ताज महाल- खरे सत्य काय ?

मराठी मनोरंजनात्मक पोस्ट साठी लाईक करा : https://www.facebook.com/aamachkahi/

================================================================

ताज महाल

ताजमहाल विषयी विस्तृत माहिती या लिंक वर क्लीक करून डाउनलोड करा

Loading...

इंग्रज आणि कावेबाज इतिहासकार यांनी रंगवलेल्या ताजमहालचे सत्य स्वरूप !

‘गेली २०० वर्षे ताजमहालविषयी अनेक दंतकथा पसरल्या आहेत. त्या सर्वांत एक ब्रह्मवाक्य मात्र कायम असते, ते म्हणजे ‘बांधकामासाठी २० सहस्र माणसे २२ वर्षे सतत काम करत होती.’ आज ही गोष्ट जगातील सगळ्या आबालवृद्धांना ठाऊक आहे. साहजिकच प्रश्‍न पडतो की, हे आकडे आले कोठून ?

१. ‘२० सहस्र माणसे २२ वर्षे सतत काम करत होती’, हे फ्रेंच व्यापारी ‘टॅव्हर्नियर’चे विधान म्हणजे शुद्ध भूलथाप !

टॅव्हर्नियर नावाचा धाडसी फ्रेंच व्यापारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात (१६३८ – १६६८) ६ वेळा हिंदुस्थानात येऊन गेला. त्याने त्याची प्रवासवर्णने लिहिली. ‘Travels In India’ या पुस्तकात तो म्हणतो, ‘या (ताजमहालच्या) बांधकामाचा प्रारंभ आणि शेवट मी बघितला. या कामावर २० सहस्र माणसे २२ वर्षे सतत काम करत होती.’

Loading...
Jean-Baptiste Tavernier in oriental costume, 1679

टॅव्हर्नियरचे पुस्तक प्रथमतः वर्ष १६७५ मध्ये प्रसिद्ध झाले. त्या काळी एकट्याने सगळ्या अडीअडचणींना तोंड देऊन, देशोदेशींच्या लोकांच्या भाषा, आचारविचार, हवामान, खाणेपिणे हे सगळे सांभाळून हिरे, माणिक, मोती अशा मौल्यवान खड्यांचा व्यापार यशस्वीपणे करून सुखरूप परत येणे, हेच आश्‍चर्य होते. टॅव्हर्नियरने ६ वेळा अशा सफरी केल्या. त्याच्या पुस्तकाचे साहजिकच इंग्रजीत भाषांतर होऊन वर्ष १६७७ ते १८११ या काळात आठ आवृत्त्या निघाल्या. वर्ष १८८९ मध्ये डॉ. बॉल या गृहस्थाने मूळ फ्रेंच पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर केले. चुका सुधारल्या आणि भरपूर तळटीपा घातल्या. त्यासमवेतच त्याने अभ्यास करून प्रस्तावनेत टॅव्हर्नियरच्या भ्रमंतीचे विस्तृत वर्णन दिले. त्यावरून असे सिद्ध होते की, टॅव्हर्नियर आगर्‍याला दोनदा गेला होता. १६४०-४१ च्या थंडीत आणि दुसर्‍यांदा १६६५ मध्ये ! या माहितीमुळे एक विलक्षण प्रश्‍न निर्माण होतो.

इतिहासकार सांगतात की, शहाजहानची बायको मुमताज ही वर्ष १६३१ मध्ये वारली आणि तिच्या थडग्याचे काम लगेचच चालू झाले; पण तसे असेल, तर टॅव्हर्नियरने बांधकामाचा प्रारंभ बघणे शक्यच नव्हते; कारण तो तिच्या मृत्यूनंतर जवळजवळ १० वर्षे उलटून गेल्यानंतर आगर्‍याला आला. तसेच औरंगजेबाने वर्ष १६३८ पासून शहाजहानला आगर्‍याच्या लाल किल्ल्यात कैद करून ठेवले होते. टॅव्हर्नियर तर दुसर्‍यांदा आगर्‍याला आला वर्ष १६६५ मध्ये ! औरंगजेबाने आपल्या आईच्या थडग्याचे काम पूर्ण केले, असे कोणीच म्हणत नाही. म्हणजे टॅव्हर्नियरने कामाचा शेवटही बघितला नाही. तेव्हा यामुळे ‘२० सहस्र माणसे २२ वर्षे सतत काम करत होती’, हे विधान निरर्थक आहे. गेली ११७ वर्षे (आता १२७ वर्षे) हे सत्य इतिहासकारांनी आमच्यापासून लपवून ठेवले आहे; कारण हे मान्य केले की, दंतकथेतील प्राणच निघून जातो !

२. ताजमहाल शहाजहानने बांधल्याचा उल्लेख त्याच्या बादशहानाम्यात नाही !

‘हिंदु राजांना ऐतिहासिक दृष्टीकोनच नव्हता. इतिहास लिहिला, तो केवळ मुसलमान राजांनी’, असे इंग्रज लेखक नेहमी म्हणतात. ठीक. तर मग, शहाजहानच्या काळी जो ‘बादशहानामा’ लिहिला गेला, त्याकडे वळूया.

Asiatic Society Of Bengal या संस्थेने वर्ष १८६७ (भाग १) आणि वर्ष १८६८ (भाग २) या दोन वर्षी ‘बादशहानामा’ पुस्तकरूपाने छापला. संकलन करणारे दोघे मुसलमान मौलवी होते आणि त्यांच्यावर एका इंग्रज मेजरची देखरेख होती. आश्‍चर्य असे की, बादशहानाम्यांतील पानांचा संदर्भ देऊन ‘शहाजहानने ताजमहाल कसा बांधला’, असे मात्र कोणीही इतिहासकार सांगत नाही. हे काय गौडबंगाल आहे, हे बघू.

३. इंग्रजांनी लिहिलेल्या भारताच्या इतिहासातही शहाजहानच्या काळात ताजमहाल बांधला गेल्यासंदर्भात पुसटसा उल्लेखही नाही !

महंमद बिन कासिमच्या सिंधवरच्या स्वारीपासून मराठ्यांच्या पाडावापर्यंतचा १२०० वर्षांचा इतिहास Elliott आणि Dowson या दोन इंग्रजांनी (कसे का असेना) लिहिण्याचे साहस केले. मुसलमानी राज्यकर्त्यांच्या नोंदींवरूनच हा इतिहास लिहिण्यात आला आहे. वर्ष १८६७ ते १८७७ या काळात त्या इतिहासाचे ८ खंड प्रसिद्ध झाले. सातवा खंड, शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कारकिर्दीवर आहे; परंतु त्या खंडात ‘ताजमहाल’ असा शब्दच नाही. वास्तविक ‘बादशहानाम्यानुसार शहाजहानच्या काळाचा इतिहास आम्ही सांगितला खरा; पण त्यात ‘ताजमहाल’च्या बांधकामाचा मात्र कोठेही उल्लेख आढळला नाही’, असे त्या दोघा इंग्रजांनी स्पष्टपणे सांगायला हवे होते; पण ते दोघे याविषयी ‘ब्र’ काढत नाहीत. आमच्या इतिहासकारांनी हे सत्यही गेली १३० वर्षे लपवून ठेवले आहे.

४. खानबहादूर सय्यद लतीफ आणि इंग्रज अधिकारी H.R. Nevill यांनी केलेले उल्लेख !

वर्ष १८९६ मध्ये खानबहादूर सय्यद लतीफ या गृहस्थाने ‘आगरा आणि आजूबाजूचा परिसर’ या विषयावर पुस्तक लिहिले. त्यांनी ठिकठिकाणी बादशहानाम्याचा संदर्भ दिला आहे; परंतु बादशहानाम्यातील नेमक्या पानांचे क्रमांक मात्र दिले नाहीत. लतीफ यांनी त्यांच्या पुस्तकातील १०५ क्रमांकाच्या पानावर लिहिले आहे, ‘The site selected for the mausoleum was originally a palace of Raja Mansingh. But it was now the property of his grandson Raja Jaisingh’, अर्थात् ‘थडगे ठेवण्यासाठी राजा मानसिंह यांच्या महालाची वास्तू निवडली गेली, परंतु ती वास्तू आता त्यांचा नातू राजा जयसिंह यांची होती.’ अनेकांनी लतीफच्या ‘Agra : Historical & descriptive’ या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे; परंतु त्या पुस्तकात नेमके काय म्हटले आहे, हे कोणीच बघितले नाही. हे सत्यही आमच्या इतिहासकारांनी आमच्यापासून लपवून ठेवले आहे.

वर्ष १९०५ मध्ये H.R. Nevill या इंग्रज अधिकार्‍याने Agra District Gazetteer चे संपादन केले. या पुस्तकात ‘Raja Mansinghs Palace’ हे शब्द पालटून ‘Raja Mansinghs piece of land’ असे शब्द त्याने घातले. तेव्हापासून शहाजहानने राजा मानसिंहची भूमी मानसिंहचा नातू राजा जयसिंह यांच्याकडून घेतली, असे सगळ्या लेखकांनी कसलाही विचार न करता पुन्हा पुन्हा लिहिले आहे आणि गेली शंभर वर्षे सर्व वाचक तेच सत्य मानीत आहेत. वर्ष १९२५ च्या मराठी ज्ञानकोषातही तेच म्हटले आहे.

५. ताजमहाल शहाजहानने बांधला, अशी फसवणूक इंग्रजांनी का केली ?

इंग्रजांना अशी फसवणूक करण्याचे कारण काय ? त्या काळच्या घटना बघितल्या की, स्पष्टीकरण मिळते. थोडक्यात त्या घटना अशा –

१९०१ : लॉर्ड कर्झनने पंजाबचे काही जिल्हे तोडून वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला. त्या नव्या प्रांतात हिंदू अल्पसंख्य झाले आणि त्यांच्या दुर्दशेला प्रारंभ झाला.

१९०३ : ‘बंगालची फाळणी होणार’, अशी घोषणा कर्झनने केली.

१९०५ : कर्झनने त्यागपत्र दिले; पण बंगालची फाळणी अंमलात आणली.

१९०६ : महाराज्यपाल लॉर्ड मिंटो याला मुसलमानांचे शिष्टमंडळ भेटले. ‘इंग्रजांनी मुसलमानांना सतत विशेष सवलती द्याव्यात’, अशी विनंती त्या शिष्टमंडळाने केली. हा बनाव अर्थात्च इंग्रजांनी घडवून आणला होता.

डिसेंबर १९०६ : ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली.

वर्ष १९०९ : मोर्ले-मिंटो सुधारणांमध्ये मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले.

इंग्रजांच्या राज्यात वर्ष १८७३ ते १९१४ या काळात निरनिराळ्या इंग्रज अधिकार्‍यांनी बाबरनामा, हुमायून-नामा, अकबरनामा, आइने अकबरी, तझुके जहांगिरी यांची इंग्रजीत भाषांतरे केली; परंतु बादशहानाम्याचे इंग्रजी भाषांतर कोणीच केले नाही. एवढेच नव्हे, तर वर्ष १८६७ ते २००७ या १४० वर्षांच्या प्रदीर्घ काळात जगातील एकाही इतिहासकाराला बादशहानाम्याचे भाषांतर करावेसे वाटले नाही, हे सत्यही इतिहासकारांनी लपवून ठेवले आहे.

वरील सर्व घटनांवरून वर्ष १९०५ च्या ‘Agra District Gazetteer’ मध्ये नेव्हिलने फसवणूक का केली, हे लक्षात येते.

आता आश्‍चर्य असे की, मौलवी अहमद (History of Taj 1905) आणि यदुनाथ सरकार (Anecdotes of Aurangzeb, 1912) हे दोघे ‘शहाजहानने राजा मानसिंहची जागा घेतली’, या विधानाचा संदर्भ देतात तो, ‘बादशहानामा खंड १ चा’ पान क्रमांक ४०३ चा; परंतु या पानावर नेमके काय म्हटले आहे, ते कोणीच बघितले नाही.

६. ताजमहाल हिंदूंचाच असल्याविषयी पु.ना. ओक यांच्याकडून ठाम प्रतिपादन !

वर्ष १९६४ मध्ये देहलीचे पु.ना. ओक यांना ताजमहालविषयी शंका आली आणि ‘तो शहाजहानने बांधलेला नसून पूर्वीचा हिंदूंचा प्रासाद असावा’, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांचे अनेकांशी वादविवाद झाले. त्यांच्या विरोधकांत एक काश्मिरी हिंदु होते. ते फारसी भाषा उत्तम जाणणारे होते. ते दोघे भारत शासनाच्या संग्रह कार्यालयात गेले. तेथील अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार त्या पंडिताने ‘बादशहानामा’ उघडला. बघताबघता ते पहिल्या खंडाच्या ४०३ पानावर आले. ‘वा पेश अझिन मंझिले राजा मानसिंग बूद, वदारी वक्त बा राजा जयसिंग’ ही ओळ बघितल्यावर ते आश्‍चर्यचकित झाले.

त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले की, ‘शहाजहानने मुमताझला पुरण्यासाठी राजा मानसिंहचा प्रासाद घेतला.’ त्या गृहस्थांनी लवकरच ४०२/४०३ या पानांची शब्दशः भाषांतरे करून ती ओक यांना दिली. ओक यांनी वर्ष १९६८ मध्ये ‘Taj Mahal is a Hindu Palace’ या पुस्तकात ती भाषांतरे छापली. दुर्दैवाने ‘हे भाषांतर माझे नाही’, एका फारसी जाणणार्‍या तज्ञाने मला करून दिले आहे; परंतु तो शासकीय नोकरीत असल्याने त्याचे नाव प्रकट करू नये, अशी त्याची विनंती आहे’, असा स्पष्ट खुलासा पु.ना. ओक यांनी कधीच केला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधकांचे फावले. ‘ओक यांचे भाषांतर चुकीचे आहे’, असे ते म्हणू लागले.

७. ब्रिटिशांच्या ताजमहालविषयीच्या कटकारस्थानाचा वेध !

पु.ना. ओक यांचे पुस्तक मला लंडनला वर्ष १९७७ मध्ये मिळाले. मी वर्षभर संशोधन केले. सर्वसाधारणतः संदर्भग्रंथ म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ते सगळे ग्रंथ मी बघितले. इंग्लंडमध्ये ते सहजशक्य आहे. ओक यांना ती सुविधा नव्हती. सगळ्या ग्रंथांतून एकच निष्कर्ष निघाला, ‘ताजमहाल हा शहाजहानने बांधला नसून तो एक प्राचीन हिंदु प्रासाद आहे.’ Taj Mahal – Simple Analysis of a Great Deception (ताजमहाल – मोठ्या फसवणुकीचे सोपे विश्‍लेषण) हे माझे पुस्तक वर्ष १९८६ मध्ये प्रसिद्ध झाले. वर्ष १९८१ मध्ये काही संदर्भ बघतांना मला दाट शंका आली की, इंग्रजांना ताजमहालचे सत्यस्वरूप फार पूर्वीपासून माहिती असावे. संशोधनाचा विस्तार होत होता. Taj Mahal & The Great British Conspiracy (ताजमहाल आणि मोठे ब्रिटीश कारस्थान) हे लिखाण ‘इतिहासपत्रिका’ या त्रैमासिकात १० भागांत प्रसिद्ध झाले. वर्ष १७८४ ते १९८४ या २०० वर्षांच्या काळात काय पुरावे उपलब्ध झाले, ते ब्रिटिशांनी विकृत स्वरूपात कसे मांडले आणि त्यामागे त्यांचा हेतू काय होता, या सगळ्याचा ऊहापोह त्या ३४० पानी पुस्तकात केला आहे.

लंडनमध्ये ‘Royal Institute of British Architects (RIBA)’ ही एक प्रतिष्ठित संस्था आहे. वर्ष १९८० मध्ये तिच्या मासिकात ताजमहालाची दंतकथा खोटी आहे, अशा आशयाची दोन पत्रे प्रसिद्ध झाली. एक पु.ना. ओक यांचे आणि दुसरे माझे ! या दोन पत्रांना अजून कोणीही उत्तर दिले नाही. ओक यांनी बादशहानाम्याचा संदर्भ दिला. माझ्या पत्रांत असे काय आहे ?

Royal Institute of British Architects (RIBA)

शहाजहान सत्तेवर येण्यापूर्वी आगरा शहर कसे होते ? याविषयी सगळे इतिहासकार मूग गिळून गप्प बसतात. हिंदुस्थानात इंग्रजांप्रमाणेच डच व्यापार्‍यांच्याही वखारी होत्या. आगर्‍यालासुद्धा त्यातील एक होती. फ्रान्सिस्को पेलसार्ट हा डच व्यापारी वर्ष १६२० ते १६२७ या काळात आगर्‍याला होता. वर्ष १६२६ मध्ये त्याने एक व्यापारी प्रतिवृत्त सिद्ध केले.

त्यात त्या वेळच्या आगरा शहराचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे, ‘हे शहर अरुंद आणि लांबलचक आहे. कारण सगळ्या बड्या श्रीमंत गृहस्थांनी आपले वाडे नदीकाठी बांधले आहेत. त्यामुळे १०.५ मैलांचा यमुना नदीचा काठ हा अमीर / उमरावांच्या राजवाड्यांनी भरलेला आहे. त्यांपैकी काही महत्त्वाचे राजवाडे पुढील जणांचे आहेत.

उत्तरेकडून दक्षिणेकडे पहिला प्रासाद बहादुरखानाचा ! नंतर राजा भोजांचा… मग येतो लाल किल्ला (या किल्ल्याचे पूर्ण वर्णन पेलसार्ट करतो) त्याच्या पलीकडे एक मोठा बाजार आहे. त्यानंतर येतात बड्या उमरावांचे राजवाडे – मिर्झा अब्दुल्ला, आगा नौर …महाबत खान…(कै.) राजा मानसिंह आणि शेवटी राजा माधोसिंह यांचे राजवाडे आहेत.

या प्रतिवृत्ताचे इंग्रजी भाषांतर पुस्तकरूपाने वर्ष १९२५ मध्ये प्रसिद्ध झाले. वर्ष १६२६ मध्ये यमुना नदीचा १०.५ मैलाचा काठ राजवाड्यांनी भरलेला होता. त्यापैकी ‘जो प्रासाद ‘राजा मानसिंहचा राजवाडा’ म्हणून ओळखला जात असे. तो शहाजहानने मुमताझला पुरण्याच्या मिषाने गिळंकृत केला’ असे स्वयं बादशहानाम्यातच लिहिले आहे.

    ही वस्तूस्थितीसुद्धा इतिहासकारांनी आमच्यापासून लपवून ठेवली आहे.

आमच्या आरडाओरडीमुळे, प्रयत्नांमुळे एक पालट मात्र अवश्य झाला. भारत शासनाच्या पुरातत्व खात्याने वर्ष १९८२ मध्ये ‘Taj Museum’ या नावाची पुस्तिका छापली. त्यात नेहमीचीच दंतकथा दिली असली, तरी एक महत्त्वाचा भेद आहे. लेखकद्वय म्हणतात, ‘मुमताझ बर्‍हाणपुरला मेली, तिचे दफन तेथे झाले. शहाजहानने सहा मासांनंतर तिचे प्रेत उकरून आगरा येथे पाठवले. तेथे तोपर्यंत (कै.) राजा मानसिंहचा राजवाडा होता…’ तो राजवाडा म्हणजेच आजचा ताजमहाल ! एक प्रेत पुरण्यासाठी राजवाड्यांत पालट, असे काय करावे लागतात ?’

– डॉ. वासुदेव शं. गोडबोले, इंग्लंड

======================================================================

रहा अपडेट : आमचे इतर लेख वाचण्यासाठी https://akck.in/ वर क्लीक करा. व फेसबुक वर पोस्ट वाचण्यासाठी https://www.facebook.com/aamachkahi/ क्लीक करून पेज लाईक करा .

Please follow and like us:

Leave a Reply