगतीने आनंदून जाणारे हे डावे नेते आणि प्रतिनिधी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत मात्र उदासीनच नव्हे तर ‘देश तुटला तरी चालेल, पण माओची लाल क्रांती आता भारतातही आणता येईल’ या विचारांचे समर्थक होते.

‘राष्ट्र’ ही संकल्पना डाव्या चळवळीला मुळातच तकलादू वाटते. ‘ मी रशियावर थुंकतो ‘ असे वारंवार म्हणणारा लेनिन हा आंतरराष्ट्रीय वादीच. ‘मातृभूमी’ या कल्पनेला त्याच्या लेखी शून्य किंमत. कामगारांचे राज्य आणण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा ‘ संपूर्ण आणि सर्वंकष विध्वंस ‘ हाच उपाय आहे असे सांगणाऱ्या या आततायी माणसाचे भारतातील समग्र डावे हे कट्टर भक्त.

या लेनिनने घडवलेल्या क्रांतीचे सत्तर वर्षांतच धिंडवडे निघाले. बळजबरीने साम्यवादाच्या ‘भयाने’ एकत्र बांधलेला कृत्रिम राष्ट्र समूह कोसळला आणि आपापल्या ‘सांस्कृतिक राष्ट्रवादाची’ वाट चोखाळत अनेक देश या जोखडातून मुक्त झाले. विजय झाला तो क्रांतीचा नव्हे, मार्क्सवादाचा नव्हे तर ‘ सांस्कृतिक राष्ट्रवाद ‘ याच बलवत्तर प्रेरणेचा !!

———————————————————————-

लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांना डाव्या चळवळीत काडीचीही किंमत नाही. “Let Hundred Flowers Bloom..” म्हणणारा चीनचा माओ हा अति डाव्यांचा हिरो. विचारस्वातंत्र्याची आवई उठवीत त्याने लोकांना आधी बोलू दिले आणि मग कोण कुठे उभे आहे हे नेमके कळल्यावर क्रांतीच्या नांवाखाली विरोधकांच्या निघृण कत्तली केल्या.

शंभरपैकी नव्यान्नव फुले मेली आणि माओच्या क्रांतीतून हुकूमशाहीचे एकच फुल मात्र राक्षसी आकारात उमलले. आजचे चीन हे मार्क्सवादाच्या विजयाचे नव्हे तर प्रच्छन्न भांडवलवादाच्या आणि हुकूमशाहीच्या एकछत्री अंमलाचे प्रतीक आहे!!


—————————————————————————–

विशेष म्हणजे भारतातील अति-डाव्यांनी माओ, लेनिन या आपल्या प्रेरणा स्त्रोतांची आजवर कधीही निर्भत्सना, निंदा वा साधा निषेधही केलेला नाही. आता दस्तुरखुद्द या आपल्याच ‘लालभाईंच्या’ इतिहासाकडे वळूयात ….
—————————————————

मुळात भारतीय राष्ट्रवाद या संकल्पनेवर या मंडळींचा अगदी आजही विश्वास नाही. ” India is multinational state ” हे आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संघटनेचे सत्तर वर्षांपूर्वीचे म्हणणे बहुतेक भारतीय कम्युनिस्टांना आजही मान्यच आहे. भारतात नांदणाऱ्या अनेक राष्ट्रांपैकी ‘पाकिस्तान’ नांवाच्या किमान एका राष्ट्राला तरी हिंदुस्थानपासून स्वातंत्र्य मिळते आहे ही या मंडळींची फाळणीच्या वेळेस भूमिका होती.

भारताचे तुकडे करून अनेक छोटी राष्ट्रे निर्माण करायची आणि तेथे कम्युनिस्ट क्रांती घडवून आणायची ही दिवास्वप्ने पाहत कम्युनिस्टांच्या सुरुवातीच्या पिढ्या वाढल्या. पाकिस्तानची धार्मिक आधारावर होणारी फाळणी या पोथीनिष्ठांना ‘ वर्गीय क्रांती’ वाटली.

पाकिस्तानमध्ये ‘कम्युनिझम’ आणण्याचे स्वप्न पाहणे तर सोडाच पण एक-दोन नेते वगळता बाकी सारे ‘डावे’ भारतात जीव वाचवण्यासाठी पळून आले.पळून येणाऱ्यांत ज्योती बसू हेही होते. मग यांनी तेलंगणाकडे मोर्चा वळवला.

येथील जनता निझामापासून मुक्त होऊन भारतात सामील होण्यासाठी आसुसलेली असतांना कम्युनिस्ट क्रांतिकारक मात्र ‘लाल तेलंगणाच्या’ निर्मितीत व्यग्र होते.

सशस्त्र लढा पुकारला आणि मग खुद्द स्टॅलिनने कान टोचल्यावर ,पटेलांचा अवतार पाहिल्यावर भानावर येत आपली अर्धवट स्वप्ने गुंडाळीत ही मंडळी लोकशाहीकडे वळाली.

निवडणुकीच्या राजकारणात राहून डाव्यांना भारतीय लोकशाहीचे मर्म कळू लागले. लोकांच्या प्रश्नावर आंदोलने उभी करीत आपला जनाधार त्यांनी काही राज्यांत वाढवला. जनहिताची कामेही नक्कीच केली.

जमिनींचे फेरवाटप हे त्यापैकीच एक. कॉ. राम रत्नाकर, कॉ. दिनकरराव कलावडे हे नगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट नेते आणि त्यांचे काम मी स्वतः पाहिलेले आहे. तळमळीचे कार्यकर्ते. विडीकामगार, कंत्राटी कामगार यांच्यासाठी संघर्ष करणारे.

असंघटीत वर्गांच्या पाठीशी उभे राहणारे. स्वातंत्र्यानंतरच्या ३०-४० वर्षांत राजकारणात सहभागी होत,निवडणूका लढवीत त्यांच्यासारख्या अनेक कम्युनिस्ट नेत्यांनी मार्क्सवादाला भारतीय वळण देण्याचा नक्की प्रयत्न केला. त्यांचे हे सनदशीर राजकारण मान्य नसणारे नक्षलवादी स्वाभाविकच फुटून निघाले आणि सी.पी.आय.(एल.एम) हा कट्टरवादी पक्ष निर्माण झाला. उरलेले डावे एकतर राजकारणात उतरले किंवा माध्यमे, विद्यापीठे वा कलाक्षेत्रात स्थानापन्न झाले.

———————————————————————–

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगवेगळ्या तुरुंगातून सुटलेल्या क्रांतिकारकांनी विशेषतः बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्ष जोमदारपणे वाढवला. सर्व जगभरच मार्क्सवादाचे आकर्षण असलेला हा काळ होता. भारतातील प्रतिभावान, मेधावी तरुणांना या विचाराने भुरळ न घातली तरच नवल होते. साहित्य,संगीत,सिनेमा, पत्रकारिता,अध्यापन या क्षेत्रात हे नव-मार्क्सवादी आपापल्या कामगिरीने साहजिकच सुस्थापित झाले. काँग्रेस हा पक्ष त्यांचा वैचारिक विरोधी कधीच नव्हता. सत्तेतील साठमाऱ्या वगळता काँग्रेसनेही राजकारणबाह्य क्षेत्रातील कम्युनिस्टांना कायमच उत्तेजन दिले, अधिकार दिले, सन्मानाच्या जागा दिल्या. राजकारणात जनसंघाचा फारसा शिरकाव होऊ द्यायचा नाही हा राजकारणातील कम्युनिस्टांचा चंग तर कोणत्याही सामाजिक क्षेत्रातून ‘संघवाल्यांना’ वाट्टेल ते करून हुसकावून लावायचे हा राजकारणात नसलेल्या मार्क्सवाद्यांचा निर्धार हे समीकरण जवळपास ५० वर्षे अबाधित होते.

————————————————————————–

संविधानाच्या कक्षेत राहून, प्रसंगी हिंसेचा आधार घेऊन सत्तेचे राजकारण करणारा डाव्यांचा एक गट आणि मार्क्स,लेनिन,माओ यांच्या पोथीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवाद,धर्म,परंपरा या ‘राष्ट्र’ घडविणाऱ्या भावात्मक गोष्टींची निर्भत्सना करणारा, चिथावणीखोर वक्तव्यांनी जातीपातीतील दरी वाढविणारा, ‘वर्गभेद’ असेल तरच भारतात क्रांती होऊ शकते यावर विश्वास असणारा विद्यापीठ,कला व अन्य क्षेत्रातील डाव्यांचा दुसरा गट अशी ही ‘ क्षेत्र व श्रम ‘ यांची खास डाव्या स्टाईलची विभागणी होती. विशेष म्हणजे डाव्यांचे हे दोन्ही सुभे त्यांच्या फुटून निघालेल्या नक्षलवादी भावंडांचे छुपे समर्थक होतेच. या तीनही गटांनी आपापले प्रभावक्षेत्र निर्माण केले. राजकारणातील डावे बंगाल,केरळ आणि त्रिपुरात घट्टपणे उभे राहिले. वैचारिक वाल्यांनी जे,एन.यु.मध्ये गड बनवला तर नक्षलवादी दंडकारण्यात फोफावले.कम्युनिझमच्या या ‘त्रिकोणाला’ खरे आव्हान मिळू लागले ते संघाच्या अयोध्या आंदोलनानंतर. १५ टक्के मुस्लिमांच्या मतांसाठी अत्यंत प्रतिगामी निर्णय घेत काँग्रेसने मुस्लिम महिला विधेयक आणले आणि आणि समाजवादी व कम्युनिस्टांनी मिठाच्या गुळण्या धरीत ते बिनबोभाट पारित होऊ दिले.याची सणसणीत प्रतिक्रिया म्हणून हिंदूंची कायमस्वरूपी व्होटबँक आपोआपच भाजपकडे वळाली. संघपरिवारातील संघटनांनी अक्षरशः सर्वस्व ओतून समाजव्यापी काम याच ५० वर्षांत उभे केले. मागास जातीपाती संघ-भाजपच्या साथीदार झाल्या. लाल त्रिकोण मुळापासून हलला आणि इथे या टप्प्यावरच वैचारिक लढाई सुरु झाली.

————————————————————————-

१. मागास जातींना हिंदुत्वापासून तोडण्यासाठी मनुवाद आणि ब्राह्मणवादाचे ‘ब्रह्मास्त्र’ डाव्या विचारवंतांनी बाहेर काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर एकाएकी या डाव्या मंडळींना वाटू लागला. खुद्द बाबासाहेबांनी या कम्युनिस्टां बद्दल आपल्या दलित बांधवांना वस्तुस्थिती सांगितलेली असतांना, त्यांच्या अ-लोकशाही आणि हिंसाप्रेमी मार्गाची माहिती वारंवार बजावलेली असतांना आणि याच डाव्यांनी प्रत्येक निवडणुकीत बाबासाहेब आणि त्यांचा पक्ष पराभूत व्हावा यासाठी खुले प्रयत्न केलेले असतांना डाव्यांचे हे दांभिक ‘दलित प्रेम’ साहजिकच हास्यास्पद होत गेले.

२. इतिहासाची मोडतोड करीत औरंगजेब, निजाम, गझनी ,घोरी या आक्रमकांना भारताचे शिल्पकार म्हंटले जाऊ लागले. ‘हिंदुत्व’ या समान विचारधारेखाली ज्या ज्या गोष्टी सहजपणे येऊ शकतात अशा इतिहास,संस्कृती आणि परंपरांची यथेच्छ मोडतोड वैचारिक स्वातंत्र्याच्या नांवाखाली सुरु झाली.

३.काही मोजक्या विद्यापीठांमध्ये रावणाचे पुतळे मुद्दाम उभे करणे, बीफ फेस्टिवल भरवणे हे उद्योग याच मोडतोडीचे निदर्शक. दहशतवाद्यांना हिरो ठरवणे, त्यांच्या मयताचा जनाजा पढणे, त्यांची जयंती व मृत्युदिन साजरा करणे, न्यायालयाला दोषी ठरवणे हे कार्यक्रम याच मुशीतले.

———————————————————————–

मुळात ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच डाव्यांना मान्य नाही त्यामुळे ‘राष्ट्र’ एक करणारा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हा तर त्यांचा शत्रूच. त्यातूनच आल्या त्या ‘भारत तेरे तुकडे होंगे …’, ‘भारत से आझादी …’ अशा घोषणा. या घोषणा अचानक कुणी अलगाववादी जमले आणि त्यांनी दिल्या असे समजणे म्हणजे निव्वळ भाबडेपणा आहे.

वर्षानुवर्षे जोपासलेल्या आंधळ्या मार्क्सवादाचे ते विषारी फळ आहे. डाव्यांचा हा वैचारिक आतंकवाद पूर्वीपासून चालू होताच. पण सोशल मीडियाने जे. एन. यु. त नेमके काय चालते हे देशभरांत पोहचवले. डाव्यांच्या या उद्योगाची जेंव्हा देशभर निर्भत्सना होऊ लागली तेंव्हा या बुद्धिवंतांनी त्यांची जुनी शक्कल पुन्हा एकदा वापरायला सुरुवात केली … एक चेहरा ओरबाडताच तात्काळ दुसरा चेहरा दाखविण्याची !!


‘चेहरा बदलाची’ ही पाच उदाहरणे

१. १९६४-६५ साली चीनच्या संगनमताने देशविरोधी कारस्थान रचले म्हणून बंगालमधील अनेक डाव्या पुढाऱ्यांना तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी अटक करून तुरुंगात टाकले. डळमळीत केंद्रसरकाराला जनतेत हा विषय भक्कमपणे नेता आला नाही. याचा फायदा उठवीत बंगालमधील कम्युनिस्टांनी आपल्या ‘ पकडलेल्या कारस्थानांना ‘ अन्नधान्याच्या टंचाईविरोधी लढ्याचे स्वरूप
हा हा म्हणता दिले. आपण जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतो म्हणून सरकार आमचा छळ करते आहे असा हा कांगावा. दुबळे केंद्र सरकार डगमगले. नेत्यांची सुटका केली पण या कांगावखोर डाव्यांनी निवडणूका मात्र जिंकल्या. चेहरा बदलण्याचे हे तंत्र हा डाव्यांचा हुकमी एक्का ठरला तो असा !!

२. हैद्राबाद विद्यापीठात घडलेल्या घटनांचा उगमबिंदू होता तो दहशतवादी याकूब मेनन याच्या फाशीचा निषेध करणारा कार्यक्रम आणि त्याला आक्षेप घेताच हिंसेवर उतरलेले याच विचारधारेचे विद्यार्थी. पण आंदोलन प्रसिद्धीच्या झोतात येताच चेहरा बदलला गेला. दलित विद्यार्थी विरुद्ध संघ-अभाविप असा नवा चेहरा तत्काळ धारण केला गेला. योजना होती ती देशव्यापी आंदोलनाची. पण हे आंदोलन विद्यापीठाच्या बाहेरही पडू शकले नाही. कम्युनिस्ट नेमके काय आहेत हे दलित समाजाला चांगलेच ठाऊक आहे.

३. मागील वर्षी जे. एन. यु. त देशद्रोही घोषणा देणारे उघडे पडले. देशभर संतापाची लाट उसळली. डाव्यांनी जुनी युक्ती नव्याने वापरली. चेहरा बदलण्याची. काश्मीर, मणिपूरच्या आझादीच्या घोषणा देणाऱ्या विदयार्थ्यांची बेलवर सुटका होताच जंगी सभा भरवली गेली.

आता इथे हुशारीने घोषणा बदलल्या गेल्या. मनुवाद से आझादी, संघसे आझादी , मोदी से आझादी …. असा हा थेट चेहरा बदल !! बरखा ,राजदीप ,रवीश यांनी हा बदललेलाच चेहरा आणखी रंगवला. माध्यमांतून मांडला.डाव्यांचा खरा चेहरा दाखवला तो अभाविपने आणि तो तसाच ‘विद्रुप’ चेहरा समाजापुढे आणला तो अर्णबने.अभाविप आणि अर्णब म्हणून वाईट. देशभक्तीचे ठेकेदार वगैरे वगैरे ..

४. परवा दिल्ली विद्यापीठातील घटना ही याच मालिकेत फिट्ट बसणारी. ‘CULTURE OF PROTEST…’ या कार्यक्रमाला विरोध झाला तो जे.एन.यु. च्या उमर खालिदला आमंत्रण दिले गेले म्हणून. देशद्रोही घोषणा देतांना हाच उमर सगळ्या कॅमेऱ्यांत पकडला गेला आहे. कॉलेजच्या विदयार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे रीतसर तक्रार केली आणि व्यवस्थापनाने या कार्यक्रमाची परवानगी रद्द केली. डाव्यांनी गेल्या ५० वर्षांत संघवाल्यांचे असे शेकडो कार्यक्रम दबाव आणून रद्द केले आहेत.

आता फासे उलटताच चवताळलेल्या डाव्या संघटनांनी हाणामारी सुरु केली. दगडफेक करणारे हेच. पण दुसऱ्या दिवशी ‘चेहरा बदलण्याचा’ नेहमीचाच प्रकार. अभाविपने हिंसाचार केला अशी आवई उठवली. ‘हिंदू’ हे वर्तमानपत्र डाव्यांचे मुखपत्रच. त्यांनी ‘अभाविपचा हिंसाचार’ या शीर्षकाखाली एक फोटो छापला .त्यात या डाव्यांचा म्होरकाच एका विद्यार्थ्याला बडवतोय हे स्पष्ट दिसतयं. मुळात राष्ट्रवादावरची चर्चा बदलून ती अभाविपच्या तथाकथित हिंसाचारावर नेण्याची ही चलाखी आता पुन्हा अंगलट येते आहे.

ती झाकण्यासाठी अभाविपने मुलींना धमक्या दिल्या,सैनिकांचा अपमान केला असे आरोप डाव्यांनी सुरु केलेत. या सर्व ‘चर्चा बदलणाऱ्या’ नवनवीन युक्त्या. स्टालिन आणि माओने अशाच विकृत आणि बीभत्स गोष्टी केल्या. त्यांच्या अंधभक्तांना ‘चेहरा बदलण्याची’ सवय लागावी त्यात नवल काय ?

५. याच चलाखीची छोटी आवृत्ती लगेचच पुणे विद्यापीठात घडली. डाव्या चळवळीतील काही विद्यार्थी मुळात जमले ते उमर खालिदला समर्थन देण्यासाठी. अभाविपने आक्षेप घेताच पुन्हा हाणामारी. प्रसिद्धीचा झोत पडताच खरा चेहरा काढून ‘दुसरा चेहरा’ दाखविण्याचा पुन्हा तोच प्रयत्न. आम्ही उमरच्या समर्थनाला नाही तर तावडेंच्या तथाकथित अशैक्षणिक निर्णयांना विरोध करायला जमलो होतो ही मखलाशी.

—————————————————————-

चेहरा बदलणे, चर्चा बदलणे , माध्यमांतून बातम्यांची दिशा बदलणे हे डाव्यांचे आजपर्यंतचे बलक्षेत्र होते.आज माध्यमांवरील मक्तेदारी संपली. सोशल मीडिया मुक्त आहे. त्यातून सत्य समाजापुढे येतेच. चेहरा बदलण्यात पटाईत असलेल्या डाव्यांची त्यामुळेच गोची झालीये. ते जेव्हढे चावताळतात तेव्हढेच आपटतात. हे पुन्हा पुन्हा घडते आहे आणि डाव्यांचा ‘खरा चेहरा’ लोकांना कायमचा कळेपर्यंत पुन्हा पुन्हा घडत राहणार आहे !!

—————————————————————

डाव्या चळवळीत झोकून देत काम करणारे, ‘नाही रे’ वर्गाच्या हितासाठी लाठ्या झेलणारे हजारो कार्यकर्ते आजही आहेत. अनेक विधायक कामे या निःस्वार्थी कार्यकर्त्यांनी उभी केलेली आहेत. ते त्यांचा ‘मार्क्सवाद’ शोषितांच्या कल्याणात, उन्नतीत आणि समाज व देशाच्या विकासात शोधतात. हिंसेपासून दूर राहतात. समाजाचे ‘भावविश्व’ समजून घेण्याचे व्यावहारिक शहाणपण त्यांना असते. प्रश्न आहे तो समाजापासून तुटलेल्या, मार्क्सवादाच्या पोथीत अडकलेल्या, समाजाचे भावविश्व समजावून न घेता देशाला एक ‘कागदाचा नकाशा’ समजणाऱ्या डाव्या विचारवंतांचा, जनाधार नसलेल्या त्यांच्या पुढाऱ्यांचा आणि त्यांच्या मुशीतून घडणाऱ्या डाव्या तरुण पिढीचा.

********************************

होय, त्यांच्या राष्ट्रवादाबद्दल शंका आहेतच. त्यांचा इतिहासचं तसा आहे . हा देश एकत्र बांधून ठेवणारी, त्यांना आकलन झालेली कोणती सूत्रे आहेत हे एकदा त्यांनी सांगावेच.

*********************************

काश्मिरी पंडित श्रीमंत होते, जमीनदार होते म्हणून गोरगरीब मुस्लिमांनी आपली पिळवणूक थांबवण्यासाठी त्यांना खोऱ्यातून हाकलून लावले हे या अतिडाव्यांचे आकलन आहे. काश्मीर आणि मणिपूरमध्ये सैनिक राजरोस महिलांवर बलात्कार करतात हे त्यांचे निरीक्षण आहे. पूर्वोत्तर भारत हा केवळ सैनिकी बलामुळे भारताचा भाग आहे. तो मुक्त व्हायला हवा हा त्यांचा आग्रह आहे.

************************************

हे आकलन, हे निरीक्षण आणि हा आग्रह धादांत खोटा आहे. त्याला विरोध होणारच. संघ परिवारातील संघटना एकेकाळी भावनिक आंदोलने लढवायच्या. पिढी बदलली,काळ बदलला. बौद्धिक ताकतीवर आता ते ‘डाव्यांना’ आव्हान देत आहेत. ‘डावे’ मात्र मार्क्सच्या पोथीला अजूनही कवटाळून बसलेले आहेत. भारताचा समग्र भावात्मक विचार नाकारीत आहेत. मार्क्स, लेनिन आणि माओच्या बुद्धीच्या ‘उसन्या प्रकाशात’ या देशातील प्रश्नांची उत्तरे शोधीत आहेत.

——————————————————————

अधिकाधिक समाजव्यापी बनत ‘उजवे’ कधीच बदलले आहेत, आता वेळ आहे ती ‘डाव्यांनी’ बदलण्याची. कायम ‘चेहरा बदलत’ राहून चर्चा बदलण्यापेक्षा आपल्याच विचारांची तपासणी अधिक चांगली. डाव्यांच्या एकांगी भूमिकांमुळे उजवे वाढताहेत. आणखीही वाढतील. एकच विचारसरणी प्रचंड बळकट होणे लोकशाहीला मारकच. भारताला डावे हवे आहेत, डाव्यांना हा ‘भारत’ हवा आहे कि नाही हा खरा प्रश्न आहे !!

=========================================================================

जयंत कुलकर्णी
https://www.facebook.com/jayant.kulkarni.3572

 

Please follow and like us:

Leave a Reply