ती दुर्देवी…

ती दुर्देवी…

एक दिवस अचानक ती दिसली. दिसायला इतकी देखणी होती कि, तिला पहाता क्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो. लांब सडक कमरेच्या खाली पडणारे तिचे ते काळे भोर मला तिच्या प्रेमत कोणालाही . चेहरा तर अगदी स्वतःमध्ये हरवून घेतील, पौर्णिमेच्या चंद्रा सारखा शुभ्र चेहरा, तिचे ते टपोरे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी आणि नाजूक ओठ, आणि कमनीय बांधा. तिच्याकडे पाहीले तेव्हा असे वाटले कि, काय छान मूड असेल देवाचा तेव्हा कि, जेव्हा त्याने हिला रेखाटली असेल.

मी जेव्हा तिला पहील्यांदा पाहीले तेव्हा तिने उगवत्या सूर्याच्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. त्या रंगामध्ये तर ती स्वर्गातून उतरलेल्या परी पेक्षाही सुंदर वाटत होती.आम्ही भाडोत्री काढले आणि मी तीथे राहू लागलो. मला आठवत त्यावेळी मी नुकताच दिवाळीच्या सुट्टीवरून गावी जाऊन आलो होतो.

Loading...

एक-दोन दिवस मुद्दाम आधी आलो कारण घरात साफसफाईही करायची होती. हे सर्व मी स्वतःच करायचो आईने माझ्या स्वतःची कामे स्वतः करायची सवय लावली होती त्यामुळे मला झाडू मारणे, साफ-सफाई करणे, भांडी घासणे, कपडे धुवने आणि जेवण बनवणे हे सर्व करता यायचे. पण, इकडे मी पुण्याला एका आय टी कंपनी मध्ये नोकरी करत होतो.

आई-बाबा गावी असायचे एकुलता एक असल्याने वरचे वर मला त्यांना भेटायला जावे लागायचे. किंवा त्यांना आठवण आली कि, ते दोघे यायचे मला भेटण्यासाठी जास्त करून आईच यायची. मी इकडे येण्या आधी कधीही घरापासून दूर राहीलो नव्हतो त्यामुळे फार काळजी वाटायची तिला. इकडे पुण्यामध्ये आमचे स्वतःचे घर होते. मी कामाला लागण्याआधी आम्ही ते घर भाड्याने दिले होते.

Loading...

मी कामाला लागल्यानंतर कामामुळे मला सर्वच करणे शक्य व्हायचे नाही साफ सफाई करायचो मी घरातील. कपडे मात्र एकदम आठवड्याने लॉन्ड्री मध्ये द्यायचो. जेवण मात्र बाहेरच करायचो. कधी वाटले घरचे काही खावे तर मग स्वतः बनवून खायचो. गावावरून आल्या नंतर घरची साफ-सफाई झाल्यावर बिल्डींगच्या खाली मित्रांच्यात गप्पा मारायला गेलो.

थोडा वेळ गप्पा मारून बाहेर जेवायला जायचा बेत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच होत्या कि, ती आली आणि ती आली. ते अशी आली कि, मनात घर करून गेली. मी तसा स्वभावाने शांत आणि मितभाषी असल्यामुळे माझी मित्रांना ही कोण रे? हे विचारण्याची काही हिंमत झाली नाही. तितक्यात कोणीतरी मित्र तिला पाहून बोलला आई शप्पत काय दिसते ना रे ही ? हिचे लग्न झाले नसते तर नक्कीच पळवून आणली असती हिला.

तिचे लग्न झालेले ऐकून मला खूप वाईट वाटले. तितक्यात दुसरा मित्र बोलला साला पण तीचा नवरा पाहीलास का ? लंगुर के हाथ मी अंगूर. त्या सगळ्यांच्या बोलण्यावरून मला साधारण अंदाज आला कि, हिचा नवरा नक्कीच बरोबर नसणार. त्यावेळी ती मला स्वतःमध्ये गुंतवणाऱ्या एखाद्या गूढ कादंबरी सारखी भासली.

का कुणास ठाऊक माझ्या मर्यादा ठाऊक असूनही मला तिला जवळून पहायचे होते, तिला ओळखायचे होते, तिच्या कादंबरीचे  पान अन पान मला वाचायचे होते. रात्री जेवण करून घरी आलो मी. एकटा असायचो त्यामुळे अधून-मधून  वाटल तर ड्रिंक करायचो मी. आणि त्या रात्री तर आवर्जून घेतेली होती. दिवसभर घराच्या साफसफाई मुळे जरा कंटाळल्या सारखे वाटत होते त्यामुळे.

रात्री घरी यायला थोडा वेळच झाला कसा बसा घरा पर्यंत पोहोचलो. दरवाजा खोलून घरात जाणार तितक्यात एका बाईचा रडण्याचा आवाज आला. पहील्यांदा वाटले मला भास होत आहेत. मग पुन्हा महेश सोडा, महेश सोडा म्हणून आरडा ओरडा माझ्या कानी येऊ लागला. आणि त्यानंतर मी त्या आवाजाच्या दिशेने गेलो.

आवाज माझ्या बाजूच्या घरातून येत होता. हळू हळू मी त्या घराच्या दरवाजा पर्यंत जाऊन पोहोचलो. मग आवाज आणखी स्पष्ट येऊ लागला. तिचे हुंदके माझ्या मला प्रचंड बैचेन करत होते. मला तिला मदत करायला जावे वाटत होते पण, कसा जाणार? आतून झटापटीचे आवाज येत होते, तिला होणाऱ्या मारहाणीचेही आवाज येत होते. तिच्या त्या किंचाळ्या मला आणखी आणखी अस्वस्थ करत होत्या. मधूनच त्या घरातील पुरुषाचा गलिच्छ शिवीगाळ करण्याचाही आवाज येत होता.

मला काय करू काय नको काहीही सुचत नव्हते. शेवटी न राहून मी त्या घरची बेल वाजवली आणि लपून बसलो. दरवाजा त्या घरातील त्या पुरुषाने उघडला. भयंकर भारदस्त शरीराने धीप्पाड त्याच्या एका हातात कोणत्याही स्त्रीचा जीव जाईल असा तो. मला तर त्याच्या सोबत रहाणारी ती बाई हे सर्व कसे सहन करत असेल ह्याचा विचार करूनच अंगावर काट येत होता.

त्या इसमाने बाहेर आल्यावर कोण आहे कोण आहे विचारात मला दोन चार शिव्या घातल्या आणि गेला पुन्हा घरात निघून. त्यानंतर मग आवाज येणे बंद झाले आणि सर्व शांत झाल्यावर मी घरात जाऊन बेडवर जाऊन पडलो. ह्या सर्वातून बाहेर येऊन शांत पडलो होतो तेव्हा मात्र पुन्हा संध्याकाळी पाहीलेल्या तिचा चेहरा माझ्या समोर येऊ लागला.

आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासून आवडली आणि तिचे लग्न झाले आहे हा विचार करत करत कधी झोप लागली कळालेच नाही.    त्यानंतरचे अनेक दिवस ती दिसावी म्हणून मुद्दाम मी खाली मित्रांच्यात जाऊन बसू लागलो. पण, ती काही पुन्हा दिसली नाही. कुठल्या माळ्यावर राहते ते देखील माहीत नव्हते मला. साधारण आठवडा झाला असेल रविवारचा होत.

मी किचनमध्ये चहा बनवत होतो आणि कानावर छान गाणे ऐकू येऊ लागले.” आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज घ्या जानुनी या वाहणाऱ्या गाण्या सवे …..लहरेण मी, बहारेन मी तरीही मला लाभेन मी ….एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी …….

आवाज इतका गोड होता कि, मला रहावले नाही आणि मग मी त्या आवाजाच्या शोधात माझ्या गेलेरी मध्ये गेलो. आवाज माझ्या बाजूच्या घराच्या किचनमधून येत होता. तिचा आवाज तर कानावर पडत होता पण ती काही दिसत नव्हती. या आधी कधीही हा आवाज ऐकला नव्हता मनात विचार आला ही तीच तर नसेल.

म्हणून मी तिला पाहण्यासाठी आणखीनच आतुर झालो. बराच वेळ झाला पण, ती काही दिसत नव्हती. तिच्या बांगड्यांची किणकिण आणि भांड्यांचा आवाज तिच्या गाण्याला साथ देत होते. आणि अचानक गेस वर काही उतू गेल्याचा आवाज आला. आणि मी चहा ठेवला आहे हे मला आठवले आणि मी धावत किचनकडे गेलो.

तिच्या गाण्याचा नादात माझा अर्धा चहा माझे काम वाढवण्यासाठी उतू गेला होता. मी वैतागलो आणि चहा घेऊन बाहेर जाऊ लागलो. पुन्हा तिच्या गाण्याचा आवाज येऊ लागला. मग मी चहा घेऊनच गेलेरी मध्ये गेलो. चहा संपला तरीही तिचे दर्शन काही झाले नाही. माझा जवळ जवळ तास वाया गेला असेल तिच्या नादात  वैतागून मग पुन्हा घरात जाणार तितक्यात ती तिच्या किचनच्या खिडकीत दिसली. आणि ती तीच होती जिच्या शोधात होतो मी गेला आठवडा भर.

तिला पाहून मी खूप खुश झालो जिला मी इतके शोधत होतो ती माझ्या घर शेजारी रहाते पाहून मला खूप आनंद झाला. त्यानंतर मग काय मी घरात कमी आणि गेलेरी मध्येच जास्त राहू लागलो, तिची एक झलक पाहण्यासाठी. ती मात्र या सगळ्या पासून अगदी बेखबर होती. तिला मी तिच्याकडे पाहत असतो तिची गाणी ऐकत असतो हे माहितही नव्हते. पण, आता मला रहावत नव्हते का कुणास तिच्या सोबत खूप बोलावेस वाटत होते.

त्या रात्री पासून तिच्या ऐकलेल्या त्या जीवघेण्या किंचाळ्या मला अस्वस्थ करत होत्या, मला तिची मदत करायची होती, तिचा आधार व्हायचा होता, तिचा छान मित्र होऊन तिला जाणून घ्यायचे होते. पण, कसा बोलू? कुठून सुरुवात करू? काहीही कळत नव्हते.

कारण, ती बाहेरही फारशी निघायची नाही. असेच रोज तिला चोरून चोरून पाहून पुढे पुढे तिच्या सोबत न बोलताही मला तिचा दिनक्रम कळू लागला होता. सकाळी साधारण सहाच्या दरम्यान ती किचनमध्ये असायची त्यावेळी नक्कीच आंघोळीचे पाणी तापवत असणार, त्यानंतर सातच्या सुमारास तिच्या घरातून छान धूप अगरबत्तीचा वास आणि घंटीचा आवाज यायचा म्हणजे ती वेळ तिच्या देवपूजेची असेल हेही मला कळाले होते, साडेसात पर्यंत ती पुन्हा किचनमध्ये यायची, कदाचित नाष्टा बनवत असेल त्याच वेळी ती गाणे गुणगुणत असायची.

तिचा आवाज ऐकून मी रोज कामाला जायचो. संध्याकाळी मी जेव्हा कामावरून यायचो तेव्हा ती किचन मध्येच असायची नक्कीच ती तिची जेवण बनवण्याची वेळ असणार. साधारण दहाच्या सुमारास तिच्या घराचे दिवे विझायचे आणि ती तिच्या झोपण्याची वेळ आहे असे अंदाज लावत बसायचो मी. मला कळत नव्हते मी का तिच्यासाठी इतका वेडा झालो आहे? का मला सतत तिच्यातच गुंतून रहायला आवडते? तिच्या शिवाय दुसऱ्या कशाचाही का विचार येत नव्हता मला? खूप वाटायचे ती गेलेरी मध्ये येईल आणि आमची नजरा नजर होईल आणि तेव्हा तरी मला तिच्या सोबत बोलता येईल.

मी निमित्त ही शोधून ठेवले होते तिच्या सोबत बोलण्याचे….. नवीन आल्या आहात का? पण ती कधी गेलेरीमध्ये यायचीच नाही. येत असेल तेव्हा मी घरी नसेल कदाचित. दिवळीच्या सुट्ट्यांमुळे कामाचा लोड खूप वाढला होता. त्यामुळे बरेच दिवस सुट्टीच मिळाली नव्हती. साधारण महिनाभराने मला रविवारची सुट्टी मिळाली.

सकाळी जेव्हा मी गेलेरी मध्ये आलो तेव्हा मी पाहीले तिने कुंड्या आणल्या होत्या. आणि त्यात ती सुंदर सुंदर फुलांची रोपे लावत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कि, ती माझ्या समोर आहे जिला पाहण्यासाठी मी रोज तासंतास इथे उभा असतो. तेव्हाही तिचे माझ्याकडे लक्ष नव्हते. त्यानंतर काय मग रोज झाडांना पाणी घालायला यायची तेव्हा रोज मला तिला पहाता यायचे.

पण, मी पहायचो ती त्या रोपांसोबत गप्पाही मारायची मला आश्चर्य वाटायचे हसू ही यायचे कधी कधी वाटायचे ही वेडी तर नाही ना? रोज वाटायचे या निमित्ताने तरी बोलावे तिच्या सोबत पण हिंमतच व्हायची नाही…..

 

दिवसा मागून दिवस जात होते मी रोज तिला पहायचो पण, स्वतःहून तिच्याशी बोलण्याची हिंमत काही झाली नाही. मग एक दिवस माझी आई माझ्याकडे रहायला आली. आई तशी कमी शिकलेली पण, व्यवहार ज्ञान खूप होते तिला.

माणसाची पारख करण्यामध्ये तिचा कोणीही हात धरू शकत नव्हत. बोलकी तर एवढी कि, एखाद्या मुक्याला ही बोलायला लावेल. आई आल्यापासून मी गेलेरीमध्ये जरा कमीच जाऊ लागलो.

एके दिवशी मी आंघोळीला गेलो असताना आईच्या बडबडण्याचा आवाज येऊ लागला. ती इतक्या मोठ्याने बोलत होती कि, मला वाटले ती माझ्या सोबतच बोलत आहे, म्हणून मी वेड्या सारखा बाथरूम मधूनच काय, काय झाल?…. म्हणून ओरडत होतो. तिचा आवज मला अस्पष्ट येत होता त्यामुळे मी पटापट आंघोळ आटोपली आणि बाहेर आलो आणि आईच्या आवाजाच्या दिशेने गेलो.

आई गेलेरीमध्ये कोणाशी तरी बोलत होती. मी तिला म्हणालो आई गं … काय हे ? किती मोठ्याने बोलतेस मला वाटल मलाच काहीतरी बोलत होतीस. किती घाई घाईमध्ये अंघोळ आटोपली मी. बोलत बोलत मी गेलेरीमध्ये गेलो आणि पहातो तर काय आई तिच्या सोबतच बोलत होती. त्यावेळी पहिल्यांदा तिची आणि माझी नजरानजर झाली.

आई माझ्याकडे पाहून म्हणाली, झाली होय अंघोळ तुझी? आणि मग तिला म्हणाली हा माझा मुलगा, इथे पुण्यातच नोकरी करतो. आम्हाला काय शेती भाती मूळ गाव सोडून येता येत नाही त्यामुळे एकटाच रहातो हा इथे, बर चल त्याला कामाला जायचे आहे चहा-नाष्ट्याच बघते त्याच्या. तुझी काम आवरली कि ये इकडे. ती हो, म्हणून घरत निघूनही गेली आणि मी मात्र तिथेच भान हरवल्यासारखा उभा होतो तिच्या गेलेरीच्या दिशेने पहात.

आईने पुन्हा मला तिच्या कोल्हापुरी आवाजात जोरदार आवाज दिला अभ्या चल कि रे ……..आणि मी भानावर आलो. मग काय मी घरात आलो आणि आईला तिच्या बद्दल विचारू लागलो. मला ठाऊक होते तरी मुद्दाम आईला म्हणालो, कोण होत्या त्या? नवीन आल्या आहेत का? आई म्हणाली, हो दिवाळीतच आली वाटत. आपल्या कोल्हापुरचीच आहे चांगली वाटते पोरगी.

कोल्हापूरची मानसच लय मायाळू. मग आई तिच्याबद्दल मनसोक्त बोलत राहिली आणि मी मन लावून ऐकत राहिलो.दहा वाजून गेले होते माझी ऑफिसची वेळ झाली आणि मी ऑफिसला गेलो.

संध्याकाळी घरी आलो तेव्हा आई म्हणाली, अभी चहा ठेऊ का तुझ्यासाठी? बिचारी आई दिवसभर घरातील सर्व कामे तिनेच केली  होती जरा थकल्या सारखी वाटत होती तरीही मी आल्यावर ती मला चहा विचारात होती मलाच वाईट वाटले मी म्हणालो, नको राहूदे तू बस मीच बनवून आणतो चहा आपल्या दोघांसाठीही.

थकली असशील ना? असा चहा बनवतो कि, तू एकदम फ्रेश होऊन जाशील. आई म्हणाली, मला नको बाळा चहा, मी घेतला आहे मघाशीच ती उर्मिला आली होती ना, तिच्यासोबत माझा ही झाला. मी म्हणालो, आता ही उर्मिला कोण? आणि काय तू कोणालाही घेऊन बसतेस घरात. गाव नाही आई हे शहरात असे पटकन कोणावर विश्वास ठेवायचा नसतो.

एकतर मीही नसतो दिवसभर घरी. मी बोलत बोलत कपडे चेंज करून बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो. आई म्हणाली, नाही रे अभ्या पोरगी खूप चांगली आहे. आणि लांबची कुठली इथेच तर रहाते आपल्या बाजूच्या घरात. सकाळी नाही का, मी तिच्यासोबत बोलत होते तीच आली होती. बिचारी खूप वाईट झालं  तिच्यासोबत. मी तोंडावर पाणी मारत होतो आई अशी म्हणाल्या बरोबर स्तब्ध झालो आणि पटकन तोंड पुसतच बाहेर आलो.

आणि तिच्याबद्दल जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असूनही आईला दाखवण्यासाठी सहजच विचारत आहे अश्या स्वरात म्हणालो, का गं झाल? आई म्हणाली, अरे आई-वडील नाहीत तिला, मामानीच लहानाची मोठी केली आणि ओझ कमी करण्यासाठी म्हणून त्या कसायाच्या दावणीला बांधली. खूप मारहाण करतो नवरा तिला.

दिसायला देखणी आहे म्हणून, संशय पण, घेतो तीच्यावर. चार-चार दिवस तिला सोडून निघून जातो कुठे ही. तिला बिचारीला कुठेही जाऊ येऊ देत नाही आणि जायचं म्हणलं तरी कुठे जाईल बिचारी कोण आहे तीच या जगात.

आई-वडील असते म्हणजे त्यांच्याकडे तरी गेली असती. एखाद्याच नशिबाच खराब बघ. अस म्हणून आई चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली. आणि मी विचार करत बसलो.
त्यानंतर बरेच दिवस आई माझ्याकडेच होती तेव्हा उर्मिला नवरा नसेल तर आईकडे येऊन बसायची. काही दिवसांनी आई गावी निघून गेली. जाताना आईची फार तगमग होत होती उर्मिलाला भेटण्यासाठी पण, त्यादिवशी नेमका तिचा नवरा घरी होता. त्यामुळे आईला तिला भेटता आले नाही.

दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि मी नुकताच झोपेतून उठलो होतो आणि दारावर बेल वाजली. मी दरवाजा उघडला दरवाजामध्ये उर्मिला हातामध्ये एक प्लेट घेऊन उभी होती. तिच्याकडे पाहून माझी झोपच उडाली. मी काही म्हणण्या आधी तीच म्हणाली आई? मी अडखळतच म्हणालो, आई कालच कोल्हापूरला गेली.

ते ऐकून तिचा बिचारीचा चेहराच पडला. म्हणाली, हो का, बरं आता पुन्हा कधी येणार? मी म्हणालो, काही कल्पना नाही पण येईल लवकरच. त्यावर ती म्हणाली अच्छा ठीक आहे.

हातातील प्लेट माझ्याकडे करून म्हणाली, ही तुमची प्लेट त्यादिवशी आईनी भरलेली वांगी दिली होती. मी तिच्या हातातून ती प्लेट घेतली आणि ती निघून गेल्यावर दरवाजा लाऊन आत आलो. प्लेट खोलून पाहिली तर तिने त्यात छान साजूक तुपातला शिरा दिला होता.

मला शिरा पाहून रहावल नाही. खरतर तिच्या हातची चव पहाण्यासाठी मी आतुर झालो होतो त्यामुळे मी पटापट आंघोळ केली आणि शिरा गरम करून खायला घेतला. ती मला आवडायची म्हणून नाही पण, खरच असा शिरा मी या आधी कधीही खाल्ला नव्हता.

चला यावरून एक गोष्ट तर लक्षात आली कि, ‘’दिसायला सुंदर असणारी ती सुगरण पण आहे’’. तिच्या हाताचा शिरा खाऊन मी आणखीनच तिच्या प्रेमात पडलो होतो. मला तिला आवर्जून सांगावेसे वाटत होते कि, शिरा फार छान झाला होता. पण, ती दिसायचीच नाही.
काही दिवस गेल्यावर दिसली झाडांसोबत गप्पा मारत होती येडी मी तिला पाहून हसत होतो तितक्यात तिने ही माझाकडे पाहीले आणि हसली. म्हणाली. मला आई कशा आहेत? मी म्हणालो हो छान आहे तिच्याच सोबत बोललो आता. तीही विचारत होती तुम्हाला. येणार आहे पुढच्या महिन्यात. ते ऐकून खूप खुश झाली वेडी. मग मी म्हणालो, शिरा छान झाला होता त्यादिवशीचा. ती म्हणाली, आवडतो का तुम्हाला शिरा पुन्हा करेन तेव्हा नक्की देईन.

असे मग रोज थोडे थोडे बोलणे चालूच होते आमचे. पण, जेव्हा जेव्हा तो दानव असायचा तेव्हा तेव्हा ती घरातून बाहेरच यायची नाही.पुन्हा एका रात्री तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला काय करू काहीही कळत नव्हते तिच्या किंचाळ्या ऐकून रहावत ही नव्हते. तिच्या आणि माझ्या घरामध्ये फक्त एका भिंतीचे अंतर असल्याने मला तिचे ओरडणे स्पष्ट ऐकू यायचे. शेवटी मी गेलेरीमध्ये गेलो आणि तिच्या

गेलेरीच्या खिडकीवर काठीने जोरजोरात ठोकू लागलो. त्या आवाजाने पुन्हा तो दानव शिव्या देत गेलेरीकडे आला. त्या वेळे मध्ये कदाचित ती कुठे तरी लपून बसली असेल कारण, त्यानंतर बराच वेळ तिच्या घरातून दरवाजा वाजवण्याचा आवाज येत होता.

तो तिला शिवीगाळ ही करत होता. बराच वेळ दरवाजा वाजत राहिला पण, तिचा आवाज काही येत नव्हता. काही वेळाने मग सर्व शांत झाले आणि मीही झोपून गेलो. सकाळ झाली मी आंघोळ करून बाहेर आलो दारावर बेल वाजत होती पटकन दरवाजाकडे गेलो.

उर्मिला आली होती तिच्या हातात त्यावेळी ही प्लेट होती आणि त्यावेळी तिने तिच्या चेहऱ्याची एक बाजू पदराने लपवली होती. मी प्लेट घेतली आणि म्हणालो, अरे वा शिरा आणलात? काय मस्त वास येत आहे. या ना आत मी आलोच हां प्लेट रिकामी करून आणतो. ती थोडी आत आली मी प्लेट मधून शिरा काढून घेतला आणि प्लेट धुवून बाहेर आलो.

ती तशीच उभी होती मी म्हणालो, बसा ना चहा घेणार? ती नको म्हणाली मी आग्रह केला प्लीज घ्या ना. मी स्वतः बनवला आहे ती म्हणाली खरच नको. मी विचारले मिस्टर आहेत का घरी? ती म्हणाली, नाही. मी तिला फार आग्रह केला कारण मला तिच्या सोबात बोलायचे होते.

माझे तिच्यावर प्रेम आहे हा विचार बाजूला ठेऊन एक माणूस म्हणून मला तिच्या सोबत बोलायचेच होते. मी फारच आग्रह केल्यावर ती घरात आली आणि सोफ्यावर येऊन बसली, मी आत गेलो आणि आमच्या दोघांसाठीही चहा घेऊन आलो. बोलण्याची कुठून तरी सुरुवात करावी म्हणून मी म्हणालो, आज शिरा केलात काही विशेष आहे का? ती म्हणाली हो विशेषच आहे.

मी म्हणालो काय? ती म्हणाली काही नाही असेच. मी म्हणालो, बर नका सांगू चहा घ्या ना थंड होतोय. तिने चेहऱ्या वरचा पदर बाजूला केला आणि चहाचा कप तोंडाला लावणार तितक्यात मी पाहिले आणि अक्षरशः हादरलो तीच्या ओठाच्या कोपरऱ्यावर कसली तरी जखम झाली होती.

जखम ताजीच होती मी विचारले काय झाल, काय लागलं आहे? ती म्हणाली काही नाही निघते मी आणि ती उठून उभी राहिली. मी कसा काय माहित पण, माझा तिच्यावर हक्क असल्यासारखा ओरडलो तिच्यावर. बसा तिथे शांत कुठे चालल्या, का सहन करता एवढे ? ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली.

मी म्हणालो, होय मला माहित आहे सारं, आई बोलली मला तुमच्या बद्दल. सोडून का नाही देत त्याला? लग्न केले आहे विकत तर नाही घेतले ना त्याने तुम्हाला. ती म्हणाली, सोडता आले असते तर केव्हाच सोडले असते आणि सोडलेच तर जाणार कुठे? मी पटकन म्हणालो, आमच्या घरी, माझ्या घरी फक्त माझे आई बाबा असतात आईलाही मुलीची फार हौस होती. तसेही तुमची फार काळजी वाटते तिला तुम्ही तिच्याकडे गेलात तर स्वतःच्या मुली प्रमाणे संभाळेल तुम्हाला ती.

त्यावर ती हसली आणि म्हणाली, कशाला कोणाला त्रास? आई कधीतरी येतात मला जीव लावतात तेच खूप आहे माझ्यासाठी. माझे काय पाच वर्षे झाली हे असेच चालू आहे मला सवय लागली आहे आता या सर्वाची. जोवर सहन होत आहे तोवर सहन करायचं ज्या दिवशी सहनशक्ती संपेल त्या दिवशी……आणि ती बोलता बोलता थांबली.

तिला काय बोलायचे होते मी समजून गेलो. तिच्या सोबत आजवर जे काही झाले होते त्याच्यामुळे ही निगेटीव्हीटी आली असणार हे मी समजून गेलो. तिला कसे समजावू मलाही काळात नव्हते त्यामुळे थोडावेळ मी शांत झालो……

त्यानंतर मग चहा घेत घेत आम्ही थोड्या गप्पा मारल्या बोलता बोलता मी घरात गेलो आणि तिच्या जखमेव लावण्यासाठी औषध घेऊन आलो. औषध दिले तिला आणि लावायला सांगितले. ती हसली आणि म्हणाली जखमांचे लाड नाही करत मी नाहीतर त्यांना आणखी माझ्याजवळ येण्याची आस लागेल.

मला अचानक मन भरून आल्यासारखे वाटले. तिच्या बोलण्यातून इतक्या वेदना येत होत्या कि मलाच सहन होत नव्हते ते. मी औषध तिच्या हातावर ठेवले आणि म्हणालो, मला काही माहित नाही आधी औषध लावा.

तिने औषध घेतले माझ्या हातातून आणि अचानक तिचे डोळे भरून आले. मला काय करावे सुचतच नव्हते वातावरण बद्लावाण्यासाठी आणि तिला हसवण्यासाठी मी मुद्दाम तिला म्हणालो, आता काय झाले रडायला? आठवण येते का नवऱ्याची? ती माझ्याकडे पाहून हसू लागली. मग, मी म्हणालो मूर्ख माणूस आहे तो.

मारू काय त्याला पोत्यात घालून संध्याकाळी पिऊन येतो तेव्हा पोत्यात घालतो आणि मारतो चांगला. म्हणजे उठणारच नाही जागचा. ती हसली आणि म्हणाली, काही नको जागेवर राहिला तर मग मलाही जागेवरच रहाव लागेल. चालतो फिरतो म्हणून निदान चार-चार दिवस बाहेर तरी जातो.

तेवढाच मला मोकळा श्वास घेता येतो. मी म्हणालो, हो तेही आहे पण आता कुठे गेला आहे तो, आणि इतके दिवस जातो तरी कुठे? बघा नाही तर दुसरे लग्न-बिग्न केले नाही ना त्याने? त्यावर ती म्हणाली हो दोन मुलेही आहेत त्यांना. ते ऐकून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिला काय बोलू त्या पुढे मला काहीही कळत नव्हते.

तरीही मी म्हणालो, कसा असा मामा आहे तुमचा, लग्न झालेल्या पुरुषासोबत कसा काय लग्न लावून देऊ शकतो तो तुमचे? त्यावर ती म्हणाली, मामांना नव्हते माहित त्यांचे लग्न झालेले जेव्हा कळाले तेव्हा फार उशीर झाला होता. आणि एकदा लग्न झाल्यावर कळून तरी काय करणार? त्याला काही बोलतील तर पुन्हा मी त्यांच्याच गळ्यात पडले असते ना, कसे बोलतील मग काही. मला तिच्या नशिबाचे फार वाईट वाटत होते तिच्यासाठी काय करता येईल याचाच विचार करत होतो मी .

त्यावेळी तरी माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नव्हते. मी शांत झालो. ती म्हणाली, बर येते आता मी आता बराच वेळ झाला आहे. कोणी पाहीले तर उगीच चुकीचा अर्थ लावतील. तिचे बोलणे ऐकून मात्र मी वैतागून म्हणालो, लावू दे काही फरक पडत नाही मला.

तुम्ही रात्र रात्र भर मार खात असता तेव्हा कोण येते वाचवायला तुम्हाला. सगळे दरवाजा बंद करून झोपून जातात. त्यावर ती म्हणाली, तुम्हाला कसे माहित सगळे झोपलेले असतात दरवाजा लावून? मी गप्प झालो तर तीच म्हणाली कारण तुम्ही जागे असता हो ना? खरतर शिरा करण्याचे हेच कारण आहे.

मला माहित आहे काल रात्री तुम्हीच आमच्या गेलेरेची खिडकी वाजवली. तुम्ही तसे केले नसते तर आणखी मार पडला असता मला. मी हसून मान डोलवली. ती म्हणाली त्या दिवशीही तुम्हीच बेल वाजवली होतीत का? मी पुन्हा मान डोलवली आणि आम्ही दोघेही हसू लागलो.

मग मी तिला विचारले, पण मी रात्री बेल वाजवली त्यानंतर तुमचा आवाज येणे बंद झाले आणि तो दरवाजा वाजवत होता कुठे होतात तेव्हा तुम्ही. ती पुन्हा हसली आणि म्हणाली, बाथरूम मध्ये दरवाजा लावून बसले होते.

मी म्हणालो, अरे वा मस्त आयडिया आहे कि मग इथून पुढे तो आला कि दरवाजा खोलायचा आणि धावत जाऊन बाथरूम मध्ये लपून बसायचं. ते ऐकून ती खूप हसली आणि हसता हसत रडू लागली. म्हणाली, शेवटची कधी हसले होते इतकी आठवत ही नाही.

आणि आता पुन्हा कधी हसेन कि नाही हे ही माहित नाही. मी म्हणालो, का बर…? हसण्यावर बंदी आहे का काय तुमच्याकडे? दात आपले आहेत आणि मर्जीही आपली जेव्हा कधी मन करेल तेव्हा मनसोक्त हसून घ्यायचं.

मी सोबत असेन तर अश्याच हसत रहाल. आणि मी तरी आता इथून कुठेही जाणार नाही जेव्हा कधी वाटेल तेव्हा इथे यायचं घर तुमचच आहे आणि मनसोक्त हसून जायचं ते ही निशुल्क…… ती हसली आणि म्हणाली हमम…बरं जाऊ का आता तरी ? मी म्हणालो, येऊ का म्हणाव.

ती पुन्हा हसली आणि म्हणालो हो आजोबा येते हा…..मग मी ही गंमतीने म्हणालो यायचंच असेल तर जाता कशाला आजीबाई ….ते ऐकून ती हसत हसतच घराबाहेर पडली….

पुढे-पुढे मग अधून मधून उर्मिला काही ना काही बनवून घेऊन यायची मला खाऊ घालण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही दोघेही तासंतास गप्पा मारत बसायचो. काही दिवसांतच मग आमच्यात छान मैत्री झाली, आणि मग काय, मी तिच्यासाठी अभीजीत चा अभी आणि ती माझ्यासाठी उर्मिलाची उर्मी ही झालो.

तिला तिच्या घरापेक्षा माझ्या घरी जास्त छान वाटू लागले. खूपदा वाटायचे तिला सांगून टाकावे कि, मला ती खूप आवडतेस आणि मला तुझ अस फक्त एक दोन तासांसाठी माझ्याकडे येणे नाही आवडत, आता तू मला माझ्या आयुष्यभरासाठी हवी आहेस.

पण, हिंमत केले नाही कारण वाटायचे मी असा काही बोललो आणि तिला ते आवडले नाही तर, ती माझ्या सोबत बोलणे बंद करेल आणि पुन्हा तिच्या घराच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेईल.

विचार फक्त तिचाच नव्हता, खर सांगायचे तर तिच्या जाण्याने मीही खूप एकटा पडेन तिच्या जाण्याने याचीही भीती वाटत होती मला. आणि त्या एकटे पणाचा विचारही मला सहन होत नव्हता.

जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी असायचा तेव्हा मात्र आम्हाला एकमेकांना पाहता ही यायचे नाही ती वेळ मी कशी घालवायचो माझे मलाच माहित. उर्मी ला माझे ड्रिंक्स करणे आवडायचे नाही तिच्या समोर नाहीच घ्यायचो मी कधी.

पण, ज्या दिवशी तो दानव घरी यायचा माझे पाय आपसूकच वाईनशोप कडे वळायचे. तो घरी असलेली रात्र माझ्या अंगावर यायची. मनात नाही नाही ते विचार यायचे. जरा जरी कशाचा आवाज झाला तर मी दचकून जागा व्हायचो.

वाटायचे तो तिच्यावर जबरदस्ती तर नसेल करत ना? तो तिला मारत तर नसेल ना? सकाळी गेलेरी मध्ये जाऊन पहायचो ती दिसते का. दिसली कि, विचारायचो महेश आहे कि गेला? मग ती खुणावून सांगायची आहे किंवा नाही ते.

आणि मग तिथून पुढे माझा दिनक्रम चालू व्हायचा. मला आठवत पावसाळ्याचे दिवस होते. ऑफिस वरून येताना मी फार भिजलो होतो. मला कांद्याचे भजी खाण्याची फार इच्छा झाली होती. पण पाऊस खूप असल्याने मला भजी घेण्यासाठी कुठे थांबताच आले नाही.

मी घरी आलो, ओले कपडे बदलले आणि फ्रेश होऊन हॉल मध्ये आलो. तितक्यात दारावर बेल वाजली मी दरवाजा उघडला उर्मी आली होती ते ही गरम गरम कांदा भजी घेऊन. भजी पाहून मला आश्चर्य वाटले, मला कळायचंच नाही तिला माझ्या मनातील सर्व गोष्टी कशा कळायच्या ते.

मीही मग चहा बनवायला गेलो. चहा घेऊन आलो आणि आम्ही दोघेही भाज्यांचा आस्वाद घेत छान गप्पा मारत होतो. मी तिला म्हणालो आज खूप भिजलो मी काय मज्जा आली माहित आहे. त्यावर ती म्हणाली, मला पण खूप भिजावस वाटत रे.

मी म्हणालो हो का काही नको आजारी पडशील. ती म्हणाली, नाही काही होत चल ना भिजूया. मी म्हणालो, चल ना काय? बरी आहेस ना? आधीच भिजून आलो होतो मी आता कुठे कपडे चेंज केल तर बर वाटल. नाही तर नुसती चिक चिक झाली होती.

मग नाही काही बोलली ती जरा शांत मात्र झाली. मलाच कस तरी वाटल मी गेलेरीमध्ये गेलो, धोधो पाऊस पडतच होता मी पावसात उभा राहून तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, ए वेडी ये…. ती आनंदाने उठली आणि गेलेरीकडे येऊ लागली गेलेरीत येऊन पावसाच्या सरी ती अंगावर झेलत असताना अगदी एखाद्या लहान मुली प्रमाणे भासत होती.

अगदी निरागस, बालिश तिचे हे रूप मी पहिल्यांदाच पाहिले होते. त्या आनंदात तिला कशाचेही भान नव्हते. मीही तिच्यात अगदी हरवून गेलो होतो. आणि तितक्यात माझी नजर खाली गेली. ती माझ्या सोबत बोलत पुढे येत होती.

मी पटकन तिला पकडले आणि घरात घेऊन गेलो आणि म्हणालो उर्मी घरी जा. तिला काय झाले ते कळत नव्हते, आणि मला सांगता येत नव्हते कारण मी ही पुरता हादरून गेलो होतो. ती मला म्हणाली नाही नको ना, आणखी भिजायचे आहे मला.

मग स्वतःळा सावरत मी म्हणालो, अगं गधडे महेश आला आहे. मी आत्ताच त्याला खाली पाहीले आहे. घरी जा पटकन. ते ऐकून उर्मी प्रचंड घाबरली आणि घरी जाऊ लागली.

ती घरात जाई पर्यंत मी बाहेरच होतो भीतीने तिचे अंग थरथरत होते, तिला घराचे लॉकही उघडता येत नव्हते. त्यावेळी महेशच्या पावलांचा आवाज आणखी स्पष्ट येऊ लागला. मी तिला बोलत हळू आवाजात बोलत होतो. घाबरू नको शांत हो आणि खोल दरवाजा.

तिला काही ते जमत नव्हते. मी पटकन गेलो आणि तिला दरवाजा खोलून दिला आणि ती घरात गेली. हुशssss फार भयानक वेळ होती ती. थोडा जरी उशीर झाला असता तर ऊर्मीचे काही खरे नव्हते. ती रात्र ही मी तिच्याच विचारात जागून काढली.

मी सतत तिच्या घराचा कानोसा घेत होतो. महेश इतक्या अचानक आला होता तिला कपडे चेंज करायला ही वेळ मिळाला नसणार. काय सांगितलं असेल तिने त्याला.

खोट बोलता येईल ना तिला? त्या दिवशी मी मनाशी पक्क केल होत आज जर त्याने तिला मारले तर गप्प बसायचं नाही. सरळ जायचं आणि त्याला मारायचं. मग, जे होईल ते बघता येईल.

पण, सुदैवाने तिचा आवाज आला नाही. दुसऱ्या दिवशी मी गेलेरी मध्ये गेलो ती झाडांना पाणी घालत होती. मी तिला विचारले आहे कि गेला. ती म्हणाली, गेला मी म्हणालो काम झाली? ती हो म्हणाली, मग मी तिला घरी बोलावलं. ती येते म्हणाली पण आली नाही. मग न राहून ऑफिसला जाता जाता मीच तिच्या घरी गेलो.

मला पाहील आणि ती मला म्हणाली, अभी जा तू इथून मला एकट रहायचं आहे. मी खूप विचारले काय झाले? पण, ती काही सांगता नव्हती. आणि दरवाजा ही खोलात नव्हती. मी दरवाजा ढकलून आत गेलो.

काय झाल आहे सांगत का नाही येत तू तो काही बोलला का? ती म्हणाली नाही काही बोलला रे तू जा पाहू कामाला. संध्याकाळी येते मी घरी. आता नाही येणार तो आठ दिवस तरी. मी बर ठीक आहे येतो मी म्हणून निघालो.

पण, माझा पाय निघत नव्हता, का काय माहित? पण उर्मी माझ्या पासून काहीतरी लपवत आहे असे वाटत होते मला. मी थांबलो आणि तिच्याकडे पाहून म्हणालो उर्मी ठीक आहेस ना? मी असे म्हणाल्या बरोबर तिचे डोळे पाण्याने भरले आणि ती ठीक आहे म्हणून दरवाजा लावू लागली. मी पुन्हा दरवाजा ढकलून गेलो आणि म्हणालो, सांग ना काय झाले? माझा जीव नाही लागणार.

तुला शप्पत आहे माझी प्लीज सांग… मी असे बोलल्या बरोबर ती पाठमोरी झाली. आणि मला तिच्या पाठीवर भाजल्याच्या जखमा दिसू लागल्या. ते पाहून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली.

मी तिला विचारले हे काय आहे? त्यावर ती म्हणाली, काल काही क्षण मनसोक्त जगल्याची शिक्षा. त्या नराधमाने तिला सिगार चे चटके दिले होते. ती बाहेर जाऊन आल्याच्या संशयावर. त्या दिवशी मी कामावरच गेलो नाही. खाली जाऊन तिच्यासाठी औषध घेऊन आलो.

पाठी पर्यंत हात जाणार नाही म्हणून मी तिला विचारले मी देऊ लाऊन औषध? ती हो म्हणाली, औषध लावताना माझे हात अक्षरशः थरथरत होते. औषध लाऊन झाल्यावर मी तिला विचारले त्याने चटके दिले तरी तुझा आवाजही आला नाही का? त्यावर ती म्हणाली, कारण मला ठाऊक होते तू जागा असणार.

आणि तुझे सगळे लक्ष माझ्याकडेच असणार म्हणून. आणि काल जर तुला माझा ओरडण्याचा आवाज आला असता तर तू स्वतःला अडवू शकला नसतास हेही मला ठाऊक होते. ते ऐकून मला आणखीनच आश्चर्य वाटले.

मी विचारले तिला कशावरून तुला असे वाटले. ती हसली आणि म्हणाली, किती वेळा सांगू अभी तुला, ओळखू लागली आहे मी तुला चांगलीच. बोलता बोलता मी तिला बोलून गेलो इतक बरोबर तर माझी आई ही नाही ओळखत माझ्या बाबांना.

तिला माझ्या बोलण्यातील अर्थ कळाला असावा कदाचित ती शांत झाली आणि किचनमध्ये गेली. मी ही तिच्या मागे गेलो म्हणालो उर्मी काय झाल? बोलना… अशी शांत नको राहू. भीती वाटते मला या शांततेची.

ती म्हणाली मग काय करू अभी? जाऊदे अभी तू जा आता घरी माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही. मी म्हणालो पण माझ्याकडे आहे आणि आज तुला ते ऐकावेच लागेल. ती म्हणाली, नाही अभी प्लीज काही बोलू नको.

मी चिडलो आणि तिला माझ्याकडे वळवून म्हणालो अगं पण का ? त्यावर ती रडू लागली आणि म्हणाली. मला नाही स्वतःला अडवता येणार या सगळ्यात गुंतण्यापासून. मला आधीच खूप सवय लागली आहे तुझी.

तुझ्या माझ्या नात्याला समाज मान्यता देणार नाही. तुझ्यात जेवढी गुंतेन तेवढा त्रास होईल बाहेर पडताना. मी म्हणालो, कशाला बाहेर पडायचं आहे? मी कायम तुझाच राहीन अगदी जीवात जीव असे पर्यंत.

तिने माझ्याकडे पाहीले आणि म्हणाली, कोणत्याही नात्याशिवाय? मी म्हणालो, नाते असेल ना उर्मी प्रेमाचं नात. ती म्हणाली, नको अभी सहन नाही होणार तुला तू जिच्यावर प्रेम करत आहेस तिला दुसऱ्या सोबत राहू देण.

मी म्हणालो तिला, नाही राहू देणार मी तुला त्याच्या सोबत. तिला माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला नव्हता ती म्हणाली म्हणजे. मी म्हणालो लग्न करू आपण. ते ऐकल्या बरोबर तिच्या डोळे पाण्याने भरले आणि ती म्हणाली.

नको अभी मी उष्टावळ आहे कोणाची तरी. मी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणालो मला तुझ्या भूतकाळाशी काहीही देणे घेणे नाही. मला फक्त इतके कळत आहे कि, तू आता फक्त माझी आहेस. ते ऐकून ती पटकन मला बिलगली.

तो दिवस १५ मे, सकाळी दहाच्या सुमारास आम्ही एकमेकांकडे व्यक्त झालो.

माझ्या आयुष्यातील सर्वात छान दिवस होता तो. संपूर्ण दिवस मी तिच्याकडेच थांबलो. त्यादिवशी मी तिच्यासाठी जेवणही बनवले. तिला पूर्ण दिवस आराम द्यायचा होता मला. पण तीचा जीव राहील तर ना. मी तिला आराम करायला सांगूनही दर पाच मिनिटांनी यायची आणि बोलायची. अभी हो ना बाजूला मी बनवते ना जेवन जखम माझ्या पाठीला आहे हाताला नाही.

आणि मी तिला पुन्हा किचन मधून बाहेर काढून द्यायचो. जेवणाची ताट लावून झाल्यावर मी तिला बाहेर बोलावले. पण ती काही ओ देत नव्हती मग मी तिच्या रूम मध्ये गेलो. पाहतो तर काय छान समाधानाने झोपली होती ती. झोपलेली असताना एखाद्या गोंडस बाळा प्रमाणे दिसत होती.

मी पहातच राहिलो तिच्याकडे. अस वाटत होत कि, या आधी इतक्या समाधानाने कधीही झोपली नसेल ती. त्या दिवशी मनाशी ठरवून टाकले होते मी उर्मीच्या आयुष्यातून हे समाधान मी कोणत्याही किंमतीवर जाऊ देणार नाही. मी तिला आयुष्यभर इतकीच खुश ठेवेन.

मी तिच्याजवळ जाऊन बसलो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणालो, उर्मी ….उठतेस ना. तिने डोळे उघडले माझ्याकडे पाहीले हसली आणि माझ्या मांडीवर डोक ठेऊन बालिश पणे म्हणाली, झोपु दे ना आणखी थोडा वेळ. मी म्हणलो, हा झोप पण, आधी थोडे जेवण कर आणि येऊन झोप, मग नाही उठवणार मी तुला.

ती उठली आणि फ्रेश होऊन जेवायला आली. मी मला जेवण वाढून घेतलं आणि तिला विचारलं काय वाढू तुला? मला नाही वाढता येत नीट तुला जे हव ते घे. ती बसली आणि स्वतःच ताट बाजूला ठेऊन बोलली मला तुझ्या ताटातच खायचं आहे. मला खूप छान वाटल मी ताट पुढे केले आणि म्हणालो, हो खा ना. तिने पहीला घास उचलला आणि मला भरवला.

मग मीही भरवले तिला. त्यावेळी सगळ्या जगाला विसरून गेलो होतो आम्ही. असे वाटत होते आम्ही नवरा बायको आहोत. दिवस खूप छान गेला. संध्याकाळी मी खाली गेलो आणि तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलो.

थोडा वेळ बसलो आणि तिला झोपवून घरी जाऊ लागलो. तसा तिने माझा हात पकडला आणि म्हणाली नको जाऊ ना प्लीज. मी थांबलो रात्रभर मनसोक्त गप्पा मारल्या आम्ही. एकमेकांच्या आवडी निवडीही कळाल्या त्या दिवशी. तिला बाग सजवायला फार आवडते हे कळल्यावर ती झाडांसोबत गप्पा मारते हे माझ्या लक्षात आले आणि त्या बद्दल मी विचारले तिला.

तेव्हा तीच्याकडून मला नवीनच गोष्ट कळली तिचे म्हणणे होते कि, झाडांसोबत बोलत राहिले कि, ती आणखी बहरतात आणि आपली होऊन जातात. आपल्याला भरपूर फुले आणि फळे देतात.

आणि त्यांच्यात छान टवटवी येते. अगदी माझ्या सारखी, तू माझ्या आयुष्यात आल्यापासुन आणि आपण एकमेकांशी बोलायला लागल्या पासून मी कशी छान राहू लागले अगदी तसेच. मी पाहतच राहिलो तिच्याकडे, मनात विचार आला कशी राहिली असेल इतकी बोलणारी ही इतके दिवस या कोंडवाड्या मध्ये.

मध्य रात्र झाली बोलत बोलत काही अंतरावर मी तिच्या बाजूला झोपलो. त्यादिवशी मला तिच्याकडून कळाले लहान असताना ती तिच्या आईचा हात उशाला घेऊन झोपायची. ते ऐकून मी माझा हात पुढे केला आणि म्हणालो, त्यात काय एवढ माझा हात कशासाठी आहे? तीने लगेचच तिचे डोके माझ्या हातावर ठेवले. काही वेळाने माझ्या हाताला ओल जाणवली मी तिच्याकडे पाहिले तर रडत होती ती.

मी विचरले काय झाले राजा? तर म्हणाली, कायम असाच रहा. तिचे ते शब्द ऐकून मला ही भरून आले. मी माझे ओठ तिच्या माथ्यावर टेकवले आणि तिला विश्वास दिला मी आयुष्यभर असाच राहीन….काही वेळाने म्हणाली, अभी काही दिवसां पूर्वी पर्यंत माझ्या आयुष्यात जे काही घडत होते त्यामुळे पुरुष या जातीचा अक्षरशः तिरस्कार करू लागले होते मी.

आज पर्यंत मारहाण करणारा, माझ्यावर हक्क गाजवणारा, माझ्या शरीराचे हवे तसे लचके तोडणारा पुरूषाच मला माहित होता. आज पहील्यांदा कोणा पुरुषाच्या कुशीत एवढं सुरक्षित वाटत आहे. अस वाटत ही रात्र कधी संपूच नये.

महेश आठ दिवस येणार नव्हता त्यामुळे आम्ही दोघेही निश्चिंत होतो. ते दिवस आम्ही एकत्रच रहात होतो. ती रोज सकाळी माझ्या कुशीतून कधी उठून जाऊन माझ्यासाठी नाष्टा जेवण बनवायची मला कळायचेही नाही. मी ऑफिसला जाण्याच्या बरोबर दोन तास आधी मला प्रेमाने उठवायची. बेडवरच चहा आणून द्यायची.

माझ्या आंघोळी साठी पाणी काढून द्यायची. एखादी बायको करेल ते सर्व आनंदाने करायची ती माझ्यासाठी. मलाही वाटत होते हे दिवस कधी संपूच नयेत. फार खुश होतो आम्ही दोघेही. दोन तीन दिवस गेल्यावर आम्ही आणखी जवळ आलो इतके कि आम्ही आमच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. दोघांचा संयम कसा तुटला कळालेच नाही. ते एकमेकांमध्ये वेलींसारखे गुंतत जाणे नाही थांबवू शकलो आम्ही.

वेडे होऊ लागलो होतो आम्ही एकमेकांसाठी, एकमेकांच्या श्वासामध्ये गुंताणारे श्वास खूप सुखावत होते आम्हाला. तिच्यात इतका एकरूप झालो होतो मी कि काहीच सुचत नव्हते मला दुसरे अगदी बेभान झालो होतो मी.

तिच्या मिठीच्या उबे शिवाय दुसरे काहीही सूचने बंद झाले होते मला. शरीराने जवळ आल्यावर मात्र मी कामालाही जात नव्हतो. मला तिला एकट सोडून कुठेही जायचं नव्हतं. तशी कामावरून सुट्टीच घेतली होती मी. तिच्या शिवाय आणखी कशातही लक्ष लागत नव्हते. दुपारची वेळ होती आम्ही दोघेही माझ्या घरी एकमेकांच्या कुशीत छान विसावलो होतो.

तितक्यात दारावर बेल वाजली मी उठलो दरवाजा खोलण्यासाठी बाहेर गेलो. दरवाजा उघडला समोर पाहतो तर काय आई आली होती. आई घरात आली मी थोडा घाबरलो होतो.

आईला उर्मी आणि माझ्या बद्दल काहीही माहित नव्हते. ध्यानी मनी नसताना उर्मी ला अशी अचानक घरात पाहून आई काय करेल त्या विचाराने मला सुचायचेच बंद झाले होते. मी आईला पाणी आणून दिले आई मला बडबड करत होती फोन कुठय अभ्या तुझा ? कधी पासून फोन करतोय आम्ही तूला.

आणि तितक्यात झोपेतून उठून उर्मी डोळे चोळत चोळत बाहेर आली आणि मला म्हणाली, कोण आल आहे रे अभी? आईला बघून तिची झोपच उडाली ती घाबरून माझ्या पाठी येऊन उभी राहिली आई आश्चर्याने आमच्याकडे पहात होती.

आई आमच्या दोघांवर फार चिडली आणि आम्हाला काहीही बोलू लागली. जोवर आई मला बोलली मी काहीच बोललो नाही तिला. पण उर्मी ला बोलाल्यावर मात्र मला सहन झाले नाही.

आणि मी आईला सर्व समजावू लागलो. ती काहीही ऐकून घेत नव्हती. मी आईला जेव्हा मला उर्मी सोबत लग्न करायचे आहे म्हणालो, तेव्हा आई माझ्यावर आणखी .. चिडली आणि आली तशी कोल्हापूरला निघून गेली.

आई निघून गेल्यावर उर्मी खूप घाबरली होती. ती माझ्यावर ओरडू लागली आईला थांबवण्यासाठी माझ्याकडे हट्ट करू लागली. पण, मला माझ्या आईचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. त्यावेळी मी तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी आईने माझ काहीही ऐकून घेतलं नसत. उलट ती मला कामधंदा सोडून गावी यायला बोलली असती .

पण उर्मी ला हे सर्व कळत नव्हत. माझ्या पासून माझे आई बाबा तुटतील ह्या विचाराने अगदी भांबावून गेली होती ती. वेडी माझ्या आई बाबांसाठी मला इतके ही म्हणाली घरच्यांच्या विरोधात जाऊन काहीही करू नको. त्यांचा विरोध असेल तर मला सोडून दे पण, त्यांना दुखवू नको.

माझ्या सारख्या हजारो मिळतील तुला लग्न करण्यासाठी. पण, जन्म दिलेले आई-बाबा एकदा गमावले तर पुन्हा कधीही मिळणार नाहीत. तिचे विचार ऐकून तिच्या बद्दलचा माझ्या मनातील आदर आणखीनच वाढला.

वेडी माझ्या घरच्यांसाठी स्वतःच्या प्रेमाचाही त्याग करायला निघाली होती. मला समजावत होती पण, मला गमावण्याच्या भीतीने डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना नाही आवरता आले तीला.

तिने मनाशी पक्क ठरवलं होत माझी आई तिला कधीही स्वीकारणार नाही. त्यामुळे माझ्यावरच तीच प्रेम, ओढ आणि आम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने बाजूला ठेऊन ती मला या पेचातून बाहेर काढण्यासाठी धडपडत होती. तिची केविलवाणी धडपड मला सहन होत नव्हती. जे काही झाल त्यानंतर अगदी बिथराल्या सारखी वागत होती ती.

मी तिच्या जवळ गेलो तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, उर्मी शांत हो आधी. काहीही होणार नाही, मी आईला चांगला ओळखतो आजवर तिने माझे सर्व हट्ट पुरवले आहेत. ती मला नाही म्हणूच शकणार नाही. मी समजावेन तिला थोडा वेळ जाउदे.

माझ्यावर विश्वास ठेव. आई बाबा माझ्या पासून कधीही दूर जाऊ देणार नाही मी. आणि राहिला प्रश्न आपल्या नात्याचा तर मी तेही तुला सांगतो मी कोणत्याही किंमतीवर तुलाही सोडून जाणार नाही.

माझ्या मनातील तुझी जागा मी कोणालाच देणार नाही. मला थोडा वेळ दे मी सर्व ठीक करेन. उर्मी फार घाबरली होती. आई रागाने निघून गेली होती त्यामुळे तिला फार काळजी वाटत होती.

तिने माझ्याकडे हट्ट केला मला म्हणाली तू आधी आईकडे जा आई रागाने गेल्या आहेत, आधी त्यांना शांत कर. माझा जीव नाही लागणार भीती वाटत आहे मला खूप. मी तिला म्हणालो आजचा दिवस थांब उद्या जातो मी कोल्हापूरला आणि बोलतो आई-बाबां सोबत.

तू ही घाबरली आहेस तुला अश्या अवस्थेत कसा सोडून जाउ ? ती रात्र आम्ही अशीच जागून काढली आम्हा दोघांना ही झोप येत नव्हती. दोघेही एकमेकांकडे एकटक पहात होतो. तिची नजर मला स्पष्ट विचारात होती होईल ना रे सर्व ठीक.

आणि मीही नजरेतून तिला विश्वास देत होतो मी सर्व ठीक करेन. दुसरा दिवस उजाडला उर्मीच्या सांगण्यावरून मी आवरायला घेतलं आणि निघालो कोल्हापूरला जायला. जाताना पाय निघत नव्हता माझा.

काय माहित का पण, तिला सोडून जाउच वाटत नव्हत. खरतर मला जायचच नव्हत पण उर्मीच्या हट्टा साठी मी निघालो. निघताना उर्मिकडे पाहिले आणि म्हणालो, येतो मी काळजी घे. तो आला तर त्याच्या नादी लागू नको मी लवकर परत येतो.

मी असे म्हणालो आणि ती धावत येऊन मला बिलगली. खरतर तिलाही मला जाऊ द्यायचे नव्हते पण त्यावेळी तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. मी निघालो, ती दिसेनाशी होई पर्यंत मी मागे वळून पाहत होतो.

तीही मी जाई पर्यंत दरवाजात उभी होती आणि मग गेलेरीतूनही पहात होती बराच वेळ. तिचे ते आशेने माझ्याकडे पाहणारे डोळे माझे पाय खेचत होते पण तरीही मी गेलो. मी कोल्हापूरला पोहोचलो आई रागावलेलीच होती.

मला वाटले होते आईनी एव्हाना बाबांना सर्व सांगितले असेल. कारण गेली तशी लगेच परतलेली पाहून बाबांनी तिला अनेक प्रश्न विचारले असणार. मीही थोडा घाबरलोच होतो. पण, तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.

घरात गेलो अपेक्षित होत बाबा गेल्या गेल्या माझ्यावर वैतागातील मला पुणे सोडून गावी यायला सांगतील. पण, तसे काहीही झाले नाही. गेल्या गेल्या बाबा म्हणाले, तुझा फोन का नाही लागत होता अभी. आई पुण्याला आली होती.

कळवत जा रे आधी कुठे बाहेर जाणार असलास कि. तुला माहित आहे ना तुझ्या आईला जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा ती लगेचच निघते तुला भेटायला. नशीब बिल्डींग मधल्या तुझ्या मित्राने सांगितल तू ऑफिसच्या कामा निमित्त मुंबईला गेला आहेस ते नाहीतर बसली असती तिथेच तुझी वाट पहात.

मी आईकडे पाहिले आणि मान खाली घातली. आईने मला पाणी आणून दिले. आणि बाबांना म्हणाली, अहो …अभिच्या लग्नाच बघा आता. मी पुन्हा घाबरलो मला वाटल आई आता नक्की विषय काढणार. पण, तसे झाले नाही.

आईने माझ्याकडे रागाने पहिले आणि बाबांना म्हणली, मला नाही जमत आता सतत त्याची काळजी घेत बसायला. वय झाल आहे आता माझ ही. एकदा का त्याच लग्न झाल म्हणजे माझी काळजी मिटेल.

बाबाही तयार झाले आणि म्हणाले, हो पहायला सुरुवात करायलाच पाहिजे. तोही तिकडे एकटाच असतो. मी कसा बसा धीर एकवटला आणि म्हणालो, हो मला ही तेच सांगायचं आहे तुमच्या दोघांना मी लग्नासाठी एका मुलीची निवड केली आहे.

बाबांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे मग चांगल आहे कि. मला ठाऊकच होत तू तुझ्या मनानेच लग्न करणार. आमची काहीही हरकत नाही बघ. संसार तुला करायचा आहे त्यामुळे तुझ्या मर्जीने झालेलच बरं.

आमचा काळ वेगळा होता. आम्ही आमच्या आई वडिलांच्या मर्जीने लग्न केल. आता तुमचा काळ वेगळा आहे. बोल कधी जायचं त्या मुलीच्या घरी बोलायला. तशी आई भडकली बाबांवर आणि म्हणाली काय मुलगी बघायला जाता.

आधी त्याला विचारा तरी कोण आहे मुलगी. अहो…. लग्न झालेल्या मुली सोबत लग्न करायच म्हणतो आहे तो. तेही तिचा नवरा जिवंत असताना. बाबा माझ्यावर खुप भडकले आणि ज्याची मला भीती होती तेच झाल.

त्यांनी मला नोकरी सोडून द्यायला सांगितले. आणि पुण्याला जायचेच नाही आता असे साफ बजावले त्यांनी मला. बाबांनी माझा फोन माझ सामान सर्व काढून घेतले. मला काय करावे काही सुचत नव्हते.

तिकडे उर्मी डोळ्यांत तेल घालून माझी वाट पहात असेल मला ठाऊक होते. मी आईबाबांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघेही मला समजून घेतच नव्हते. आई बाबा माझ्यावर लक्ष ठेऊन होते मला जराही इकडे तिकडे जाऊ देत नव्हते.

मग मी ही हट्टाला पेटलो आणि मी अन्न पाण्याचा त्याग केला. पूर्ण एक दिवस आईने माझ्याकडे लक्षच दिले नाही. पण, शेवटी आईच ती दुसऱ्याच दिवशी न राहून आली माझ्याकडे आणि मला समजावू लागली. मी ही आईला माझी बाजू समजावत होतो.

मी आईला विचारले ऊर्मीचे लग्न झालेले आहे या व्यतिरिक्त तिच्यात काही त्रुटी आहेत का मला सांग? बाजूला ठेव तिचे लग्न झाले आहे हे, आणि विचार कर ती माझी बायको म्हणून कशी वाटते. आई जरा वेळ शांत झाली आणि म्हणाली, पण तीच लग्न झाल आहे अभी आता, या सगळ्याचा विचार करून काय उपयोग.

मी म्हणालो मी नाही मानत अशा लग्नाला ज्याला काहीही अर्थ नाही. आई म्हणाली, पण कायदा नाही परवानगी देणार बाळा. मी म्हणालो, अग पण त्यांचे लग्न झाले आहे याचे कायद्याने काहीही पुरावे नाहीत त्यांच्याकडे.

आणि मुळात तिच्या नवऱ्याने पहिली बायको जिवंत असताना तिच्या सोबत तिच्या घरच्यांना फसवून लग्न केले आहे. त्यामुळे तो स्वतःच कायद्याच्या नादाला लागणार नाही. मग, आई म्हणाली तिचा नवरा किती पोहोचलेला आहे त्याने तुला काही केले तर? मी म्हणालो, मला नाही त्याची भीती वाटत.

मला भीती फक्त तुला आणि बाबांना गमावण्याची वाटते. आई तू तरी मला समजून घे. मी उर्मी शिवाय कोणाचाही विचार नाही करू शकत. आयुष्यभर बिन लग्नाचाच राहीन पण, दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही.

अखेर आईने माझ्या हट्टा पुढे हात टेकले आणि ती बाबांकडे गेली. त्यांना म्हणाली, होऊद्या त्याच्या मनासारखं. बाबा तरीही या सगळ्याच्या विरोधात होते. ते आईला म्हणाले, पण लोक काय म्हणतील लग्न झालेली पोरगी सून म्हणून आणली.

त्यावर आई त्यांना इतकच म्हणाली, कोणाला कळणार आहे आपण सांगितल्या शिवाय? आणि त्याचा तो तिकडेच लग्न करून येईल कोर्टात. मग हव तर भावकीसाठी पूजा घालू इकडे आपण चांगली. कशाला कोण विचारतय? बाबांशी बोलून झाल्यावर आईने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, झाल ना तुझ्या मनासारख जा आता आणि लवकर लग्न करून घेऊन ये तिला.

मी खूप खुश झालो क्षणभर मला मी जे ऐकल त्यावर विश्वासच बसत नव्हता. हसाव कि रडाव मला काहीही कळत नव्हत. मी लगेचच पुण्याला जायला निघालो. आई म्हणाली, मनासारखं झाल आहे ना आता? मग आता तरी दोन घास खाऊन घे. मी आईला म्हणालो, माझ पोट भरल आहे आई.

कधी एकदाचा पुण्याला जातो आणि ही आनंदाची बातमी उर्मी ला सांगतो असे झाले आहे मला. बोलत बोलत आई-बाबांच्या पाया पडून मी घराबाहेर पडलो. जाता जाता उर्मी आणि माझ्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतो मी. ही बातमी तिला कशाप्रकारे सांगायची याचाही मी विचार चालू होता माझ्या मनात.

मी ठरवलेल तिची जरा मस्करी करायची तिला सांगायचं आई-बाबा तयार झाले नाही आपण वेगळे होऊ. आणि हे ऐकून जेव्हा तिला रडू येईल तेव्हा तिला जवळ घेऊन सांगून टाकायचं आई बाबा आपल्या लग्नासाठी तयार आहेत ते. लग्नासाठी जास्त दिवस वाट पहायची नव्हती मला. कारण आमच्या नात्याबद्दल महेशला कळले तर तो काहीही करू शकतो हे मला ठाऊक होते.

सर्व सुरळीत चाललेलं होत त्यात मला काहीही वाईट साईट होऊ द्यायचं नव्हत. त्या दृष्टीने मी प्रयत्नही करत होतो. गेल्या गेल्या लग्न करायच हे मी मनाशी पक्क ठरवलं होत. लग्न झाल्यावर मी उर्मिला काही दिवसांसाठी आईबाबांकडे ठेवणार होतो आणि स्वतः तिथेच रहाणार होतो, म्हणजे महेशला शंका येणार नाही.

सर्व प्लानिंगने मी पाऊल टाकत होतो. मित्राला फोन केला त्याला लग्नाची तयारी करायला सांगितली. सर्व नियोजन व्यवस्थित करून ठेवले होते. आता फक्त उर्मी ला घेऊन निघायचं होत.

आमच्या नशिबाने महेशला यायला आणखी एक दिवस बाकी होता त्यामुळे ते एक टेन्शन नव्हत मला. माझ्या हातात एक दिवस होता आणि तो एक दिवसच पुष्कळ होता माझ्यासाठी.मी माझ्या स्वप्नाला उराशी घेऊन निघालो होतो माझ्या उर्मीकडे आणि आम्ही दोघेही हे स्वप्न पूर्ण करून खूप सुखी होणार या विचाराने अगदी भरून आल होत मला.

रस्ता संपत नव्हता, वेळ जात नव्हती अस वाटत होत गाडीतून उतरून धावत जाव पुण्याकडे. मन शांत करण्यासाठी मग डोळे मिटून घेतले आणि उर्मीचा चेहरा आठवू लागलो. काही वेळाने माझा डोळा लागला आणि झोपेत असताना अचानक उर्मी समोर दिसली आणि मी दचकून जागा झालो. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले ती ठीक असेल ना? महेश आला असेल तर ? उर्मीच्या विचारात कसाबसा स्वारगेटला पोहोचलो आणि तिथून घरी जाण्यासाठी रिक्षा केली.

रिक्षा बिल्डींगच्या गेटवर पोहोचली. बिल्डींगच्या खाली खूप गर्दी होती. माझ्या मनात नाही, नाही ते विचार येऊ लागले. वरती चढण्याची हिंमत काही होत नव्हती. हृदयाचे ठोके वाढू लागले होते.

मी मनातल्या मनात देवाचा धावा करत होतो माझी उर्मी ठीक असावी म्हणून. कसा बसा मी माझ्या प्लोरवर पोहोचलो. माझ्या प्लोर वर तर जास्तच गर्दी होती. गर्दीतून वाट काढत पुढे गेलो आणि पाहिलं तर उर्मीच्या घरातून धूर येत होता. मला वाटले आग लागली असेल उर्मी ठीक आहे कि नाही पाहण्यासाठी मी त्या धुरातून आत गेलो.

आणि जे पाहिले त्याने मी पुरता कोसळून गेलो. माझी उर्मी जळलेल्या अवस्थेत निपचित पडली होती. लोक तिला विझवण्याचा प्रयत्न करत होते. मी मात्र तिच्या घराच्या भिंतीला टेकून स्तब्द उभा होतो.

माझी उर्मी संपली होती. नवीन आयुष्याची सुरुवात करणार होतो आम्ही दोघेही आणि हिने आयुष्यच संपवून घेतलं होत. किती काय काय ठरवून आलो होतो मी. मला तिला आश्चर्याचा धक्का देऊन तिच्या चेहऱ्यावरचे हसू मनात साठवून ठेवायचे होते पण, तिनेच मला हे जग सोडून हा असा जीवघेणा आश्चर्याचा धक्का दिला.

मी कोल्हापूरला जाताना मला म्हणाली होती लवकर ये, मी वाट पहाते. तेव्हाच शरीरातून प्राण निघून गेले असताना डोळे उघडे होते तिचे. तिच्या उघड्या डोळ्यांकडे पाहून साफ जाणवत होते कि, जाण्या आधीचे काही क्षण सुद्धा तिला माझ्या येण्याची आस होती.

माझ्या उर्मी ला तशी पाहून मी अगदी सुन्न झालो होतो. काही वेळाने पोलीस आले तेव्हा बाजूच्या लोकांनी पोलिसांना तिच्या नवऱ्यानेच तिला पेटवून दिल्याचे सांगितले. त्यानंतर लोकांनी त्याला बेदम मारला होता आणि पळून जाऊ नये म्हणून त्याच्याच घरामध्ये कोंडून ठेवला होता त्याला.

पोलिसांनी त्याला रूम मधून बाहेर काढले. मला काय झाले होते काय माहित अंगातून जीव गेल्यासारखा मी तिच्याकडे पहात होतो फक्त. पोलीस त्याला घेऊन गेले. मला उठून त्याला मरे पर्यंत मारावेसे वाटत होते पण, मला उठताच येत नव्हते.

काही वेळाने अॅम्बुलंस आली आणि माझ्या समोर उर्मी ला घेऊन गेले. तरीही मी तसाच बसून होतो. उर्मी ला पहिल्यांदा पाहिल्या पासून ते मी कोल्हापूरला जाई पर्यंत सर्व माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागलं. आणि तिने पहिल्यांदा गायलेलं ते गाण जस ना तस माझ्या कानावर पडू लागल.

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी या वाहणाऱ्या वाऱ्या सवे…….लहरेण मी बहरेन मी तरीही मला लाभेन मी …..एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी…..

उर्मीच्या जाण्याचा धक्का मला सहन झाला नाही. त्याहूनही हे सहन करणे मला आणखी असह्य होत होते कि, तिचा इतका क्रूरपणे शेवट होण्याच कारण मी ठरलो. हो महेश ने कोर्टात झाल्या प्रकारची कबुली देत सर्व सांगितले.

मी गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महेश अचानक आला. त्यादिवशी नेहमी प्रमाणे तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. माझ्यावरच्या प्रेमाखातर तिने त्याला स्पर्शही करू दिला नाही. त्या रागात त्याने तिला खूप मारहाण केली. त्यातूनही हिंमत एकवटून ती महेशला तिला सोडून देण्यासाठी बोलली.

ते ऐकून त्याने तिला आणखी मारहाण केली. माझ्या वरच्या प्रेमाची परीक्षा म्हणून ती त्याचा निमुटपणे मार सहन करत राहिली. आणि त्याची मारहाण असह्य झाल्यावर ती त्या आवेशात त्याला बोलून गेली कि, तिचे एका मुलावर प्रेम आहे. आणि ती त्याच्या सोबत लग्न करणार आहे.

हे ऐकून महेशला राग अनावर झाला आणि त्याने तिला रॉकेल ओतून…………….

आज तब्बल पंधरा वर्षे झाली उर्मी मला सोडून गेली त्याला. आणि मी गेलो होतो त्यालाही. हो लोक म्हणतात उर्मी गेल्या नंतरचे चौदा वर्ष मी मानसिक धक्यातच होतो. उर्मी गेल्यानंतर ते मनोरुग्नालयचं माझे घर झाले होते.

आता घरी आलो आहे सर्व आहे तसच आहे. पण माझी उर्मी माझ्या जवळ नाही. तिच्या खिडकीतून येणारा तिचा तो गोड आवाज नाही कि, तीच्या बांगड्याची किणकिण नाही आणि तिच्या गेलेरीमध्ये तिने बनवलेली ती सुंदर बागही नाही.

तसे म्हणायला गेले तर माझ्याकडे तरी काय उरले आहे आता. आईबाबा खूप बोलतात गावी यायला पण मला इथेच राहू वाटते. आयुष्याची चौदा वर्षे अशीच निघून गेली माझ्या. या घरात खूप आठवणी आहेत उर्मीच्या. खूप शांतता असते इथे आता पण, तरीही मी एकटा नाही.

माझ्याकडे माझ्या उर्मीच्या गोड आठवणी अजूनही तशाच आहेत. त्यामुळे ती आजही मला माझ्याजवळ असल्या सारखी भासते. हल्ली त्या आठवणींच्या सोबतच जगत असतो… आणि तिच्या त्या गोड आठवनींना पानांवर उतरवत असतो……आणि वाट पहात असतो उर्मीने मला दिलेल्या एकटेपणाच्या शिक्षेतून मुक्त होऊन पुन्हा तिच्याकडे जाण्याची…….

खंत एकाच गोष्टीची वाटते जर मी तिच्या आयुष्यात गेलोच नसतो तर कदाचित वाईट का असेना ती तिचे आयुष्य जगत राहिली असती. आणि आजही मी तिला चोरून चोरून माझ्या गेलेरीतून पाहू शकलो असतो……

Please follow and like us:

Leave a Reply